-
सध्या संपूर्ण देशात करोना व्हारसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपटगृहे बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे बॉलिवूडने चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी थेट ७० एमएमवरुन ६ इंच स्क्रीनचा पर्याय निवडत ओटीटी प्लॅटफॉर्मला प्राधान्य दिलं आहे. घरी बसल्याच प्रेक्षकांना नवीन चित्रपट पाहता येणार आहे. अगदी ‘नेटफ्लिक्स’, 'अॅमेझॉन प्राईम’ आणि ‘डिस्ने हॉटस्टार’ने अनेक चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करणार असल्याची घोषणा केली आहे. हे चित्रपट जरी प्रेक्षकांना घर बसल्या पाहता येणार असले तरी त्यासाठी या ओटीटी प्लॅटफॉर्मने मोठी किंमत मोजली आहे. काही चित्रपटांनी तर १०० करोड क्लबमध्ये प्रदर्शनाआधीच जागा मिळवली आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यासाठी कोणत्या चित्रपटाचे हक्क किती कोटींना रुपयांना विकण्यात आले आहेत हेच आपण या फोटोगॅलरीमध्ये पाहणार आहोत.
-
विविध भूमिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री विद्या बालन ‘शकुंतला देवी’ या आगामी चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. प्रत्येक भूमिकेला प्रभावीपणे रुपेरी पडद्यावर उतरवणारी विद्या नेहमीच तिच्या अभिनयाच्या माध्यमातून अनेकांना आश्चर्यचकित करत असते. त्यातच आता ती प्रसिद्ध गणितज्ज्ञ शकुंतला देवींच्या बायोपिकमध्ये झळकली आहे.
-
‘शकुंतला देवी’ या चित्रपटात ‘दंगल गर्ल’ सान्या मल्होत्रा विद्याच्या मुलीची भूमिका साकरत आहे. त्यासोबतच जिशू सेनगुप्ता आणि अमित साध यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. ‘शकुंतला देवी’ हा चित्रपट ३१ जुलै रोजी ‘अॅमेझॉन प्राइम’वर प्रदर्शित झाला. या चित्रपटाची निर्मिती सोनी पिक्चर्स नेटवर्क्स प्रॉडक्शन्स आणि विक्रम मल्होत्रा यांनी केली आहे. चित्रपटासाठी ‘अॅमेझॉन प्राइम’ने ४० कोटी रुपये मोजले आहेत.
-
अॅक्शन हिरो विद्युत जामवाल लवकरच एका नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या आगामी चित्रपटाचं नाव ‘खुदा हाफिज’ असं आहे. ‘डिस्ने हॉटस्टार’वर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा रोमॅन्टीक थ्रीलर चित्रपट असून तो सत्य घटनेवर आधारित असल्याचे सांगितले जात आहे.
-
‘खुदा हाफिज’ची निर्मिती कुमार मंगत पाठक आणि अभिषेक पाठक यांनी केली आहे. या चित्रपटाची शूटींग उझबेकिस्तान, केरळ आणि मोरक्कोमध्ये झाली आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही. या चित्रपटाच्या प्रदर्शनाचे हक्क निर्मात्यांनी ‘डिस्ने हॉटस्टार’ला १० कोटींना विकले आहेत.
-
दिग्दर्शक करण जोहरचा ‘गुंजन सक्सेना- द कारगिल गर्ल’ हा चित्रपट देखील नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. कारगिल युद्धात गुंजन फ्लाईट लेफ्टनंट श्रीविद्या राजनसोबत लढाऊ विमान उडवणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या होत्या. कारगिल युद्धात पाकिस्तानी सैन्यदलाकडून भारतीय सैनिकांवर निशाणा साधण्यात येत होता. त्या भागातूनच गुंजन यांनी लढाऊ विमान उडवत सैन्यदलातील जवानांना सुरक्षितरित्या बाहेर काढले होते. त्यामुळे त्यांच्या साहसाची कथा या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे.
-
‘गुंजन सक्सेना- द कारगिल गर्ल’ हा चित्रपट १२ ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच तिच्यासोबत पंकज त्रिपाठी, अंगद बेदी, विनीता कुमार आणि मानव विज हे कलाकार दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन शरण शर्मा करत आहेत. अंगद चित्रपटात जान्हवीच्या भावाच्या भूमिकेत दिसणार आहे. नेटफ्लिक्सने या चित्रपटाचे हक्क ५० कोटींना विकत घेतले आहेत.
-
‘अॅमेझॉन प्राइम’वर १२ जून रोजी दिग्दर्शक शूजित सिरकार यांचा ‘गुलाबो सिताबो’ चित्रपट प्रदर्शित झाला. अमिताभ बच्चन आणि आयुषमान खुराना यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होता. या चित्रपटाच्या निमित्ताने बिग बी आणि आयुषमान यांनी पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर केली आहे.
-
‘गुलाबो-सिताबो’मध्ये बिग बी आणि आयुषमान खुराना हे दोघं घरमालक आणि भाडेकरु यांची भूमिका साकारताना दिसतात. होय नाही म्हणता म्हणता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला. अमिताभ आणि आयुषमान यांच्या जोडीने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. हा चित्रपट ‘अॅमेझॉन प्राइम’ने ६५ कोटींना विकत घेतला होता.
-
अभिनेता अभिषेक बच्चन आणि मॉडेलिंग विश्वातून अभिनय क्षेत्राकडे वळलेली अभिनेत्री इलियाना डिक्रूझ यांची प्रमुख भूमिका असणारा ‘द बिग बूल’ हा चित्रपटही ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. हर्षद मेहता या शेअर बाजारातील नावाजलेल्या ब्रोकरची कथा या चित्रपटाच्या माध्यमातून सांगितली जाणार आहे. मेहता शेअऱ मार्केटमधील मोठा माणूस कसा झाला आणि नंतर त्याला उतरती कळा कशी लागील हे चित्रपटामधून दाखवण्यात येणार आहे.
-
‘द बिग बूल’ या चित्रपटाचे निर्माते अजय आणि कुमार मंगत यांनी प्रदर्शनाचे हक्क ‘डिस्ने हॉटस्टार’ला ४० कोटींना विकले आहेत. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
-
‘गोलमाल ३',’कलियुग’ या सारख्या चित्रपटात झळकलेला अभिनेता कुणाल खेमू प्रमुख भूमिकेमध्ये असणारा ‘लुटकेस’ या चित्रपटही ३१ जुलै रोजी प्रदर्शित झाला. ‘लुटकेस’ हा कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटात कुणालसोबत रसिका दुगल, रणवीर शौरी, विजय राज हे कलाकार आहेत.
-
पैशांनी भरलेली एक बॅग हरवल्यानंतर काय गोंधळ उडतो आणि त्यामधून काय काय घडत जातं याची मजेदार कथा या चित्रपटामधून प्रेक्षकांसमोर मांडण्यात आली आहे. फॉक्स स्टार स्टुडिओ निर्मित हा चित्रपट ‘डिस्ने हॉटस्टार’वर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाचे हक्क निर्मात्यांनी ‘डिस्ने हॉटस्टार’ला १० कोटींना विकले आहेत.
-
दिग्दर्शक महेश भट्ट यांचा ‘सडक’ हा हिंदी चित्रपटसृष्टीमधील कायम लक्षात राहणाऱ्या चित्रपटांपैकी एक आहे. प्रदर्शनानंतर प्रचंड गाजलेल्या या चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘सडक २’ या चित्रपटाच्या निमित्ताने महेश भट्ट यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट तब्बल २० वर्षानंतर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच हा चित्रपट ‘डिस्ने हॉटस्टार’वर प्रदर्शित होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
-
‘सडक’ चित्रपटात अभिनेत्री पूजा भट्ट मुख्य भूमिकेत होती आणि आता ‘सडक’च्या सिक्वेलमध्ये देखील पूजा महत्वाची भूमिका साकारणार आहे. पूजा भट्टसह आलिया देखील चित्रपटात झळकणार आहे. तसेच त्यावेळी चित्रपटात संजय दत्तची भूमिका ३२ वर्षांच्या व्यक्तीची होती आणि आता सडकच्या सिक्वेलमध्ये संजय दत्त ५४ वर्षांच्या व्यक्तीची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने आलिया पहिल्यांदाच वडीलांसोबत काम करणार आहे. ‘डिस्ने हॉटस्टार’ने हा चित्रपट ७० कोटींना विकत घेतला आहे.
-
अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा शेवटचा चित्रपट ‘दिल बेचारा’ हा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. ‘डिस्ने हॉटस्टार’वर २४ जुलै रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. यामध्ये सुशांतसोबत संजना सांघी अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली आहे.
-
जॉन ग्रीन यांच्या ‘द फॉल्ट इन अव्हर स्टार्स’ या कादंबरीवर आधारित ‘दिल बेचारा’ चित्रपटाची कथा आहे. यामध्ये सैफ अली खान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहे. मुकेश छाबडाने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. सुशांतचा शेवटचा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित व्हावा अशी चाहत्यांची इच्छा होती. मात्र लॉकडाउनमुळे हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला. हा चित्रपट फॉक्स स्टार इंडियाकडून . ‘डिस्ने हॉटस्टार’ने ४० कोटींना विकत घेतला आहे. या दोन्ही कंपन्या एकाच मोठ्या कंपनीचा भाग असल्याने या चित्रपटाचा सौदा इतक्या कमी किंमतीत झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र या चित्रपटासंदर्भातील उत्सुकता पाहता दोन्ही कंपन्याना याचा फायदाच होणार आहे.
-
गेल्या काही दिवसांपासून अभिनेता अक्षय कुमारचा आगामी चित्रपट ‘लक्ष्मी बॉम्ब’ जोरदार चर्चेत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन दाक्षिणात्य दिग्दर्शक राघव लॉरेन्स यांनी केले आहे. या चित्रपटाचे शूटिंग एप्रिल महिन्यातच सुरु झाले आहे. या चित्रपटात अक्षय कुमार आणि कियारा अडवाणी प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट तमिळ कॉमेडी भयपट ‘कंचना’चा रिमेक असून, चित्रपट डिस्ने हॉटस्टारवर रिलीज होणार आहे.
-
‘डिस्ने हॉटस्टार’ने ‘लक्ष्मी बॉम्ब’ या चित्रपटाचे हक्क १२५ कोटींना विकत घेतले आहेत. १५ ऑगस्टला हा चित्रपट ‘डिस्ने हॉटस्टार’वर प्रदर्शित होणार आहे.
-
बॉलिवूड अभिनेता अजय देवगण ‘भूज : द प्राइड ऑफ इंडिया’ हा चित्रपट घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. हा चित्रपट ‘डिस्ने हॉटस्टार’वर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अजय देवगणसोबत संजय दत्त आणि सोनाक्षी सिन्हा प्रमुख भूमिका साकारणार आहेत. १९७१ सालच्या भारत-पाकिस्तान युद्धावर हा चित्रपट आधारीत आहे. एका सत्य कथेवर हा चित्रपट आधारीत आहे. गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील माधापार गावातील ३०० महिलांची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. भारताला युद्धात विजय मिळवून देण्यासाठी या महिलांनी दिलेले योगदान कथेतून मांडण्यात आले आहे. अजय देवगणने या चित्रपटात इंडियन एअर फोर्सच्या पायलटची भूमिका साकारली आहे. या चित्रपटामध्ये अजय स्क्वाड्रन लीडर विजय कार्णिक यांची भूमिका साकारणार आहे.
-
‘भूज : द प्राइड ऑफ इंडिया’ हा चित्रपट येत्या १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार होता. पण देशभरात चित्रपटगृह बंद असल्यामुळे आता ‘डिस्ने हॉटस्टार’वर चित्रपट २९ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘डिस्ने हॉटस्टार’ने हा चित्रपट ११२ कोटींना विकत घेतला आहे.
OTT वरुनही कमाईची कोटी कोटींची उड्डाणे… दोन चित्रपट प्रदर्शनाआधीच ‘१०० कोटी क्लब’मध्ये
कोणत्या चित्रपटाचे हक्क किती कोटींना रुपयांना विकण्यात आले जाणून घ्या
Web Title: 10 bollywood films that were sold to ott platforms with deals that earned them insane profits scsg