भारताला दोन विश्वचषक जिंकून देणारा ‘कॅप्टन कूल’ महेंद्रसिंह धोनी याने शनिवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली. धोनीने क्रिकेटविश्वातील त्याचे वेगळेपण सातत्याने अधोरेखित केले. त्यामुळे त्याच्या निवृत्तीमुळे एका सुवर्णयुगाचा अस्त झाला आहे असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. महेंद्रसिंह धोनीच्या आयुष्यावर आधारित 'एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अभिनेता सुशांत सिंह राजपूतने धोनीची भूमिका साकारली होती. या बायोपिकसाठी सुशांतने धोनीसोबत खूप वेळ घालवला होता. दोघांनी मिळून चित्रपटाचं प्रमोशन केलं होतं. एका मुलाखतीत सुशांतला धोनीच्या निवृत्तीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी सुशांत म्हणाला, "योग्य वेळ आल्यावर धोनी निवृत्तीचा निर्णय घेईल. नेतृत्वाचे सर्व गुण धोनीच्या अंगी आहेत. त्याने दीर्घकाळासाठी देशाची सेवा केली आहे. निवृत्ती कधी घ्यायची याचा निर्णय धोनीपेक्षा उत्तम कुणीच घेऊ शकत नाही." सुशांतलाही क्रिकेटची फार आवड होती. मोठं झाल्यावर क्रिकेटर होण्याचं स्वप्न त्याने अनेकदा लहानपणी कुटुंबीयांना बोलून दाखवली होती. धोनीसारखा षटकार मारता यावा किंवा चित्रपटातील षटकाराचं दृश्य योग्य रितीने टिपता यावं, यासाठी सुशांतने फार मेहनत घेतली होती. यासाठी त्याने धोनीचे व्हिडीओ अनेकदा पाहिले होते. -
धोनीच्या निवृत्तीची चर्चा वारंवार होत असायची, परंतु शनिवारी धोनीने या निवृत्तीच्या चर्चांना पूर्णविराम दिला.
-
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली असली तरी इंडियन प्रिमियर लीग खेळत राहणार असल्याचे धोनीने स्पष्ट केले.
धोनीच्या निवृत्तीबाबत सुशांतने दिली होती ‘ही’ प्रतिक्रिया
Web Title: When sushant singh rajput talked about mahendra singh dhoni retirement ssv