सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून गौरवलेला 'किल्ला' हा अविनाश अरुण या तरुण दिग्दर्शकाचा पहिलाच चित्रपट आणि तोदेखील थेट राष्ट्रीय पुरस्काराची मोहर उमटवलेला. पदार्पणातच हे यश मिळवणाऱ्या अविनाशनने नुकतंच 'पाताल लोक' या वेब सीरिजचं दिग्दर्शन केलं. -
अत्यंत साधेपणाने वावरणाऱ्या अविनाशच्या रक्तात चित्रपट पूर्णपणे भिनला आहे. अविनाशच्या या प्रवासामागे त्याच्या वडिलांची प्रेरणा आहे.
दहावीपासूनच अविनाशला एफटीआयआयमध्ये शिकण्याचं कुतूहल होतं. त्यावेळी एफटीआयआयमध्ये व्हिडीओग्राफीच्या बारा दिवसांच्या कोर्सला केवळ बाराच विद्यार्थ्यांना प्रवेश होता. ही त्याची संधी हुकली. पण वेस्टर्न क्लासिकल म्युझिक अप्रिसिएशनच्या कोर्सच्या माध्यमातून तो एफटीआयआयमध्ये शिरला आणि विषयाची तळमळ पाहून व्हिडीओग्राफीच्या कोर्सचा तेरावा विद्यार्थी म्हणून त्याला प्रवेश मिळाला. अविनाशने सुमित्रा भावेंच्या एका चित्रपटासाठी सेटिंग बॉय म्हणूनदेखील काम केलं. उमेश कुलकर्णीबरोबरदेखील अनेक कामं केली. त्यांच्या 'गिरणी' लघुपटासाठी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केलं. पोटापाण्यासाठी म्हणून लग्नाची फोटोग्राफीदेखील केली. फोटोग्राफी स्टुडिओ सुरू करता यावा म्हणून महाराष्ट्र शासनाच्या लघुउद्योजक योजनेअंतर्गत कोर्सदेखील केला. अविनाशचं असं ठाम मत आहे की, जे काही अनुभवलंय, पाहिलंय, उमजलंय तेच चित्रपटात मांडायला त्याला आवडतं. अर्थात त्याला सिनेमॅटोग्राफीकडून थेट दिग्दर्शनाकडे वळताना काही विरोधाच्या प्रतिक्रिया जाणवल्या. 'किल्ला' या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी आणि दिग्दर्शन अविनाशचंच आहे. 'किल्ला'नंतर त्याने 'दृश्यम', 'मसान', 'मदारी', 'हिचकी', 'कारवां' यांसारख्या दमदार चित्रपटांसाठी सिनेमॅटोग्राफर म्हणून काम केलं. 'पाताल लोक' या वेब सीरिजच्या माध्यमातून त्याने वेब विश्वात दमदार पदार्पण केलं. अविनाश अरुण आणि प्रोसित रॉय या दोघांनी मिळून या वेब सीरिजचं दिग्दर्शन केलं. -
'पाताल लोक'च्या ४५० पानांच्या स्क्रिप्टसाठी अविनाशसमोर ९५ ते १०० दिवसांत शूटिंग पूर्ण करण्याचं आव्हान होतं.
अविनाशने कादंबरी कदम या अभिनेत्रीशी २०१६ मध्ये लग्नगाठ बांधली. या दोघांना एक मुलगा असून त्याचं नाव कार्तिक आहे. (सर्व छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम, कादंबरी कदम)
‘किल्ला’ ते ‘पाताल लोक’.. मराठमोळा दिग्दर्शक अविनाश अरुणची यशस्वी झेप
Web Title: Killa to paatal lok marathi director avinash aruns commendable journey ssv