करोना प्रार्दुभावाचा मोठा फटका कलाविश्वाला बसला. जवळपास तीन-चार महिन्यांनंतर अटीशर्तींच्या आधारावर पुन्हा शूटिंग सुरू झाले. त्यामुळे आता बऱ्याच नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. मराठीत जवळपास आठ नव्या मालिका सुरू होत आहेत. पाहुयात त्या कोणत्या आहेत… मुलगी झाली हो- स्टार प्रवाह वाहिनीवर ‘मुलगी झाली हो’ ही नवी मालिका सुरु होत आहे. या मालिकेतून स्त्री-भ्रुण हत्येसारख्या भावनिक विषयावर भाष्य करण्यात येणार आहे. त्यात श्रावणी पिल्लई, किरण माने आणि सविता मालपेकर यांच्या मुख्य भूमिका आहेत. दख्खनचा राजा ज्योतिबा- निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते महेश कोठारे ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. कोल्हापूर चित्रनगरीत ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ या आगामी मालिकेचा भव्यदिव्य सेट लवकरच उभा राहणार असून स्टार प्रवाह आणि कोठारे व्हिजन्सची टीम या नव्या पौराणिक मालिकेसाठी जोमाने कामाला लागली आहे. सुंदरा मनामध्ये भरली- ही मालिका ३१ ऑगस्टपासून सोमवार ते शनिवार रात्री ९.00 वाजता कलर्स मराठी वाहिनीवर सुरू होणार आहे. या मालिकेत 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेत्री अक्षया नाईक व समीर परांजपे मुख्य भूमिका साकारत आहेत. सख्खे शेजारी- 'घाडगे अँड सून' या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता चिन्मय उदगीरकर लवकरच 'सख्खे शेजारी' या मालिकेतून पुनरागमन करत आहे. या कार्यक्रमात तो महाराष्ट्रातील विविध कुटुंबीयांची भेट घेणार आहे. देवमाणूस – झी मराठी वाहिनीवरील ही मालिका प्रोमोमुळे सध्या फार चर्चेत आहे. अभिनेता किरण गायकवाड यात डॉक्टरच्या भूमिकेत असून मालिकेची कथा सत्यघटनांवर आधारित आहे. डान्सिंग क्वीन- डान्सवर आधारित हा रिअॅलिटी शो यंदा एका अनोख्या संकल्पनेसह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ७० किलोपेक्षा अधिक वजन असलेल्या महिलाच यामध्ये भाग घेऊ शकणार आहेत. स्वामी समर्थ- 'जय जय स्वामी समर्थ' ही आध्यात्मिक मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. फुलाला सुगंध मातीचा- हर्षद अटकरी आणि समृद्धी केळकर यांची मुख्य भूमिका असलेली ही मालिका येत्या २ सप्टेंबरपासून स्टार प्रवाह वाहिनीवर सुरू होत आहे.
देवमाणूस ते दख्खनचा राजा ज्योतिबा… या नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला
Web Title: Devmanus to dakkhanacha raja jyotiba 8 new marathi tv shows set to entertain soon ssv