-
आपल्या आवाजाने लाखो लोकांच्या गळ्यातला ताईत झालेला लकी अली यांचा आज वाढदिवस.
लकी यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक हिट गाणी दिली. दीपिका पदुकोण आणि रणबीर कपूर यांच्या ‘तमाशा’ सिनेमात लकी अली यांनी गायलेले ‘सफरनामा…’ हे गाणे आजही अनेकांच्या तोंडावर आहे. त्यांनी अशा अनेक गाण्यांना आपला आवाज देऊन ती गाणी अजरामर केली आहेत. लकी अली यांचे खरे नाव मकसूद मेहमूद अली आहे. प्रसिद्ध विनोदी अभिनेते मेहमूद यांचे ते सूपुत्र. पण एक वेळ अशी होती की लकी यांनी आपल्या वडिलांनाच ओळखले नाही. त्याचे झाले असे की, ११ वर्षे ते बोर्डिंगमध्ये राहत होते आणि मेहमूद हे कामात व्यग्र असल्यामुळे त्यांची भेट व्हायची नाही. लकी कुटुंबातील अनेक लोकांना ओळखायचेच नाहीत. त्यामुळे जेव्हा ते घरी आले तेव्हा त्यांनी आपल्या वडिलांना ओळखलेच नाही. वडील कामात सतत व्यग्र असल्यामुळे त्यांचा एकमेकांशी फारसा संबंध आला नाही. लकी अली यांना पाच मुलं असून त्यांनी आतापर्यंत तीन लग्न केली आहेत. लकी यांनी पहिलं लग्न त्यांच्या अल्बममधील सहकलाकार मेघन जेन मॅकक्लिअरीसोबत केलं. 'सुनो' या अल्बममध्ये दोघांनी एकत्र काम केलं होतं. मात्र दोन मुलांचे पालक झाल्यानंतर हे दोघं विभक्त झाले. त्यानंतर लकी यांनी दुसरं लग्न इनायाशी केलं. इनायाकडूनही लकी यांना दोन मुलं आहेत. लकी यांनी शेवटचे लग्न २०१० मध्ये इंग्लडच्या केट एलिझाबेथ हलामशी केले. त्यावेळी ते ५२ वर्षांचे होते. सध्या ते लाइमलाइटपासून फार दूर आहेत. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की, बॉलिवूडमध्ये ज्येष्ठ कलाकारांचा सन्मान केला जात नाही. लकी यांना एकांतात राहणं फार पसंत आहे. त्यांना स्वतःहून बॉलिवूडमध्ये पुन्हा यायचे नाही असे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. आपलं खासगी आयुष्य प्रसारमाध्यमांसमोर आणणं त्यांना फारसं पसंत नाही. म्हणूनच ते बॉलिवूडपासून दूर राहणं पसंत करतात. लकी अली यांना निसर्गाच्या सानिध्यात राहणे फार आवडते. त्यामुळेच झगमगाटापासून लांब राहून ते शेतीही करतात. त्यांचे एक कुटुंब न्यूझीलंडमध्ये राहते. त्यांची एक पत्नी न्यूझीलंडची असून एक मुलगा आणि मुलगी दोघेही न्यूझीलंडमध्येच शिक्षण घेत आहेत. तिथेच ते छोटेखानी शेतीही करतात. त्यांनी बंगळुरूमध्ये मुलींसाठी एक शाळा सुरू केली आहे. (सर्व छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम)
प्रसिद्ध गायक लकी अली यांनी ५२व्या वर्षी केलं तिसरं लग्न; आता करत आहेत शेती
Web Title: Safarnama singer lucky ali working in agriculture field read about his personal life ssv