'आई माझी काळुबाई' या मालिकेतून अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडला काढून टाकण्यात आलं. तिच्या जागी आता अभिनेत्री वीणा जगताप मालिकेत भूमिका साकारताना दिसणार आहे. प्राजक्ताला तडकाफडकी काढून टाकण्यामागचं कारण मालिकेच्या निर्मात्या व अभिनेत्री अलका कुबल यांनी सांगितलं. 'राजश्री मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत अलका कुबल यांनी प्राजक्तावर अनेक आरोप केले. "सेटवर आल्यावर प्राजक्ताचे सतत नखरे सुरू असायचे. मध्येच डोकं दुखतं म्हणायची, मध्येच शूटिंग थांबवायला सांगायची, मध्येच रडत बसायची. शरद पोंक्षे आणि मालिकेतील इतर कलाकारांनी मला अनेकदा प्राजक्ताला काढून टाकण्याचा सल्ला दिला होता. पण मी तिला समजून घेतलं", असं त्यांनी सांगितलं. प्राजक्ता दोन, चार तर कधी कधी सहा तास रुममधून बाहेर येत नसल्याची तक्रार अलका यांनी केली. "सगळे तिची वाट पाहत बसायचे. आशालता यांच्यासारखे ज्येष्ठ कलाकार तिच्यासाठी थांबायचे. तिला कसलीच लाज नाही", अशा शब्दांत त्यांनी राग व्यक्त केला. "सेटवर सगळ्यांना दम देणे, नखरे करणे हे तिचं सुरूच असायचं. शूट सुरू झाल्यावर पण तिच्या चेहऱ्यावर पश्चात्तापाचा लवलेश नसायचा. तिच्यामुळे नाइलाजाने रात्री शूट करावं लागायचं. या कलाकारांमध्ये एवढी हिंमत कुठून येते, कोणाच्या जिवावर माज करतात", अशा शब्दांत त्या भडकल्या. प्राजक्ताला समज देऊन दुसऱ्यांदा संधी देण्यात आली होती. मात्र तरीही तिच्या वागणुकीत काही बदल न झाल्याने तिला मालिकेतून काढून टाकण्याचा निर्णय घेतल्याचं अलका यांनी स्पष्ट केलं. वाहिनीकडून, मालिकेतील ज्येष्ठ कलाकारांकडून अनेकदा प्राजक्ताला समज देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. प्राजक्ताचं हेकेखोर वागणं तिच्या अंगाशी आल्याची प्रतिक्रिया अनेकजण सोशल मीडियावर देत आहेत. या संपूर्ण प्रकरणावर अद्याप प्राजक्ताने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. -
सोनी मराठी वाहिनीवरील 'आई माझी काळूबाई' या मालिकेच्या निर्मात्या अलका कुबल असून मालिकेत त्या महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत.
“तिला लाजच नाही”; प्राजक्ता गायकवाडवर भडकल्या अलका कुबल
Web Title: Prajakta gaikwad unprofessional attitude forced us to axe her from aai mazi kalubai says alka kubal ssv