-
‘खुलता कळी खुलेना’मालिकेतून मानसी देशपांडेच्या भूमिकेतून अभिनेत्री मयुरी देशमुख(Mayuri Deshmukh) घराघरांत पोहोचली.
-
अभिनेत्री मयूरी देशमुखने नुकतीच सुलेखा तळवलकर यांच्या दिल के करीब या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत सुलेखा तळवलकर यांनी मयूरीला विचारले की, तू आयुष्यात खूप चढ-उतार बघितलेस. खूप चांगल्या-वाईट प्रसंगांना सामोरी गेली आहेस. तू ते कसं हॅण्डल करतेस?
-
यावर बोलताना मयुरी देशमुखने म्हटले, “मुळात अशी परिस्थिती मी फक्त हॅण्डल करते, असं मी म्हणू शकणार नाही. मला असं वाटतं की, वेळोवेळी बऱ्याच लोकांची मला मदत झाली आहे. माझा एक सकारात्मक दृष्टिकोन आहे, त्याची मदत होते.”
-
“जेव्हा जेव्हा खच्चीकरण होतं, तेव्हा ती ऊर्जा कुठून तरी घ्यावी लागते, असं मला वाटतं. माझ्या आयुष्यात चांगल्या ज्या घटना घडल्या आहेत, त्याचंही श्रेय मी एकटी घेऊ शकत नाही आणि ज्या वाईट घटना घडल्या आहेत, त्यातून मी बाहेर पडले, त्याचंही माझं श्रेय नाही.”
-
“कारण- मला असं कधी कधी वाटतं की, देवाला माहितेय की, आपल्यात किती क्षमता आहे किंवा आपण कशातून बाहेर पडू शकू की नाही, आपल्यात केवढी शक्ती आहे. त्याच पद्धतीची, तीच परीक्षा देव तुम्हाला देतो. त्या वेळेस आपल्याला वाटतं की, काय अन्यायकारक आहे किंवा असं कसं, एवढी मोठी परीक्षा माझ्या वाट्याला कशी काय? पण त्या वेळेस त्याने माझ्या आजूबाजूला खूप चांगली लोकं पेरली होती.”
-
पुढे बोलताना अभिनेत्रीने म्हटले, “उदाहरण द्यायचं, तर मला त्या क्षणी किंवा काही काळात असं वाटलं होतं की, आपल्याला ना डोंगरावरून खाली दरीत कोणीतरी ढकललंय आणि खाली पडताना जे काही अनुभव येतात की ती भीती, हतबलता सगळं मी अनुभवलंय.”
-
“पण, खाली ना एक जाळी ठेवली होती आणि मी त्या जाळीवर पडले. त्यामुळे मला लागलं नाही. पण, मी ते पडणं अनुभवलं. मला असं वाटतं, ती जी जाळी होती, ती तुम्ही ज्या गोष्टीला मानता ती आपण ती दैवी शक्ती म्हणूया. काही लोक आशावाद म्हणतात; पण ती खूप मजबूत अशी जाळी होती. अर्थात, तो मित्रपरिवार असेल किंवा माझं कुटुंब असेल.”
-
“मला असं वाटतं की त्या जाळीमुळे आणि मी स्वत: प्रयत्न सोडले नाहीत, जेव्हा जेव्हा मला वाटलं की मी खड्ड्यात चाललीय, काळोखात कुठेतरी चाललीय, आपल्याला कळत नाहीये की काय होतंय. मी दिशाहीन होतेय, असं जेव्हा वाटायला लागतं, तेव्हा मी खूप प्रयत्न करते. मी सगळ्या पातळ्यांवर प्रयत्न करते.”
-
“खूप चांगले लोक होते; पण मी जर प्रयत्न केले नसते, तर त्याचा काही उपयोग झाला नसता. ते लोक ५० पावलं आली, तर ५० पावलं तुम्हालाही चालावी लागतात. ते बळ, ती शक्ती एकवटावी लागते.” (सर्व फोटो सौजन्य: मयुरी देशमुख इन्स्टाग्राम)
“मी जर प्रयत्न…”, ‘खुलता कळी खुलेना’फेम अभिनेत्री आयुष्यातील चढ-उताराविषयी बोलताना काय म्हणाली?
Mayuri Deshmukh: लोकप्रिय अभिनेत्री मयुरी देशमुख नेमकं काय म्हणाली?
Web Title: Khulta kali khulena fame mayuri deshmukh on how she deals with ups and downs of life nsp