-
सिंहांसाठी दक्षिण आफ्रिकेला जगात ओळखलं जातं. याच आफ्रिकेच्या जंगलात सिंहाने एका वाइल्ड लाइफ रिसर्चरवर हल्ला केला, तर सिंहाच्या तावडीतून सुटण्यासाठी त्या रिसर्चरनेही थेट जंगलाच्या राजाच्याच नाकावर जोरदार ठोसा दिल्याची अंगावर थरकाप उडवणारी घटना घडली आहे. काही दिवसांपूर्वी National geographic society द्वारे वाइल्ड बर्ड ट्रस्टचे आठ जण बोट्सवानाच्या जंगलात रिसर्च करण्यासाठी गेले होते. त्यातील ३२ वर्षांच्या गोट्स नीफ यांनी जीवनातील सर्वात खतरनाक आणि जीवघेण्या अनुभवाचा सामना केला.
-
७ डिसेंबर रोजी रात्री जवळपास दीड वाजण्याच्या सुमारास तंबूत झोपलेले असताना त्यांना तंबूबाहेर एका प्राण्याची सावली दिसली. हल्ला होण्याची शक्यता ओळखून त्यांनी तंबूमधूनच पूर्ण ताकद लावून एक जोरदार ठोसा सिंहाच्या नाकावर मारला. अर्थात सिंहानेही त्यांच्यावर प्रतिहल्ला केला आणि शिकारीसाठी त्यांच्यावर झडप घातली.
-
गोट्स नीफचे सहकारी आणि दक्षिण अफ्रीकेच्या केपटाउनचे रहिवासी डॉ. रेनर वोन ब्रँडिस हे त्यावेळी बाजूच्याच तंबूत झोपले होते. नीफच्या किंकाळ्या ऐकून ते बाहेर आले. त्याच्या किंकाळ्या ऐकून तो खूप अडचणीत असल्याचं लगेच कळलं आणि मी धावत बाहेर आलो. माझ्या हातात फक्त हेड टॉर्च होती, असं डॉ. ब्रँडिस यांनी सांगितलं.
-
ही घटना सांगताना ब्रँडिस पुढे म्हणाले की, नीफ यांच्या तंबूबाहेर सिंह दिसला, त्याचा एक पंजा नीफ यांच्या शरीरावर होता आणि तो सिंह नीफवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत होता. तर नीफचा सातत्याने सिंहाचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न सुरू होता.
-
मी जवळच पडलेलं हत्तीचं शेण, झाडांच्या फांद्या सिंहावर फेकल्या पण त्याचा सिंहावर काहीही परिणाम झाला नाही. आता तो सिंह नीफ यांच्या हाताच्या कोपरापर्यंत पोहोचला होता आणि त्याला खाण्याचा प्रयत्न करत होता.
-
आम्ही दोघंही ओरडत होतो, मी एका काठीने सिंहावर हल्ला केला पण भूकेने व्याकूळ असलेल्या त्या वृद्ध सिंहाला काहीही फरक पडला नाही. इतक्यात आमच्या हेड रेंजरने सिंहावर फ्लॅश बँगर फेकला. फ्लॅश बँगरमुळे खूप मोठा आवाज होतो आणि काही सेकंदांसाठी जबरदस्त प्रकाश पसरतो. त्या प्रकाशामुळे सिंहाचे डोळे दिपले.
-
पण थोड्याच वेळात तो सिंह परत उठला आणि नीफवर हल्ला केला. मी आणि आमचा हेड रेंजर दोघंही लँडक्रूजर गाडीत चढलो आणि थेट त्या सिंहावर गाडी चढवून त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत होतो.
-
तीन-चार वेळेस अंगावर गाडी नेल्यानंतर कुठे त्या सिंहाने नीफवरील आपली पकड सोडली आणि जंगलाच्या दिशेने धूम ठोकली.
-
त्यानंतर आम्ही तातडीने नीफला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. सिंहाने केलेल्या हल्ल्यात नीफ यांना १६ ठिकाणी घाव झालेत, तसेच हाताला फ्रॅक्चरही झाले आहे. सध्या त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून प्रकृतीत सुधारणा होत आहे.
-
दरम्यान, म्हातारा सिंह आजारी आणि भूकेला होता. वृद्ध असल्याने जंगलातील तरुण सिंहांनी त्याला उपाशी ठेवलं होतं. उपाशी असल्याने त्याने हल्ला केला अशी माहिती समोर आली आहे. थरकाप उडवणाऱ्या या घटनेनंतर तेथील पर्यटन मंत्रालयाच्या वन्यजीव आणि राष्ट्रीय उद्यान संचालनालयाने घटना आणि परिस्थितीचं काळजीपूर्वक परीक्षण केल्यानंतर सिंहाला ठार मारण्याचे आदेश दिले. त्यानुसार नंतर त्या सिंहाला ठार मारण्यात आलं. सर्व (फोटो सौजन्य – फेसबुक अकाउंट- Dirk Heinrich Photo Library – DHPL)
थरार ! शिकार करायला आला जंगलाचा राजा; झडप घालणार इतक्यात ‘त्याने’ सिंहाच्याच नाकावर दिला ठोसा
जीव वाचवण्यासाठी थेट सिंहासोबत भिडला, पूर्ण ताकदीने सिंहाच्या नाकावर दिला ठोसा; अंगावर हत्तीचं शेणही फेकलं
Web Title: Wildlife researcher punches a lion in the face as it tries to eat him in botswana sas