-
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने समाजातील विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवलेल्या महिलांचे हे विचार तुम्हाला नक्कीच प्रेरणा देतील.
-
समाज नेहमी महिलांच्या शारीरिक कमजोरीबद्दल बोलतो, पण महिलांना खरोखरच बळकट आणि स्थिर हातांची नैसर्गिक देणगी असते. या देणगीबाबत मुलांनी आकस बाळगू नये. – मीरा बोरवणकर, आयपीएस अधिकारी
-
तुमच्या निर्णयाची जबाबदारी तुम्ही स्वत: घेतली पाहिजे; मग तो निर्णय चुकीचा असेल किंवा बरोबर असेल; पण जबाबदारी घेत नाही तोपर्यंत तुमच्यात सुधारणा होणार नाही. चुकीच्या निर्णयातून नवीन गोष्टी शिकता येतात, विचारप्रक्रिया विकसित होत जाते. – मीनल रोहित, वैज्ञानिक आणि अभियंत्या
-
आपण वेगळ्या देशात जातो तेव्हा नवीन संस्कृती शिकण्याची, त्यात समरसून जाण्याची संधी मिळते. त्यामुळे मनाची कवाडं खुलतात. वेगळ्या वातावरणात, वेगळं काही तरी शिकण्याची प्रक्रिया खूप महत्त्वाची आहे असं मला वाटतं. सर्जनशील लोकांशी संबंध खूप काही शिकवून जातात. – अश्विनी भावे, अभिनेत्री
-
कुठलीही नवी कल्पना मनात ठेवू नका. कोण काय म्हणेल, कसं होईल वगैरे विचार न करता ती प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करा. अपयश कुणाला चुकलं नाहीय. पण त्याची भीती बाळगून बसलात तर मात्र हाती काहीच लागणार नाही. – प्रीता सुखटणकर, उद्योजिका
-
कपडे कुठलेही असोत साडी, शॉर्ट्स, स्कर्ट किंवा जीन्स तुमचं त्यातलं व्यक्तिमत्त्व महत्त्वाचं. ते लोकांसमोर घेऊन जाताना आत्मविश्वास हवा आणि आपलं व्यक्तिमत्त्व जोखलं जातंय याचं भानही ठेवलं पाहिजे. – प्रिया बापट, अभिनेत्री
-
कामाच्या ठिकाणी तुम्ही फक्त प्रोफेशनल असता. मी स्त्री आहे म्हणून मला सवलत द्या असं कुणी म्हणू नये. मुलींनीही तितक्याच आक्रमकपणे, तितक्याच मनापासून आणि तितक्याच मेहनतीनं काम केलं पाहिजे. – सुलज्जा फिरोदिया मोटवानी, उद्योजिका
-
आपल्यामध्ये कुठले गुण आहेत, याची आपल्याला जाण हवी. आपल्या क्षमतेची जाणीव आपल्याला झाली की अनेक गोष्टी सहजसाध्य होतात. – मनीषा पाटणकर-म्हैसकर, सनदी अधिकारी
-
ती मॉडेल आहे आणि तिने तोकडे कपडे घातले आहेत म्हणजे ती ‘अॅव्हेलेबल’ आहे, असा समज करून घेऊ नये. पुरुषांनी स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपल्या देशात वेगळा आहे. तो बदलला पाहिजे. – अमृता पत्की, मॉडेल-अभिनेत्री
-
नियमित रियाज, आपल्या नृत्यावरची निष्ठा आणि त्याचा घेतलेला ध्यास यामुळे नृत्यात करिअर घडवू शकता, रिअॅलिटी शोमधून नव्हे. – शर्वरी जमेनीस, प्रसिद्ध नृत्यांगना आणि अभिनेत्री
-
तुम्ही काही चांगल्या गोष्टी करायला जाता, त्या वेळी ही गोष्ट चांगली आहे, हे कुणी तरी सांगणे हे त्या व्यक्तीसाठी फारच प्रोत्साहनपर ठरत असते. माझ्या मते, प्रोत्साहन हे सर्वात महत्त्वाचे असते. – सौम्या स्वामिनाथन, महिला ग्रँडमास्टर
Women’s Day 2021 : आयुष्याला प्रेरणा देणारे १० विचार
Web Title: Womens day 2021 special 10 inspirational and motivational quotes in marathi sdn