-

सामान्यतः फुप्फुसाचा कर्करोग ओळखण्यासाठी सततचा खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा वजन कमी होणे यांसारख्या लक्षणांकडे लक्ष दिले जाते. मात्र, काहीवेळा फुप्फुसातील गंभीर आरोग्य समस्यांची पहिली चिन्हे शरीराच्या इतर भागांवर, विशेषतः बोटांवर आणि नखांवर दिसू शकतात. या लक्षणांना दुर्लक्षित न करणे महत्त्वाचे आहे. (फोटो सौजन्य : पेक्सल्स)
-
‘फिंगर क्लबिंग’ किंवा ‘डिजिटल क्लबिंग’ म्हणजे बोटांची टोके सुजणे आणि नखांचा नैसर्गिक आकार बदलणे. ही स्थिती हळूहळू विकसित होते, ज्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात ती ओळखणे कठीण होते. बोटांचे टोक मोठे आणि फुगलेले दिसू लागतात, तसेच नखे खालच्या बाजूस जास्त वक्र होतात. (फोटो सौजन्य : पेक्सल्स)
-
या स्थितीत नखांखालील भाग (Nail Bed) मऊ वाटू लागतो आणि नखे सैल झाल्यासारखी वाटू शकतात. नखे टोकांवरून चमच्याप्रमाणे खाली वक्र होतात आणि त्यांच्या पायाकडील त्वचा चकाकणारी किंवा लालसर दिसू शकते. प्रगत अवस्थेत नखे जास्त वक्र होऊन चमकदार, चमच्यासारखा आकार घेतात. (फोटो सौजन्य : पेक्सल्स)
-
‘फिंगर क्लबिंग’ हे फुप्फुसाच्या कर्करोगाशी मोठ्या प्रमाणात जोडले गेलेले लक्षण आहे. सुमारे ८०% कर्करोगग्रस्त लोकांमध्ये हे लक्षण आढळते. तथापि, हे लक्षण सामान्यतः रोगाच्या अगदी सुरुवातीच्या काळात न दिसता, नंतरच्या टप्प्यात विकसित होते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
‘फिंगर क्लबिंग’चे नेमके कारण पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही, परंतु तज्ज्ञांच्या मते फुप्फुसातील कर्करोग किंवा इतर जुनाट फुप्फुसांच्या समस्यांमुळे रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी होते. यामुळे वाढीव घटक (Growth Factors) जास्त प्रमाणात तयार होतात, जे बोटांच्या टोकांमध्ये रक्तवाहिन्यांची वाढ आणि ऊती (Soft Tissue) जमा होण्यास उत्तेजन देतात. (फोटो सौजन्य : पेक्सल्स)
-
‘फिंगर क्लबिंग’ची तपासणी करण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे ‘शमरोथ साइन’ चाचणी. आपल्या दोन्ही तर्जनी बोटांची नखे समोरासमोर जोडा. सामान्य स्थितीत, नखांच्या बेचक्यात एक लहान हिऱ्याच्या आकाराची पोकळी दिसते. जर तुमच्या बोटांमध्ये ही पोकळी नसेल आणि बोटे सपाट टेकली, तर ते ‘फिंगर क्लबिंग’चे लक्षण असू शकते आणि तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. (फोटो सौजन्य : पेक्सल्स)
-
फक्त ‘फिंगर क्लबिंग’च नव्हे, तर बोटांवर दिसणाऱ्या इतर काही लक्षणांकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. यात नखांना निळसर छटा (Cyanosis), बोटांना सूज किंवा पाणी जमा होणे, नखांवर कंगोरे किंवा रेषा दिसणे, तसेच बोटांमध्ये वेदना, बधिरता किंवा मुंग्या येणे यांचा समावेश असू शकतो. (फोटो सौजन्य : पेक्सल्स)
-
फुप्फुसाचा कर्करोग हे ‘फिंगर क्लबिंग’चे एक प्रमुख कारण असले तरी हे लक्षण इतर गंभीर आरोग्य स्थितींमध्येही दिसून येते. यामध्ये जुनाट फुप्फुसाचे संक्रमण (उदा. सिस्टिक फायब्रोसिस), यकृताचे सिरोसिस (Cirrhosis) आणि इतर काही प्रकारचे कर्करोग यांचा समावेश आहे. विशिष्ट औषधे आणि कर्करोगाच्या उपचारांमुळेदेखील नखांच्या स्वरूपात बदल होऊ शकतो. (फोटो सौजन्य : पेक्सल्स)
-
नखे किंवा बोटांमध्ये कोणताही बदल दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
फक्त ५ सेकंदांची ‘ही’ टेस्ट करा! बोटांची नखं सांगतील तुम्हाला फुप्फुसाचा कर्करोग आहे की नाही?
बोटांवर सूज आणि नखांचा बदलता आकार: घरच्या घरी करा ‘डायमंड टेस्ट’ आणि धोक्याची घंटा वेळीच ऐका
Web Title: Lung cancer fingernail test five second check early detection health awareness svk 05