-
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी नुकताच हमसफर एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. या एक्सप्रेसमधील सर्व डबे एसी थ्री टियरचे असून या गाडीची घोषणा रेल्वे अर्थसंकल्पात करण्यात आली होती. सर्वसामान्यांना दर्जेदार सुविधा देण्याचा हा एक प्रयत्न असून एक्सप्रेसमध्ये एकूण २२ डबे असतील. या अलिशान एक्सप्रेसची सैर करुया फोटोच्या माध्यमातून… (सर्व छायाचित्र: स्मृती जैन)
-
हमसफर एक्सप्रेसचा बाह्यभाग हा आकर्षक असून व्हिनाइल कोटींगचे सुरक्षाकवचही या डब्यांना देण्यात आले आहे. एक्सप्रेसमध्ये जेवणाची सुविधा आहे, मात्र त्यासाठी प्रवाशांना पैसे मोजावे लागतील.
-
हमसफर एक्सप्रेसमधील आसनव्यवस्था नवीन आणि आरामदायी आहे. बर्थच्या प्रत्येक कॉलमजवळ लॅपटॉप आणि मोबाईल चार्जिंगची व्यवस्था आहे. याशिवाय प्रत्येक कॅबिनमध्ये कच-याचा डबा असणार आहे. याशिवाय बर्थजवळील आरसा हा न फुटणारा आहे.
-
डब्यात दुर्गंधी येणार नाही याचीदेखील दक्षता घेण्यात आली आहे. प्रत्येक डब्यात आगीची सुचना देण्याची व्यवस्था असून आसनक्रमांक हे ब्रेल लिपीमध्ये असतील. प्रत्येक बर्थजवळ बॉटल ठेवण्याची सुविधा असेल.
-
हमसफर एक्सप्रेसमध्ये जीपीएस प्रणालीवर आधारित प्रवाशांना माहिती देणारी सुविधाही आहे. यानुसार प्रवाशांना गाडीचे नेमके ठिकाण आणि पुढील स्टेशन किती अंतरावर आहे याची अचूक माहिती मिळेल.
-
हमसफर एक्सप्रेसमधील प्रत्येक डब्यात मिनी पेंट्री कोच असेल. रेल्वेतर्फे प्रत्येक डब्यात चहा,कॉफी आणि सूपचे मशिन लावण्यात आले आहे. यामुळे प्रवास आणखी चांगला होणार आहे.
-
कॉफीच्या मशिनखाली विशिष्ट जागा ठेवण्यात आली आहे. या ठिकाणी पदार्थ गरम राहावेत यासाठी विशेष ट्रे ठेवण्यात येतील. याशिवाय थंड पदार्थांसाठी छोटे फ्रिजदेखील असेल.
-
प्रत्येक डब्यातील साईड बर्थलाही पडदे लावण्यात आले आहे. याशिवाय प्रवाशांना खादीने तयार केलेल्या चादरी दिल्या जातील. तसेच ट्रेनमध्ये एलईडी लाईट्सची सोय असेल.
-
एक्सप्रेसमधील प्रत्येक कॅबिनमध्ये पडदे असतील. त्यामुळे प्रवाशांची प्रायव्हसी जपली जाईल.
-
एक्सप्रेसमधील स्वच्छतागृहांमध्ये बायो टॉयलेटची सुविधा आहे. त्यामुळे रेल्वे ट्रॅक स्वच्छ राहतील. तसेच टॉयलेटमधील फ्लशला दुर्गंधीरोधक यंत्राशी जोडले जाईल. त्यामुळे प्रवाशाने फ्लश केल्यास स्वच्छतागृहात ऑटोमेटीक सुगंधी द्रव्य शिंपडले जाईल.
-
स्वच्छतागृहांच्या बाहेर आणि पेंट्रीलगतच्या जागेतील एका कोप-यात कच-याचा डबा आणि अग्निरोधक यंत्रणा असेल. दुस-या कोप-यात हात धुण्यासाठी वॉशबेसिन आणि आरसा असेल.
-
हमसफर एक्सप्रेसच्या प्रत्येक डब्यात ६ सीसीटीव्ही कॅमेर असतील. तर १४ स्मॉक अँड हिट डिटेक्शन यंत्रणाही असेल. सीसीटीव्ही कॅमेरे लावताना प्रवाशांची प्रायव्हसी कायम राहिल याची दक्षता घेण्यात आली आहे.
-
एक्सप्रेसमधील पॉवर कारची विशिष्ट रचना करण्यात आली आहे. यामुळे एक्सप्रेसमधील कर्मचा-यांना प्रत्येक कोचवरवर टॅबवर नियंत्रण ठेवणे शक्य होईल.
-
हमसफर एक्सप्रेस गोरखपूर – आनंदविहार (दिल्ली) या मार्गावर धावणार असून या मार्गावरील एक्सप्रेसचा संपूर्ण प्रवास रात्रीच्या वेळचा असेल.
-
पॉवर कारमध्ये उद्घोषणा प्रणाली असून या ट्रेनचे प्रवासी भाडे सामान्य एक्सप्रेसमधील एसी ३ टियरच्या भाड्यापेक्षा जास्त असेल.
हमसफर एक्सप्रेसमधील या १५ गोष्टींमुळे सर्वसामान्यांचा प्रवास होणार सुखकर
Web Title: Humsafar express 15 facts that make indian railways new luxury ac 3 tier train for common man super cool