-
संग्रहित छायाचित्र
-
३० जूननंतर सध्या महाराष्ट्रामध्ये लागू असणारे निर्बंध पुढील महिनाभर म्हणजेच ३१ जुलैपर्यंत कायम असणार आहेत. मात्र अशाप्रकारे लॉकडाउन आणि काही प्रमाणात निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय घेणारे महाराष्ट्र काही पहिले राज्य नाही. महाराष्ट्राच्या आधीच दोन राज्यांनी ३१ जुलैपर्यंत लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तर इतर काही राज्यांनी असेच प्रतिबंधात्मक निर्णय घेतले आहेत. जाणून घेऊयात कोणत्या राज्याने काय निर्णय घेतला आहे.
-
झारखंड: राज्य सरकारने ३१ जूलैपर्यंत लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे मुख्य सचिव सुखदेव सिंग यांनी यासंदर्भातील पत्रक काही दिवसांपूर्वीच जारी केलं आहे. जूनप्रमाणेच सर्व निर्बंध राज्यामध्ये पुढील सूचना मिळेपर्यंत लागू राहतील असं या पत्रकामध्ये नमूद करण्यात आलं आहे.
-
झारखंडमध्ये कंटेंटमेंट झोनव्यतिरिक्त इतर ठिकाणी कार्यक्रमांना राज्य सरकारने परवानगी दिली आहे. मात्र त्याचवेळी राज्यांतंर्गत आणि राज्याबाहेरील बस वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आलं आहेत. त्याचप्रमाणे धार्मिक स्थळे, सलून, मल्टीप्लेक्स, मॉल्स, स्विमिंग पूल, जीम आणि शैक्षणिक संस्था बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
-
आसाम: राज्यातील सर्वात मोठे शहर असणाऱ्या गुवहाटीबरोबरच कामरुप मेट्रोपोलिटन जिल्ह्यामध्ये सरकारने रविवारपासून (२८ जूनपासून) कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. संध्याकाळी सात वाजल्यापासून सकाळी सात वाजेपर्यंत राज्यामध्ये कर्फ्यु लागू करण्यात येणार असल्याचे आदेश शुक्रवारी (२६ जून रोजी) जारी करण्यात आले आहेत.
-
आसाममधील शहरी भागांमध्ये विकेण्डला म्हणजेच शनिवारी रविवारी कामरुप मेट्रोपोलिटन वगळता संपूर्ण राज्यात कडक निर्बंध असतील असंही सरकारने स्पष्ट केलं आहे. हे निर्बंध राज्य सरकारच्या पुढील नव्या आदेशांपर्यंत कायम राहणार आहेत.
-
पश्चिम बंगाल: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांनी मागील आठवड्यामध्येच राज्यातील लॉकडाउनचा कालावधी ३१ जुलैपर्यंत वाढवण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. शुक्रवारी म्हणजेच २६ जून रोजी ममतांनी परदेशातून तसेच देशभरातून कोलकात्यामध्ये येणाऱ्या विमान प्रवासाला स्थगिती द्यावी अशी मागणीही ममतांनी केली आहे.
-
पश्चिम बंगालमध्ये ३१ जुलैपर्यंत राज्यामध्ये विमान वाहतूक बंद ठेवावी असं ममतांनी म्हटलं आहे. ममता यांनी रात्रीच्या कर्फ्युच्या वेळात बदल केला असून ९ वाजण्याऐवजी राज्यात आता रात्री १० वाजल्यापासून पहाटे पाच वाजेपर्यंत कर्फ्यु कायम राहणार आहे. मात्र त्याच वेळी एक जुलैपासून कोलकात्यामधील मेट्रो सेवा सुरु करण्याबद्दलचे संकेत ममतांनी दिले आहेत.
-
तामिळनाडू: भारताच्या दक्षिणेतील या राज्याने चेन्नई, मदुराई सारख्या जिल्ह्यांबरोबरच चेंगेलपेठ, कांचिपूरम, तिरुवेल्लूरसारमधील काही भागांमध्ये कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या तरी हे निर्बंध ३० जूनपर्यंत असले तरी ते वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
-
३० जूनपर्यंत तामिळनाडूमधील अनेक ठिकाणी अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवा आणि सार्वजनिक ठिकाणांवर गर्दी होणाऱ्या कार्यक्रम आणि इतर सर्व सेवांवर बंदी घालण्यात आली आहे.
-
दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा लॉकडाउन लागू करण्यात येणार नाही असं स्पष्ट केलं आहे. मात्र दिल्लीमधील करोनाबाधिकांचा आकडा झपाट्याने वाटत आहे.
-
दिल्लीमध्ये लॉकडाउन पुन्हा लागू करण्यात येणार नसला तरी सर्व शाळा मात्र ३१ जुलैपर्यंत बंदच राहणार असून ऑनलाइन क्लासेसच्या माध्यमातून वर्ग भरवले जाणार आहेत.
-
तेलंगण: राज्यामध्ये मागील काही दिवसांपासून करोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. खास करुन मागील काही दिवसांमध्ये हैदराबादमधील रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे.
-
हैदराबादमधील करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी येथील दुकाने, बाजारपेठा आणि इतर ठिकाणी अनेकांनी स्वच्छेने पुढील सात ते दहा दिवसांपर्यंत उद्योग व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
-
कर्नाटक: राज्याचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी पूर्णपणे लॉकडाउन लावण्यात येणार नसल्याचे जाहीर केलं असलं तरी अनेक ठिकाणी देखरेख आणि गस्त वाढवण्यासंदर्भातील आदेश दिले आहेत.
महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांमध्येही वाढला लॉकडाउन
महाराष्ट्राने लॉकडाउन ३१ जुलैपर्यंत वाढवण्याबरोबरच अन्य राज्यांनाही काही महत्वाचे निर्णय घेतलेत
Web Title: Lockdown extended list of states that announce shutdown to contain covid 19 spread scsg