-
फ्रान्सच्या ‘शार्ली हेब्दो’ या साप्ताहिकाने प्रेषित मुहम्मद पैगंबर यांचे व्यंगचित्र छापल्याने नवीन वाद निर्माण झाला आहे. पाकिस्तानमध्ये ‘शार्ली हेब्दो’च्या या नव्या व्यंगचित्राचा निषेध करण्यासाठी हजारोंच्या संख्येने आंदोलक रस्त्यावर उतरल्याचे पहायला मिळाले. ( सर्व फोटो : AP (असोसिएट प्रेस) )
-
‘शार्ली हेब्दो’ या साप्ताहिकाच्या विरोधात पाकिस्तानमधील तहरीक-ए-लबैकने मोर्चा काढला. या मोर्चामध्ये 'शार्ली हेब्दो'विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. लाहोरमधील या धार्मिक गटाने काढलेल्या मोर्चाला स्थानिकांनी चांगलाच प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळालं. करोनाचे संकट असतानाही हजारोच्या संख्येने जमाव रस्त्यावर उतरला होता.
-
‘शार्ली हेब्दो’ने पाच वर्षांपूर्वीही प्रेषित मुहम्मद पैगंबर यांचे व्यंगचित्र प्रकाशित केलं होतं. त्यानंतर इस्लामी दहशतवाद्यांनी ७ जानेवारी २०१५ रोजी साप्ताहिकाच्या कार्यालयावर हल्ला करून १२ जणांचा बळी घेतला होता. मृतांमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचाही समावेश होता.
-
जानेवारी २०१५ मध्ये 'शार्ली हेब्दो'वर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जगभरामध्ये चर्चा झाली होती. ज्या व्यंगचित्रामुळे हा वाद निर्माण झाला होता तेच व्यंगचित्र पुन्हा प्रकाशित करण्यात आलं आहे. त्या दहशतवादी हल्ल्याची कायदेशीर प्रक्रिया आता पाच वर्षानंतर सुरु झाल्याच्या निमित्ताने पुन्हा हे व्यंगचित्र छापण्यात आलं आहे.
-
'शार्ली हेब्दो'ने दिलेल्या माहितीनुसार साप्ताहिकाचे दोन मुख्य पत्रकार या खटल्यासंदर्भातील वृत्तांकन करणार आहेत. हा खटला सुरु झाल्याची घटना ऐतिहासिक असल्याचे सांगत आम्ही ज्या व्यंगचित्रांमुळे भीषण हल्ला झाला ती पुन्हा छापली आहेत असंही 'शार्ली हेब्दो'ने म्हटलं आहे.
‘शार्ली हेब्दो’ने पुन्हा छापले ते वादग्रस्त व्यंगचित्र; पाकिस्तानमध्ये हजारो आंदोलकांनी केला निषेध
Web Title: Charlie hebdo again printed prophet mohammad cartoon strongly protests in pakistan scsg