-
वर्ष २०१९ मध्ये अजित पवारांबरोबर घेतलेला शपथविधी शरद पवारांशी चर्चा झाल्यानंतरच झाला होता, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीसांनी काल केला.
-
फडणवीसांच्या विधानाचा आज खासदार संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला. तसेच फडणवीसांनी त्यांच्या अटकेबाबत केलेला दावा आणि सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीबाबतही त्यांनी प्रतिक्रिया दिली.
-
देवेंद्र फडवीसांनी काल काही मोठा गौप्यस्फोट केला नाही. त्यांनी साधा लवंगी फटाकाही फोडला नाही. अडीच वर्षांपूर्वीचा कोळसा आता उगाळून काहीही अर्थ नाही. फडणवीसांनी आधी आमच्याशी विश्वासघात केला. त्यावर बोललं पाहिजे, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.
-
भाजपाने आम्हाला अडीच वर्ष मुख्यमंत्री पद देऊ केलं होते. तेव्हा त्यांनी ते दिलं नाही. आता अडीच वर्ष मिंधे गटाची टेस्टट्यूब बेबी मांडीवर घेऊन बसले आहेत. त्याचं उत्तर आधी फडणवीसांनी द्यावी, असा टोलाही त्यांनी लगावला.
-
मुख्यमंत्री पदाबाबत असं काही ठरलंच नव्हतं. हे म्हणायची हिंमत फडणवीसांनी करू नये. हेच त्यांच्या तोंडूनही निघालं आहे. त्यामुळे हे एक नंबरचे खोटारडे लोकं आहेत. त्याला खोटारडेपणा आम्ही रोज उघडा करू, असा इशाराही त्यांनी दिला.
-
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस हे जगातील दहावं आश्चर्य आहे. आधीच ८ आश्चर्य या जगात आहेत. आणखी दोन आश्चर्य दिल्लीत आहेत आणि एक आश्चर्य महाराष्ट्रात आहे, अशी उपाहासात्मक टीकाही त्यांनी केली.
-
यावेळी बोलताना, पुण्यातील पोटनिवडणुकीत त्यांना पराभव दिसतो आहे. त्यामुळे ते अशी विधानं करत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला. तसेच जर या शपथविधीला शरद पवारांची मान्यता असती, तर ते सरकार पाच वर्ष चाललं असतं, असेही ते म्हणाले.
-
महाविकास आघाडीने माझ्या अटकेसाठी प्रयत्न केले, असा दावाही फडणवीसांनी केला होता. त्यावरही संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली. फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत. ते अनेक वर्ष राजकारणात आहेत. विरोधीपक्ष नेते पदावर बसलेला व्यक्तीला तुरुंगात टाकण्याची परंपरा शिवसेनेची नाही. ही पंरपरा भाजपाची असू शकते, असे ते म्हणाले.
-
मुळात फडणवीसांना तुरुगांत जाण्याची भीती का वाटत होती? असं त्यांनी कोणता गुन्हा केली, की त्याचं मन त्यांना खात होते? असा प्रश्नही त्यांनी विचारला.
-
आमच्या सर्वांचे फोन टॅप करण्यात आले होते. हा मोठा गुन्हा आहे. मग फडणवीसांनी यासंदर्भात तपास सुरू असताना संबंधीत अधिकाविरोधातील कारवाई का थांबवली? त्यामुळे त्यांचं मन त्यांना खात आहे. स्वत:विषयी सहानुभूतीची लाट निर्माण करावी, हे त्यांचं स्वप्न होतं पण ते आम्ही पूर्ण होऊ दिलं नाही, असेही ते म्हणाले.
-
दरम्यान, महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत आजपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. याबाबतही त्यांनी प्रतिक्रिया दिली.
-
आमची शिवसेना शतप्रतिशत खरी आहे. आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे. न्यायव्यवस्था आपल्या खिशात आहे, असं कोणाला वाटत असेल तर हा न्यायव्यवस्थेचा अपमान आहे, असेही ते म्हणाले.
“बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही”, बलोच नेत्याकडून स्वातंत्र्याची घोषणा; भारतासह जगभरातील देशांकडे केली मोठी मागणी