-
भाजपाचे पुण्यातील खासदार गिरीश बापट यांचं निधन झालं आहे. ते ७२ वर्षांचे होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेल्या दीड वर्षांपासून त्यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, त्यांची प्राणज्योत मालवल्याची माहिती समोर आली आहे.
-
गिरीश बापट यांच्यावर संध्याकाळी सात वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहे, अशी माहिती जगदीश मुळीक यांनी दिली. गिरीश बापट यांच्यामागे पत्नी, मुलगा, सून आणि नात असा परिवार आहे.
-
गिरीश बापट हे जवळपास दीड वर्ष रुग्णालयात उपचार घेत होते. आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.
-
गिरीश बापट यांचा जन्म ३ सप्टेंबर १९५० रोजी पुण्यात झाला. तळेगाव दाभाडेमधून प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग येथून माध्यमिक शिक्षण पूर्ण केले.
-
बीएमसीसीत वाणिज्य शाखेची पदवी घेतल्यानंतर १९७३ मध्ये ते टेल्कोमध्ये कामगार म्हणून रुजू झाले. त्यानंतर दोन वर्षांत आणीबाणीच्या कालावधीमध्ये त्यांनी नाशिक जेलमध्ये १९ महिन्यांचा कारावास भोगला.
-
तुरुंगात शिक्षा भोगून आल्यानंतर गिरीश बापट यांच्या राजकीय कारकीर्दीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. बापट यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ आणि परिवारातील संस्थांतील विविध पदांची जबाबदारी अत्यंत यशस्वीपणे सांभाळली.
-
पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघात किंगमेकर अशी ओळख असणारे गिरीश बापट यांनी त्यांच्या राजकीय कारकीर्दीत संघ स्वयंसेवक, कामगार नेता, नगरसेवक, आमदार आणि खासदार अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.
-
गिरीश बापट हे मूळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते. यानंतर ते राजकारणात उतरले.
-
नगरसेवक या पदापासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या गिरीश बापट यांनी १९९५ साली पहिल्यांदा आमदारकीची निवडणूक लढवली. यानंतर ते २०१४पर्यंत सलग पाचवेळ आमदार म्हणून निवडून आले.
-
वर्ष १९९६ मध्ये भाजपाने त्यांना पुण्यातून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली. मात्र यावेळी त्यांचा पराभव झाला.
-
यानंतर २०१४ साली त्यांना लोकसभेची निवडणूक लढवायची होती. मात्र, पक्षाने यावेळी गिरीश बापट यांच्या जागी अनिल शिरोळे यांना उमेदवारी दिली.
-
२०१९मध्ये त्यांनी खसदारकीचे तिकीट मिळवले आणि काँग्रेसच्या मोहन जोशी यांचा तब्बल 96 हजार मतांनी पराभव केला.
-
कसबा पोटनिवडणुकीवेळी नाकात नळी घातलेले गिरीश बापट व्हीलचेअरवरून भाजपच्या प्रचारात उतरले होते. त्यावेळी भाजपवर टीकेची झोड उठली होती. (Photos: Twitter)
आणीबाणीनंतर सुरू झालेली राजकीय कारकिर्द ते भाजपा खासदार…जाणून घ्या गिरीश बापट यांच्या राजकीय प्रवासाबद्दल!
गिरीश बापट हे जवळपास दीड वर्ष रुग्णालयात उपचार घेत होते. आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.
Web Title: Know the political journey of bjp mp girish bapat died while treatment in dinanath mangeshkar hospital pvp