-
संगमनेरचे आमदार आणि राज्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची कन्या डॉ. जयश्री थोरात गेल्या काही काळापासून राजकारणात सक्रिय झाल्या आहेत.
-
मार्च महिन्यात त्यांच्याकडे संगमनेर विधानसभा युवक अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. तेव्हापासून त्या तालुक्यातील राजकारणात सक्रिय आहेत. संगमनेरच्या आमदारकीसाठी त्या प्रयत्नशील असल्याचेही बोलले गेले होते.
-
बाळासाहेब थोरात यांचे वडील भाऊसाहेब थोरात हेदेखील राजकारणात होते. त्यामुळे थोरात कुटुंबातील तिसरी पिढी आता राजकारणात उतरल्याचे बोलले जाते.
-
एकवीरा फाऊंडेशनच्या माध्यमातून डॉ. जयश्री थोरात य समाजकारणातही कार्यरत होत्या.
-
डॉ. जयश्री थोरात या कर्करोग तज्ज्ञ आहेत. त्यांनी मुंबईतील टाटा रुग्णालयात सेवा दिलेली आहे. त्यांचे पती हसमुख जैनही डॉक्टर आहेत.
-
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत जयश्री थोरात सहभागी झाल्या होत्या. तेव्हाच त्या राजकारणात उतरणार असल्याची चर्चा रंगली होती.
-
विधानसभा निवडणुकीच घोषणा झाल्यापासून डॉ. जयश्री थोरात या आक्रमकपणे प्रचारात उतरल्या आहेत. महायुतीवर त्या जोरदार टीका करताना दिसतात.
-
नुकतेच सुजय विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात हे आमदार होणार नाहीत, असे विधान केले होते. त्यावर प्रत्युत्तर देताना “खबरदार! माझ्या बापाविषयी बोलाल तर” असे विधान केले होते.
-
“संगमनेर तालुक्याकडे वाकड्या डोळ्यांनी पाहायचं नाही. तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय हा संगमनेर तालुका राहणार नाही. ज्यांना स्वत:चं घर सांभाळता येत नाही, ते आपलं घर काय सांभाळणार”, असा इशारा जयश्री थोरात यांनी माजी खासदार सुजय विखे यांना दिला होता.
-
दरम्यान भाजपाचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी लोकसभेत पराभव झाल्यानंतर संगमनेर विधानसभेवर लक्ष केंद्रीत केले आहे. यासाठी ते संगमनेरमध्ये सभांचा सपाटा लावत आहेत. दि. २५ ऑक्टोबर रोजी धांदरफळ या गावी सभा झाली असताना भाजपा नेते वसंतराव देशमुख यांनी जयश्री थोरात यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले.
-
सदर कार्यक्रम लाईव्ह असल्यामुळे काही क्षणातच वसंतराव देशमुखांच्या विधानाची व्हिडीओ क्लीप व्हायरल झाली. यानंतर गावातील महिलांनी सभास्थळी धडक देऊन देशमुखांनी माफी मागावी म्हणून ठिय्या मांडला.
-
तसेच सुजय विखे पाटील यांच्या ताफ्यातील काही वाहनांवर हल्ला झाल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला आहे. या हल्ल्यानंतर संगमनेर तालुक्याचे वातावरण तापले आहे.
-
आज (दि. २६ ऑक्टोबर) या घटनेची माहिती राज्यभरात पसरताच सर्वच राजकीय पक्षांनी या घटनचा निषेध केला आहे. निवडणूक असल्यामुळे विरोधकांनी महायुतीच्या लाडकी बहीण योजनेला यानिमित्ताने लक्ष्य केले आहे.
जयश्री थोरात कोण आहेत? ज्यांच्यावर भाजपा नेत्यानं विधान केल्यामुळं संगमनेर तालुका पेटला
Who is Jayashree Thorat, Sangamner News: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची कन्या जयश्री थोरात सध्या चर्चेत आहेत. त्यांच्याबद्दल भाजपा नेते वसंतराव देशमुख यांनी अश्लाघ्य विधान केल्यानंतर संगमनेर आणि अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण तापले आहे. (Photo – Jayashree Thorat FB/Insta)
Web Title: Who is jayashree thorat daughter of congress leader balasaheb thorat what sujay vikhe patil says in sangamner assembly constituency kvg