-
हिमाचलमध्ये निसर्गाचा तडाखा, अनेक जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट
हिमाचल प्रदेशातील कारसोगमध्ये जोरदार पाऊस आणि दोन ढगफुटींमुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. रस्ते बंद, वीजपुरवठा खंडित आणि पाणीपुरवठ्यावर परिणाम, अशी दुरवस्था तेथे झाली आहे. मंडी, सिरमौर व कुल्लू हे जिल्हे सर्वाधिक प्रभावित झाले आहेत. -
मंडी, सोलन, उना, शिमला, कांगडा यांसारख्या १० जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. पावसासोबत भूस्खलनाची शक्यताही वर्तवली गेली आहे. (छायाचित्र स्रोत: पीटीआय)
-
हवामानशास्त्रज्ञ संदीप शर्मा यांनी सांगितले की, पुढील दोन दिवस शिमला, मंडी, कांगडा व सिरमौर येथे जोरदार ते अतिजोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. (छायाचित्र स्रोत: पीटीआय)
-
सततच्या पावसामुळे संपूर्ण राज्यातील २५९ रस्ते बंद झाले आहेत. एकट्या मंडी जिल्ह्यात तब्बल १३९ रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. (छायाचित्र स्रोत: पीटीआय)
-
सिरमौरमध्ये ९२ आणि कुल्लू जिल्ह्यात ४७ पाणीपुरवठा योजना पावसामुळे बाधित झाल्या आहेत. त्यामुळे अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. (छायाचित्र स्रोत: पीटीआय)
-
लाहौल-स्पिती जिल्ह्यातील स्पिती उपविभागात तब्बल ६१४ वीज ट्रान्स्फॉर्मर बंद पडले आहेत. त्यापैकी १३९ ट्रान्स्फॉर्मर पूर्णपणे बिघडले असल्याची माहिती आहे. (छायाचित्र स्रोत: एएनआय)
-
मंडी हा सर्वांत जास्त नुकसान झालेला जिल्हा आहे. नगर, मंडी व गोहर या परिसरात वीज तारा तुटल्यामुळे तेथे अंधाराचे संकट निर्माण झाले आहे. (छायाचित्र स्रोत: पीटीआय)
-
IMDच्या नोंदीनुसार, पांडोहममध्ये १३० मिमी, मंडी शहरात १२० मिमी, सुन्नी (शिमला) येथे ११३ मिमी आणि पालमपूरमध्ये ८० मिमी पावसाची नोंद झाली आहे. (छायाचित्र स्रोत: एएनआय)
-
मंडी जिल्ह्यात वाहतुकीस अडथळा निर्माण झाला असून, अनेक भागांत वीज तारा तुटल्या आहेत. या समस्यांमुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. (छायाचित्र स्रोत: पीटीआय)
-
मंडी, सिरमौर व कुल्लू या जिल्ह्यांमध्ये आपत्कालीन प्रतिसाद पथके तैनात करण्यात आली आहेत. पाणीपुरवठा, वीज व संपर्क यंत्रणा पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
-
अधिकाऱ्यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की, अनावश्यक प्रवास टाळावा, विशेषतः डोंगराळ भागात. अधिकृत सूचनांकडे लक्ष देण्याचीही विनंती करण्यात आली आहे. (छायाचित्र स्रोत: पीटीआय)
-
मंडी जिल्ह्यातील कारसोग येथे मंगळवारी झालेल्या ढगफुटीमुळे अचानक पूर आला आणि गाळ-मातीच्या ढिगाऱ्यात अनेक वाहने अडकली आहेत. (छायाचित्र स्रोत: पीटीआय)
-
जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवरही कोणताही राष्ट्रीय महामार्ग बंद नाही. आपत्कालीन सेवांसाठी रस्ते सुरू ठेवण्यात आले आहेत, असे आपत्ती व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे. (छायाचित्र स्रोत: पीटीआय)
Photos : हिमाचलमध्ये ढगफुटीचा कहर! अचानक पुराचा तडाखा; अनेक जिल्ह्यांत रेड अलर्ट जारी
हिमाचल प्रदेशाला मुसळधार पावसाचा तडाखा बसला आहे. तेथील मंडी, कुल्लू व सिरमौर या जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तेथील रस्ते बंद होऊन, वीज व पाणीपुरवठा खंडित झाला आहे. नागरिकांना प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Web Title: Himachal cloudburst red alert heavy rain flood damage update 2025 svk 05