-
महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. आज विरोधकांनी सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेत अनोख्या पद्धतीने आंदोलन केले.
-
महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), शिवसेना (ठाकरे) आणि काँग्रेसच्या आमदारांनी एकत्र येत अंगात बनियन घातले आणि कमरेला टॉवेल गुंडाळत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.
-
शिवसेनेचे (शिंदे) आमदार संजय गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी आमदार निवासातील कँटिनमध्ये बनियन आणि टॉवेलवरच एका कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. तसेच याचे पडसाद विधिमंडळातही उमटले. संजय गायकवाड यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली.
-
मंत्री भरत गोगावलेही घरात टॉवेलवर बसून मांत्रिकाकरवी पूजा करत असल्याचा व्हिडीओ समोर आला होता. याचबरोबर मंत्री संजय शिरसाट यांचाही बेडरूममधील बनियनवरील व्हिडीओ व्हायरल झाला होता.
-
या तीनही घटनांचा संदर्भ घेत विरोधकांनी शिवसेना (शिंदे) गटाला घेरण्याचा प्रयत्न केला. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेतील आमदार जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे, सतेज पाटील, महेश सावंत यांनी या आंदोलनात सभाग घेतल्याचे दिसले.
-
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, महाराष्ट्रात चड्डी बनियन गँगने हैदोस घातला आहे. कँटिनमध्ये जाऊन आमदार साध्या कर्मचाऱ्याला मारहाण करतात. कुणी सिगारेट पिताना सुटकेसभर पैसे जगाला दाखवतात. कुणी चड्डी-बनियनवर घरात बसून ओम फट म्हणतात.
-
चड्डी बनियन गँगची दहशत पूर्वी महाराष्ट्रात होती. ही गँग शेतात, वस्त्यांवर दरोडे टाकायची. आताची चड्डी बनियन गँग महाराष्ट्रावर दरोडा टाकण्याचे काम करत आहे, असा आरोप अंबादास दानवे यांनी केला.
-
आमदारांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी अनोखी शक्कल लढविल्यामुळे या आंदोलनाची आता चर्चा होत आहे.
-
दरम्यान, शिवसेनेच्या (शिंदे) आमदारांचेच एकामागून एक व्हिडीओ बाहेर येत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यावरून शिंदे गटातून खदखद व्यक्त केली जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही याबद्दल आमदारांची कानउघाडणी केल्याचे समोर आले आहे.
बनियन, टॉवेल गुंडाळून आमदार आले विधानभवनात; चड्डी बनियन गँगच्या नावानं घोषणाबाजी
Vidhan Bhavan Chaddi Baniyan Gang: विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आज विरोधी पक्षाच्या आमदारांनी आक्रमक पवित्र घेत बनियन, टॉवेल गुंडाळून सरकारविरोधात आंदोलन केले.
Web Title: Opposition mla dress chaddi baniyan in maharashtra legislature house shouts slogans against shiv sena shinde faction and mahayuti govt kvg