-
काही दिवसांपूर्वी नागपूर जिल्हा न्यायालय बार असोसिएशनच्या एका कार्यक्रमात सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी त्यांच्या आयुष्यातील काही वैयक्तिक गोष्टींना उजाळा दिला होता.
-
त्यावेळी त्यांनी, पालकांनी त्यांना वाढवण्यासाठी केलेल्या संघर्षांचाही उल्लेख केला होता. अतिशय भावनिक आणि दबलेल्या आवाजात सरन्यायाधीशांनी वकिलीच्या क्षेत्रात कसे आले, यावरही भाष्य केले होते.
-
नागपूरमधील कार्यक्रमात सरन्यायाधीश गवई यांनी म्हटले होते की, “मला आर्किटेक्ट व्हायचे होते. पण माझ्या वडिलांचे माझ्यासाठी वेगळेच स्वप्न होते. त्यांना नेहमीच वाटत होते की मी वकील व्हावे, जे स्वप्न ते स्वतः पूर्ण करू शकले नाहीत. वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी आर्किटेक्ट होण्याचे स्वप्न सोडून वकिली क्षेत्रात आलो.”
-
सरन्यायाधीश गवई त्यावेळी पालकांबद्दल बोलताना भावूक झाल्याचे पाहायला मिळाले होते. ते म्हणाले होते की, “माझ्या वडिलांनी स्वतःला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सेवेसाठी समर्पित केले होते. त्यांना स्वतः वकील व्हायचे होते, परंतु स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतल्यामुळे त्यांना अटक करण्यात आल्याने त्यांची इच्छा पूर्ण झाली नाही.”
-
“जेव्हा उच्च न्यायालयात न्यायाधीश पदासाठी माझ्या नावाची शिफारस करण्यात आली, तेव्हा माझे वडील म्हणाले होते की, जर तू वकील म्हणूनच काम करत राहिलास तर तू फक्त पैशाच्या मागे धावशील. पण जर तू न्यायाधीश झाला तर तुला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेल्या मार्गाचे अनुसरण करता येईल आणि समाजासाठी चांगले काम करता येईल”, असेही सरन्यायाधीश पुढे म्हणाले होते.
-
सरन्यायाधीश त्यावेळी वडिलांची आठवण सांगताना म्हणाले होते की, त्यांच्या वडिलांनाही वाटले होते की त्यांचा मुलगा एके दिवशी सरन्यायाधीश होईल, पण हे पाहण्यासाठी ते जिवंत नाहीत.
-
दरम्यान, बी. आर. गवई यांनी भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून १४ मे रोजी शपथ घेतली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवन येथे त्यांना शपथ दिली होती. बी. आर. गवई हे आता २३ नोव्हेंबर २०२५ पर्यंत भारताचे सरन्यायाधीश म्हणून काम पाहणार आहेत. (All Photos: PTI)
Chief Justice BR Gavai Gets Emotional: आर्किटेक्ट होण्याचं स्वप्न बाळगणारे सरन्यायाधीश बी. आर. गवई वकिलीच्या क्षेत्रात कसे आले? स्वतःचं सांगितलं कारण
Chief Justice BR Gavai Gets Emotional, Says His Father’s Dream Has Come True: बी. आर. गवई यांनी भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून १४ मे रोजी शपथ घेतली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवन येथे त्यांना शपथ दिली होती. बी. आर. गवई हे आता २३ नोव्हेंबर २०२५ पर्यंत भारताचे सरन्यायाधीश म्हणून काम पाहणार आहेत.
Web Title: Cji br gavai architecture dream to law career aam