भारतीय कर्णधार विराट कोहलीने आज २० जून रोजी कसोटी क्रिकेटमध्ये १० वर्षे पूर्ण केली आहेत. कोहली सध्या इंग्लंडच्या दौर्यावर असून न्यूझीलंडविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या ऐतिहासिक अंतिम सामन्यात व्यस्त आहे. कर्णधार म्हणून आयसीसीची पहिली ट्रॉफी जिंकण्याकडे त्याचे लक्ष आहे. २० जून २०११मध्ये त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. जाणून घ्या कोहलीच्या कारकीर्दीबद्दल १० मोठ्या गोष्टी… विराटने ९१ कसोटी सामन्यांत ७,४९० धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याची सर्वोत्तम कामगिरी नाबाद २४४ धावा होती. कोहलीच्या नावावर २७ शतके आणि २५ अर्धशतके आहेत. टी-२० विश्वचषक, वनडे विश्वचषक स्पर्धा आणि चॅम्पियन्स करंडक या आयसीसीच्या सर्व प्रमुख स्पर्धांची अंतिम फेरी खेळणारा विराट हा एकमेव खेळाडू आहे. २०११मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात त्याने आपल्या कसोटी कारकीर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले होते. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण असे दिग्गज असलेल्या संघात कोहली सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता आणि त्याने ५२ धावा केल्या. त्याने सलग दोन अर्धशतके झळकावून सामना अनिर्णित राखण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. पहिल्या कसोटी शतकासाठी कोहलीला जास्त काळ थांबावे लागले नाही. त्याने ८व्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिले कसोटी शतक झळकावले. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा कोहली हा सहावा भारतीय खेळाडू आहे. कर्णधार म्हणूनही त्याने सर्वाधिक धावा केल्या आहेत. कर्णधार म्हणून त्याने ६० कसोटीत ५,३९२ धावा केल्या, ज्यात २० शतकेही समाविष्ट आहेत. सर्वाधिक कसोटी शतके करणारा कोहली हा चौथा भारतीय आहे. त्याच्या नावावर २७ कसोटी शतके आहेत. विराट हा सर्वात दुहेरी शतक झळकावणारा भारतीय खेळाडू आहे. त्याने आतापर्यंत ७ दुहेरी कसोटी शतके ठोकली आहेत. कॅलेंडर वर्षात सर्वाधिक कसोटी धावा करण्याचा विक्रम कोहलीच्या नावावर आहे. त्याने २०१८ मध्ये १३२२ आणि २०१६मध्ये १२१५ धावा केल्या. कोहली हा भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार आहे. त्याने ६० पैकी ३४ सामने जिंकले आहेत. त्याच्या विजयाची टक्केवारी ५९.०१ अशी आहे. विजयाच्या टक्केवारीच्या बाबतीत तो फक्त रिकी पॉन्टिंगच्या मागे आहे. पॉन्टिंगची टक्केवारी ६२.३३ आहे. -
नाणेफेकीच्या बाबतीत अनेकदा दुर्दैवी राहिलेल्या विराटने चार मालिकांमध्ये सर्व नाणेफेक जिंकल्या आहेत. दक्षिण आफ्रिका (२०१६-१७ आणि २०१९-२०), श्रीलंका (२०१७) आणि न्यूझीलंड (२०१६-१७) विरुद्धच्या मालिकेत त्याने सर्व नाणेफेक जिंकल्या आहेत.
कसोटीत विराटची ‘दशक’पूर्ती.! वाचा त्याच्या कारकिर्दीतील खास १० गोष्टी
Web Title: Virat kohli completes a decade in test cricket know ten big things about his career adn