-
झोहो कॉर्पोरेशनने विकसित केलेल्या अरत्ताई या मेसेजिंग अॅपची तंत्रज्ञान जगतात जोरदार चर्चा सुरू आहे.
गेल्या तीन दिवसांत या अॅपवर साइन-अप करणाऱ्या युजर्समध्ये १०० पट वाढ झाली आहे आणि याकडे भारतात मेटाच्या व्हॉट्सअॅपला संभाव्य आव्हान म्हणून पाहिले जात आहे. -
मेड इन इंडिया अरत्ताईने युजर्सना प्रियजनांशी आणि व्यावसायिकांशी संपर्क साधण्यासाठी स्पायवेअर-प्रूफ प्लॅटफॉर्म म्हणून स्थान मिळवले आहे. झोहो आणि अरत्ताई दोघांचेही शिल्पकार श्रीधर वेम्बू हे अॅपच्या अचानक वाढलेल्या लोकप्रियतेमुळे तितकेच रोमांचित झाले आहेत. या बहुचर्चित अॅपमागील माणूस नेमका कोण आहे?
-
श्रीधर वेम्बू हे सिलिकॉन व्हॅलीमधील एक प्रमुख नाव आहे. त्यांचा सिलिकॉन व्हॅलीतील अभियंता ते तामिळनाडूच्या ग्रामीण भागातील रहिवासी अशा अपारंपरिक प्रवासाचा प्रभाव, झोहो आणि अरत्ताई मेसेंजरवर स्पष्टपणे दिसून येतो.
-
तमिळनाडूतील तंजावर येथील एका मध्यमवर्गीय कुटुंबात १९६८ मध्ये वेम्बू यांचा जन्म झाला. त्यांनी आयआयटी मद्रासमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये बी.टेक केले, १९८९ मध्ये पदवी प्राप्त केली आणि १९९४ मध्ये प्रिन्स्टन विद्यापीठातून पीएच.डी. पूर्ण केली.
-
उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर, वेम्बू यांनी क्वालकॉममध्ये सिस्टम्स डिझाईन इंजिनिअर म्हणून व्यावसायिक कारकीर्द सुरू केली आणि वायरलेस तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित केले. पण, तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी पदे मिळवण्यापेक्षा वेम्बू यांनी भारतात परतण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्यांच्या या असामान्य निर्णयामुळे लोकांचे लक्ष वेधले गेले, पण तेच आता त्यांच्या तत्त्वज्ञानाचा केंद्रबिंदू बनला आहे.
-
वेम्बू यांचा असा विश्वास आहे की जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान महानगरे किंवा शहरांमधूनच यायला हवे असे नाही, ते पारंपरिक प्रणालीद्वारे दुर्लक्षित राहिलेल्या प्रतिभेद्वारे गावांमध्ये तयार केले जाऊ शकते.
-
१९९६ मध्ये वेम्बू यांनी मित्र आणि कुटुंबासह अॅडव्हेंटनेट कंपनी सुरू केली. ज्याचा उद्देश जागतिक ग्राहकांसाठी एक भारतीय सॉफ्टवेअर उत्पादन कंपनी तयार करणे होता. दोन दशकांहून अधिक काळानंतर, अॅडव्हेंटनेटचे झोहो कॉर्पोरेशनमध्ये रूपांतर झाले. जे आता क्लाउड-आधारित सेवा पुरवते. २०१६ पर्यंत, या फर्ममध्ये कर्मचाऱ्यांची संख्या ३,००० हून अधिक झाली होती. ही फर्म आता १८० हून अधिक देशांमध्ये ५० हून अधिक प्रकारच्या क्लाउड सेवा पुरवते.
-
जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गजांना पर्याय म्हणून भारतीय पर्याय निर्माण करण्याच्या वेम्बू यांच्या दृष्टिकोनातून झोहोने २०२१ मध्ये अरत्ताई हे मेसेजिंग अॅप सादर केले. अरत्ताई या तमिळ शब्दाचे “कॅज्युअल चॅट” असे भाषांतर आहे.
-
गेल्या काही दिवसांत हे अॅप भारतातील डाउनलोड चार्टमध्ये अव्वल स्थानी पोहोचले आहे. अरत्ताई मेसेजिंग अॅपमध्ये युजर्सना ग्रुप चॅट्स, व्हॉइस आणि व्हिडिओ कॉल्स, स्टोरीज आणि ब्रॉडकास्ट चॅनल्स यासारखी फिचर्स मिळतात. (All Photo: @svembu/X)
WhatsApp ला टक्कर देण्यासाठी आलेल्या ‘Arattai’ मेसेंजरचे संस्थापक श्रीधर वेंबू कोण आहेत?
Arattai: जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गजांना पर्याय म्हणून भारतीय पर्याय निर्माण करण्याच्या वेम्बू यांच्या दृष्टिकोनातून झोहोने २०२१ मध्ये अरत्ताई हे मेसेजिंग अॅप सादर केले. अरत्ताई या तमिळ शब्दाचे “कॅज्युअल चॅट” असे भाषांतर आहे.
Web Title: Sridhar vembu arattai vs whatsapp zoho founder story arattai messenger features whatsapp alternative arattai app download trend aam