-
मुंबई. देशाची आर्थिक राजधानी. स्वप्नांची नगरी. मायानगरी. २४ तास धावणारं शहर. धडपणारी धावणारी माणसं. येणाऱ्या प्रत्येक संकटाला तोंड देऊन पुन्हा नव्यानं भरारी घेणारं हे महानगर. जगात थैमान घालणारा करोना आजारा सध्या महाराष्ट्र आणि मुंबईवर घोंगावत आहे. Express photo by Prashant Nadkar
-
करोनाचे एक दोन रुग्ण पुण्यात आढळून आले. एका दाम्पत्याला संसर्ग झाल्याचं निष्पन्न झाल्यानंतर करोनानं महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवल्याचं स्पष्ट झालं. आधीच तयारीत असलेली आरोग्य यंत्रणा सतर्क झाली. पण, तोपर्यंत करोनानं देशाबरोबर महाराष्ट्रातही हातपाय पसरायला सुरूवात केली होती.
-
करोनाबाधित दाम्पत्याच्या संपर्कात आलेल्या तीन जणांना करोनाची लागण झाल्याचं समोर येत नाही, तोच नागपूरमध्ये एक रुग्ण आढळून आला. त्यानंतर मुंबईत तीन जण सापडले. हळूहळू महाराष्ट्रातील करोना रुग्णांची संख्या वाढू लागली.
-
त्यापाठोपाठ शाळा-महाविद्यालय, मॉल्स, चित्रपटगृह, नाट्यगृह, जलतरण तलाव, व्यायामशाळा यासारखे गर्दी होणारी ठिकाण बंद ठेवण्याचे आदेश सरकारनं जारी केले.
-
करोनाग्रस्त रुग्ण आणि संशयित यांचा आकडा वाढत असल्याचं लक्षात येताच सरकारनं या आजाराला पायबंद घालण्यासाठी तातडीचे आणि कठोर निर्णय घेतले. त्यात गर्दी होणारे कार्यक्रम रद्द करण्याचे आदेश दिले.
-
एकीकडं सरकारकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात असताना करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे मुंबईत जमावबंदी आदेश लागू केले आहेत.
-
जलतरण तलाव, व्यायाम शाळा या नेहमी गजबजलेल्या ठिकाणीही आता शुकशुकाट दिसू लागला आहे.
-
मुंबई आणि गर्दी हे अगदी नित्याचचं. त्यामुळे मुंबईतील रस्ते नेहमी नदीच्या पाण्याप्रमाणे वाहत असतात. खचाखच भरलेल्या लोकल आणि बस, असंच चित्र सकाळपासून रात्री उशिरापर्यंत असतं. पण, आता उलट चित्र दिसत आहे.
-
करोनानं मुंबईत शिरकाव केल्याचं वृत्त हळूहळू पसरत गेलं. त्याचा परिणाम आता मुंबईत दिसू लागला आहे. रस्त्यावरची गर्दी कमी होत आहे. लोक स्वतःची घेत प्रवास करत आहेत. विशेषत: सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या बसेस, रेल्वेची स्वच्छता करण्याची खबरदारी घेतली जाऊ लागली आहे.
-
अलिकडेच नाईट लाईफ सुरू झालेल्या मुंबईचं जनजीवनच करोनानं बदलायला सुरूवात केली आहे.
-
स्थानिक नागरिक गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळत असून त्याचा परिणाम बाजारपेठा आणि सिनेमागृहांवर झाला आहे. बाजारपेठा आणि सिनेमागृहांमध्ये गर्दी कमी होत असल्याचे दिसून येत आहे. त्याचा मोठा आर्थिक फटका व्यापारी आणि सिनेमागृहांच्या चालकांना बसत आहे.
-
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन ‘गुढीपाडवा मेळावा’ रद्द करत असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. गेल्या काही दिवसांपासून मनसैनिक गुढीपाडवा मेळाव्यासाठी जोरदार तयारी करत होते. पण करोना व्हायरसचा प्रसार रोखायचा असेल तर, गर्दी टाळण आवश्यक आहे. त्यामुळे करोनाचा फैलाव रोखण्यासाठी यंदाचा गुढीपाडवा मेळावा रद्द करत आहोत, असं मनसेने एका पत्रकाद्वारे जाहीर केलं.
-
३१ मार्चपर्यंत टूर्स आणि ट्रॅव्हल्सवर निर्बंध घालण्यात आले आहेत. मुंबई दर्शनसह बिझनेस टूरही रद्द करण्यात आल्या आहेत.करोनाच प्रादुर्भाव टाळण्यासाठी आम्ही हा निर्णय़ घेतला आहे. त्यामुळे घाबरुन जाऊ नये आम्हाला सहकार्य करावं असं पोलिसांनी म्हटलं आहे.
-
मुंबईतील देवस्थानांच्या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी असते. त्यामुळे अशा ठिकाणाहून करोना फोफावण्याची भीती अधिक असते. त्यामुळे मुंबईतील देवस्थानं बंद ठेवण्यात आली आहेत.
-
३१ मार्चपर्यंत सरकारनं हे आदेश दिले असले, तरी करोनाची तीव्रता ओळखून त्यासंदर्भातील पुढील निर्णय घेतला जाऊ शकतो. तीव्रता वाढल्यास या आदेशाला आणखी मुदतवाढ दिली जाऊ शकते. त्यामुळे मुंबईतील गर्दीनं वाहणारी ठिकाणांना आता माणसांची प्रतिक्षा करायला लागू शकते.
मुंबईला लागली करोनाची नजर
नेहमी गजबजलेल्या ठिकाणीही आता शुकशुकाट
Web Title: How mumbai is shutting down over coronavirus bmh