-
तावून सुलाखून निघाल्याशिवाय कर्तृत्व आणि नेतृत्वाला धुमारे फुटत नाही, असं नेहमीच म्हटलं जातं. महाराष्ट्र या गोष्टीचा सध्या प्रत्यक्ष अनुभव घेतोय. राजेश टोपे! महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री. महाविकास आघाडीचं सरकार अस्तित्वात येईपर्यंत राजेश टोपे हे नावं माहिती असेल म्हणावं तितकं प्रसिद्धीच्या वलयात नव्हतं. पण, गेल्या महिनाभरापासून हे व्यक्तिमत्व महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलं आहे. (फोटो : राजेश टोपे/ट्विटर)
-
अशक्य ती राजकीय घटना घडून राज्यात महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात स्थापन झालं. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. ठाकरे सरकारमध्ये महाराष्ट्राच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी ती राजेश टोपे यांच्यावर.
-
आधीच्या आघाडीच्या सरकारच्या काळातही राजेश टोपे यांनी नगर विकास, जलसंधारण, पर्यावरण, उद्योग यासह व मंत्री म्हणून काम पाहिलं. नगरविकास, जलसंधारण यासह विविध मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली. पण, म्हणावी तशी छाप त्यांना पाडता आली नाही.
-
महाविकास आघाडी सरकारमध्ये आरोग्यमंत्री पदाची धुरा सांभाळल्यानंतर काही दिवसांतच करोनानं महाराष्ट्रात शिरकाव केला. त्यानंतर राजेश टोपे या नावाची सगळीकडं चर्चा सुरू झाली.
-
करोनानं महाराष्ट्रात चंचुप्रवेश केला, तेव्हा परिस्थिती इतकी गंभीर नव्हती. पण, हळूहळू रुग्ण वाढत गेले आणि चिंताही. पण, या सगळ्या परिस्थितीला राजेश टोपे कोणतीही चिडचिड अथवा आव न आणता सामोरं जात राहिले.
-
टोपे यांनी आरोग्यमंत्री पदाची जबाबदारी घेतली हिच एक आव्हानात्मक गोष्ट होती. कारण देशातील आणि राज्यातील आरोग्य यंत्रंणेची अवस्था कुणालाही वेगळी सांगण्याची गरज नाही. अशी सगळी पार्श्वभूमी असताना करोनानं राज्यात थैमान घालण्यास सुरूवात केली आणि राजेश टोपे यांची खरी परीक्षा सुरू झाली.
-
साधनसामुग्रीचा तुटवडा, आरोग्य विभागातील डॉक्टरांपासून ते सफाई कर्मचाऱ्यांपर्यंत रिक्त असलेली पदं. अशा स्थितीत राजेश टोपे करोना विरोधातील लढ्यात पूर्ण बाजी लावून लढत आहेत. महामारीचा आजार म्हटल्यावर सोशल मीडियावर अफवांचं पिक आलेलं. पण, सातत्यानं माध्यमं, सोशल माध्यमं यांच्या माध्यमातून ते जनतेच्या संपर्कात आहेत.
-
करोनाचा उद्रेक झालेल्या मुंबई पुण्यात जातीनं लक्ष देणं. त्याचबरोबर उर्वरित महाराष्ट्रातील आरोग्य सेवेकडं दुर्लक्ष होणार नाही, याची काळजी घेताना टोपे दिसले. मंत्री म्हणून आरोग्य यंत्रणेतील प्रत्येक घटकाला विश्वासात घेत. आधार देण्याबरोबर मुख्यमंत्री, नेते आणि जनता यांच्या सांधाही त्यांनी निखळू दिला नाही.
-
सगळ्यांना घरात बसा, असं सांगणारे आरोग्यमंत्री लॉकडाउनच्या काळात पायाला भिंगरी बांधून महाराष्ट्रभर फिरत आढावा घेत आहेत. करोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांची पाहणी करणं, बैठका घेणं, डॉक्टरांशी, वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञांशी संवाद साधन, हे सगळं ते एखाद्या कसलेल्या नेत्याप्रमाणं करत आहेत.
-
कुणालाही हेवा वाटावा अशी गोष्ट म्हणजे स्वतःची आई आजारी असताना, रुग्णालयात उपचार घेत असताना महाराष्ट्राच्या आरोग्याची काळजी वाहत आहे. एकुलता एक मुलगा असूनही राजेश टोपे यांनी आईची जबाबदारी कुटुंबीयांवर सोपवली आहे. महाराष्ट्रातून करोनाला हद्दपार करण्याच्या युद्धात हा लढवय्या जिद्दीनं लढत आहे.
राजेश टोपे… करोनाविरोधी युद्धातील लढवय्या!
Web Title: A fighter leader rajesh tope health minsiter of maharashtra bmh