-
राज्य सरकारनं लॉकडाउन ३१ जुलैपर्यंत वाढवला आहे. सरकारनं मिशन बिगिन अगेन अशी हाक दिली असली, तरी काही निर्बंध काळात कायम ठेवण्यात आले आहेत. करोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी काय काळजी घ्यावी यासंदर्भातही सरकानं मार्गदर्शक नियमावली जाहीर केली आहे. १ जुलैनंतर सुरू होणाऱ्या मिशन बिगिन अगेनच्या दुसऱ्या टप्प्यात या नियमावलीचं पालन करणं नागरिकांना अनिवार्य करण्यात आलं आहे. (सर्व फोटो -इंडियन एक्स्प्रेस)
-
प्रतिकात्मक संग्रहीत छायाचित्र
-
लग्नाला ५० पेक्षा जास्त पाहुणे बोलवू नये, त्याचबरोबर अंत्ययात्रेलाही ५० पेक्षा जास्त माणसांची गर्दी चालणार नाही, असं सरकारनं म्हटलं आहे. लग्नासंबंधी कार्यक्रमासाठी मोकळ्या जागा, लॉन किंवा नॉन-एसी हॉल यांनाच मान्यता देण्यात आलेली आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे हा दंडनीय अपराध असणार आहे. यासोबतच सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, पान, तंबाखू याचे सेवन निषिद्ध करण्यात आलेलं आहे.
-
कार्यालयांसाठी सूचना शक्य तितक्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्यास प्रोत्साहन द्यावे. कार्यालयात थर्मल स्क्रीनिंग, हँड वॉश, सॅनिटायझर प्रत्येक प्रवेशद्वाराजवळ ठेवणे अनिवार्य करण्यात आलं आहे. दोन शिफ्टच्या दरम्यान, दरवाज्यांसारख्या सर्वाधिक मानवी स्पर्श होणाऱ्या जागा सॅनिटाइज कराव्यात, असंही सरकारनं म्हटलं आहे. त्याचबरोबर दोन कर्मचाऱ्यांमध्ये पुरेसे अंतर राहील. दोन शिफ्ट आणि लंच ब्रेकमध्ये गर्दी जमणार नाही, याची काळजी घेण्यात यावी.
-
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील रुग्णसंख्येत दिवसाला २० हजारांच्या जवळपास वाढ होताना दिसत आहे. रविवारी यात आतापर्यंतची उच्चांकी वाढ नोंदवण्यात आली. राज्यात २३ हजारांपेक्षा जास्त रुग्ण एका दिवसात आढळून आले असून, लॉकडाउन शिथिल केल्यानंतर संसर्ग वाढत असल्याचंच यातून दिसून येत आहे. (फोटो-लोकसत्ता/इंडियन एक्स्प्रेस)
-
अत्यावश्यक सेवांची दुकाने पूर्वीप्रमाणे सुरु राहणार. इतर दुकाने संबंधित महापालिकांच्या सूचनेनुसार उघडतील. मॉल आणि मार्केट कॉम्प्लेक्स वगळता सर्व बाजार, दुकाने सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत उघडतील. मद्य दुकाने परवानगी असल्यास उघडतील (होम डिलिव्हरी किंवा प्रत्यक्ष विक्री). यासोबतच आवश्यक आणि इतर वस्तूंची ई-कॉमर्स विक्री करण्यास सरकारनं मंजुरी दिली आहे.
-
औद्योगिक कामे करण्यास सरकारनं परवानगी दिली आहे. खाजगी आणि सार्वजनिक बांधकाम साईट, मान्सूनपूर्व कामे करता येणार आहेत.
-
राज्यातील सर्व शाळा सुरू करण्याचा निर्णय अद्याप प्रलंबित असला, तरी ऑनलाईन व दूरशिक्षणाला सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे. (Image source: NCERT website)
-
सरकारी कार्यालये (आपत्कालीन, आरोग्य आणि वैद्यकीय, आपत्ती व्यवस्थापन, पोलिस, अन्न आणि नागरी पुरवठा वगळता) १५ टक्के किंवा १५ कर्मचारी संख्येने (जे अधिक असेल ते) कार्यरत राहतील. सर्व खासगी कार्यालये १० टक्के किंवा १० कर्मचारी संख्येने (जे अधिक असेल ते) कार्यरत करता येऊ शकतात.
-
एमएमआर क्षेत्राअंतर्गत आवश्यक काम आणि कार्यालयासाठी आंतरजिल्हा (मुंबई-ठाणे इत्यादी) प्रवास करण्यास मुभा. मात्र खरेदीसाठी जवळच्या मार्केटमध्ये जाणे अपेक्षित. अनावश्यक कामासाठी लांब पल्ल्याचा प्रवास करण्याची मुभा सरकारकडून देण्यात आलेली नाही.
-
टॅक्सी, कॅब, रिक्षा, चारचाकी – केवळ आवश्यक प्रवासासाठी चालक + २ दुचाकी – केवळ चालक प्लंबर, इलेक्ट्रिशियन, पेस्ट कंट्रोल अशा तंत्रज्ञ यांनी सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर याचा वापर करुन काम करावे, गॅरेजची वेळ घेऊन वाहन दुरुस्ती कामे करावीत.
-
सायकलिंग, रनिंग, वॉक, व्यायाम या सर्व गोष्टींना परवानगी वर्तमानपत्राची छपाई आणि वितरण मंजूर शैक्षणिक संस्थांचे कर्मचारी पेपर तपासणे किंवा निकाल जाहीर करणे या कामासाठी प्रवास करु शकतात. केशकर्तनालय, स्पा, सलून, ब्युटी पार्लर यांना नियम पाळून काम करण्याची मुभा देण्यात आली आहे. विशेष म्हणजे जिल्हांतर्गत बस सेवा ५० टक्के प्रवाशांसह सुरू करण्यासही सरकारनं परवानगी दिली आहे.
एक जुलैपासून काय बदल होणार? हे वाचा…
महाराष्ट्रात लॉकडाउनला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ
Web Title: Lockdown in maharashtra extended till july 31 check new guidelines here bmh