जिद्द, चिकाटी आणि प्रयत्नाच्या जोरावर परिस्थितीवरही मात करता येतं हे दाखवून दिलेय जालन्यातील अन्सार अहम्मद शेख या तरुण आयएएस आधिकाऱ्यानं. परिस्थिती अभावी एकेकाळी हॉटेलमध्ये फरशी पुसण्याची नोकरीही केली पण त्यानं आपली जिद्द सोडली नाही, २०१६ मध्ये त्यानं युपीएससी परीक्षेत उज्वल यश मिळवलं. त्याच जालन्याच्या अन्सार अहम्मद शेख याची यशोगाधा आणि सक्सेस स्टोरी आज आपण पाहणार आहोत…. अन्सार अहम्मद शेख आज देशातील सर्वात तरुण आयएएस आधिकारी असला तरी एकवेळ त्याच्या घरी पैशांची इतकी चणचण होती की दोन वेळचं पोटभर खायलाही मिळत नव्हते. वडील रिक्षाचालक. जेमतेम दोनशे रुपये कमवायचे आणि तेही दारूवर उडवायचे. मग घरी येऊन शिवीगाळ करायचे. हा नित्याचा दिनक्रम होता… अशा परिस्थितीत अन्सार अहम्मद शेखने अभ्यास केला. वेळप्रसंगी आपलं शिक्षण पुर्ण करण्यासाठी हॉटेलात वेटर म्हणून नोकरीही केली. UPSC मध्ये अन्सार अहम्मद शेखने देशात ३७१ वी रँक मिळवत IAS झाला. त्यावेळी त्याचं वय अवघं २१ वर्ष होतं. देशातला सर्वात तरुण सनदी अधिकारी म्हणून गाजलेला अन्सार शेख आता पश्चिम बंगालमध्ये विशेष पदावर कार्यरत आहे. अन्सार मराठवाड्यातल्या जालना जिल्ह्यातील शेलगाव या छोट्याशा गावात वाढला. त्याच प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत पुर्ण झालं. अन्सार अभ्यासात हुशार होता. मात्र, परिस्थिती अभावी शिक्षण सोडून त्यानं कामधंद्याला लागावं, अशी घरच्यांची इच्छा होती. अन्सार शेखने एका मुलाखतीत सांगितलं की, नातेवाईकांच्या सल्ल्याने वडिलांनी सांगितलं शाळा सोड आणि कामाला लाग. ते हे सांगायला शाळेतही गेले. पण शिक्षकांनी त्यावेळी त्यांना समजावलं. अन्सार हुशार आहे, त्याचं शिक्षण थांबवू नका. कसेबसे वडील तयार झाले आणि अन्सारची दहावीपर्यंतचं शिक्षण तरी पार पडलं. चांगले मार्क मिळाले, त्यामुळे बारावीपर्यंतचं शिक्षण घ्यायची परवानगी मिळाली. १२ वीमध्ये अन्सारने ९१ टक्के गुण घेतले. आसपासच्या कुणालाच कधी एवढे मार्क मिळाले नव्हते. त्यानंतर घरच्यांनी शिक्षण सोड म्हणून कधी सांगितलं नाही. अन्सारचं शिक्षण पुर्ण करायला घरच्यांनी फक्त परिस्थिती अभावी ना होती. पण त्यांनाही आपल्या मुलानं चांगलं शिक्षण घ्यावं असं वाटत होतेच. अन्सारने १२ वीनंतरचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी मिळेल ते काम स्वीकारलं. काही काळ हॉटेलमध्ये रोजंदारीवर कामही केलं. तिथे कधी पाणी द्यायचं काम असे, तर कधी फरशी पुसायचं. युपीएससीच्या तयारीसाठी अन्सार पुण्यात आला. दररोज मन लावून अभ्यास करू लागला. दिवसा काम आणि रात्री अभ्यास असं रुटीन सुरू होतं. अन्सार शेख सांगतात, "UPSC च्या परीक्षेचा निकाल होता, त्याही दिवशी माझ्या खिशाल बाहेर खाण्याएवढे पैसे नव्हते. मित्रांनीच रिझल्ट पाहिला आणि माझं नाव यादीत दिसल्यावर पार्टी मागितली. खुशीनं मिठाई वाटण्याएवढे पैसे नव्हते तेव्हा, मग मित्रानंच मदत केली. मेहनतीचं फळ मिळालं याचाच जास्त आनंद होता. आता त्या मेहनतीच्या जोरावरच सगळं हाती आलंय." -
सर्व फोटो अन्सार शेख यांच्या इन्स्टाग्राम पेजवरुन घेतले आहेत.
हॉटेलमध्ये फरशीही पुसली; महाराष्ट्राने देशाला दिला हा सर्वांत तरुण IAS अधिकारी
जिद्द, चिकाटी आणि प्रयत्नाच्या जोरावर परिस्थितीवरही मात करता येतं हे दाखवून दिलेय जालन्यातील या तरुण आयएएस आधिकाऱ्यानं
Web Title: Success story of an ias officer ansar ahmed shaikh nck