-
टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुलीला शनिवारी हृदयविकाराचा झटका आल्याने कोलकात्याच्या एका रुग्णालयात भरती करण्यात आलंय. सध्या गांगुलीची प्रकृती स्थिर आहे.
-
गांगुली लवकरात लवकर बरा व्हावा, यासाठी अनेक आजी-माजी क्रीडापटू, नेतेमंडळींसह गांगुलीचे कोट्यवधी चाहते प्रार्थना करतायेत. अशातच भारताचे माजी क्रिकेटपटू किर्ती आझाद यांनी गांगुलीला लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा दिल्या, पण या शुभेच्छा देताना त्यांनी गांगुलीला एक टोमणाही मारला. त्यावरुन आता किर्ती आझाद यांच्यावर सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.
-
प्रकृती सुधारण्याच्या शुभेच्छा देताना आझाद यांनी गांगुलीला एका जाहिरातीच्या प्रचारावरुन टोमणा मारला. किर्ती आझाद यांनी, ''‘दादा…लवकर बरा हो…नेहमी फक्त वापरलेल्या आणि विश्वासार्ह उत्पादनांचीच जाहिरात करावी…स्वत: ला जागरूक ठेवा आणि सावधगिरी बाळगा…देव तुम्हाला आशीर्वाद देवो…अशा आशयाचं ट्विट करत गांगुलीला लवकर बरं होण्याच्या शुभेच्छा दिल्या.
-
या ट्विटसोबत आझाद यांनी गांगुली, ज्या तेल कंपनीचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे त्याचा फोटोही शेअर केला. गांगुली ज्या तेल कंपनीची जाहिरात करतो त्याची टॅगलाइन 'हृदयासाठी निरोगी तेल…जे आपल्यातील प्रतिकारशक्ती वाढवते', अशा आशयाची आहे. गांगुलीला हार्टअटॅक आल्याने आझाद यांनी गांगुलीला त्याच जाहिरातीवरुन टोला मारला.
-
पण, नेटकऱ्यांना आणि विशेषतः गांगुलीच्या चाहत्यांना मात्र त्यांचं हे ट्विट अजिबात आवडलं नाही. भडकलेल्या गांगुलीच्या चाहत्यांनी आझाद यांच्यावर टिकास्त्र सोडलं आणि त्यांना ट्रोल करायला सुरूवात केली. किमान गांगुली रुग्णालयात भरती असताना तरी एका वरीष्ठ क्रिकेटपटूने अशाप्रकारचं ट्विट करायला नको होतं असं म्हणत संतापलेले गांगुलीचे चाहते आझाद यांच्यावर हल्लाबोल करत आहेत. दरम्यान, सध्या गांगुलीची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.
टोमणा मारत गांगुलीला दिल्या Get Well Soon च्या शुभेच्छा, किर्ती आझादांवर भडकले ‘दादा’चे चाहते
हार्टअटॅक आल्याने रुग्णालयात असतानाही टोमणा मारणाऱ्या किर्ती आझादांवर भडकले गांगुलीचे चाहते…
Web Title: Always promote tested and tried products says kirti azad and takes a dig at sourav ganguly while wishing him good health sas