-
करोनाच्या या आव्हानात्मक संकटातही काही कहाण्या जगण्याचं बळ देताना दिसत आहे. करोनामुळे अडचणीत सापडलेल्या, दोन वेळच्या अन्नाची भ्रांत असणाऱ्यांसाठी अनेक मदतीचे हात पुढे येताना दिसत आहे. अशीच एक उत्साह वाढवणारी बातमी आहे, वर्ध्यातील. लॉकडाउनमध्ये झळ सोसणाऱ्या अनाथांच्या उदरभरणाची जबाबदारी एका कुटुंबातील उच्चशिक्षित सुनांनी स्वीकारली आहे.
-
लॉकडाउनमुळे सर्वत्र व्यवहार ठप्प होण्यासोबतच हॉटेल, खानावळीसुध्दा ग्राहकाअभावी ठप्प पडलेल्या आहे. त्यामुळे येथून शिल्लक अन्नावर गुजराण करणाऱ्या अनाथ, भिकारी, मतिमंद असा कुठलाच निवारा नसलेल्यांवर चांगलीच आपत्ती ओढविली. एरवी किमान उरलेलं अन्नतरी त्यांना मिळायचे. मात्र कडक निर्बधांमुळे सर्वत्र शुकशूकाट असल्याने यांच्याकडे पाहायला कुणी तयार नाही.
-
अशांसाठी रामनगर पोलिसांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील अनाथांना फळे, बिस्किटे पूरविणे सुरू केले होते. त्याची लोकसत्ताने नोंद घेतल्यावर वानखेडे कुटुंबातील महिलांना गहिवर आला.
-
कुटुंबप्रमुख माजी नगरसेवक अरविंद वानखेडे यांनी वृत्ताची नोंद घेत पोलिसांकडे अशाप्रकारची मदत करण्याची परवानगी मागितली.
-
ती मिळाल्यावर कुटुंबातील सर्वांनी चर्चा करुन शहरातील गजरुंना मदत करण्याचा निर्णय घेतला.
-
शहरातील सर्वच अशा अनाथांना घरचे तयार केलेले ताजे अन्न देण्याचे ठरले.
-
यासाठी योग्य पद्धतीने आधी वानखेडे कुटुंबाने नियोजन केलं.
-
मुंबईत स्टेट बँकेत व्यवस्थापक म्हणून कार्यरत विजयची संगणक पदव्यूत्तर पत्नी हर्षिका, बंगरुळुला अभियंता असलेल्या हर्षलची व्यपस्थापनशास्त्र पारंगत पत्नी मृदूला, सासू शोभा वानखेडे, मुलांची मावशी प्रभा कापूरे, पुतणी सिमरण, चेतना व वैभवी भोयर यांनी अन्न तयार करून त्याचे वाटप करण्याची जबाबदारी घेतली.
-
'वर्क फ्रॉम होम'ची सुविधेमुळे जनसेवेची संधी साधली. भाज्या निवडणे, शिजविणे, कागदी डब्यात अन्न भरण्याच्या कार्यात सायंकाळचे सात वाजायचे.
-
रात्री आठ वाजता डबे वाटप सुरू होते.
-
अनाथांचे ठराविक ठिकाण नसते. त्यामुळे अन्नवाटप करण्यासाठी वानखेडे यांच्या घरातील सदस्य दुचाकीवरुन शहरभर फिरतात.
-
रेल्वेस्थानक, बसस्थानक, व्यापारी संकूले, काँग्रेस भवन परिसर, भाजी मार्केट अशा ठिकाणी पोट खपाटीला गेलेल्यांची उपस्थिती असते.
-
त्यांच्यापर्यत पोहोचून वानखेडे यांच्या सूना जेवणाचा गरमागरम डबा हातात ठेवतात.
-
सलग आठ दिवसापासून हे काम सुरू आहे.
-
सुरूवातीला २५ डब्याचा अंदाज ठेवला. मात्र आता तो ८० पर्यत पोहोचला आहे.
-
खिचडी, पिठलं, डाळभाजी पोळी, मसाला भात, असे मेन्यू वेगवेगळ्या दिवशी असतात.
-
एका गुरूवारी तर शिऱ्याचा पण बेत झाल्याचे मृदूला वानखेडे सांगतात.
-
गतवर्षी लॉकडाउनच्या काळात काही स्वयंसेवी संस्थांनी अनाथांची भूक भागविली होती. यावेळी मात्र थकलेले स्वयंसेवी हात घरीच विसावल्याचे चित्र दिसून आल्याने वानखेडे कुटूंबाची तत्परता गरज भागविणारी ठरली.
-
१५ मे पर्यत तरी या कुटुंबाचा अन्नदानाचा संकल्प आहे.
-
हळूहळू परिसरातील खानावळी सुरू झाल्यावर या निराश्रितांना आधार मिळेल, अशी त्यांची अपेक्षा आहे. मागील आठ दिवसापासून वानखेडेंच्या सुनांनी केलेल्या या उपक्रमाचं वर्ध्यातील नागरिकांकडून कौतुक केलं जात आहे.
Photos: वर्ध्यात मागील आठ दिवसापासून चर्चा वानखेडेंच्या सुनांची; जाणून घ्या कारण
माजी नगरसेवक अरविंद वानखेडे यांच्या कुटुंबाने हाती घेतला अनोखा उपक्रम
Web Title: Coronavirus wardha wankhede family free food distribution to needy people scsg