-
हैदराबादमध्ये झालेल्या मिस वर्ल्ड २०२५ च्या भव्य ग्रँड फिनालेमध्ये थायलंडमधील सुंदर, आत्मविश्वासू आणि बुद्धिमान मॉडेल ओपल सुचाता चुआंगश्री हिने जगभरातील स्पर्धकांना मागे टाकत प्रतिष्ठित मिस वर्ल्डचा किताब पटकावला. अवघ्या २१ व्या वर्षी ओपलने हे यश संपादन करून केवळ तिच्या देशासाठीच नव्हे तर संपूर्ण आशियासाठी अभिमानाची गोष्ट घडवली आहे. या मुकुटासह ती मिस वर्ल्डचा किताब जिंकणारी पहिली थाई महिला ठरली असून तिच्या या यशाचा सर्वत्र गौरव होत आहे. (फोटो स्रोत: @suchaata/instagram)
-
मिस वर्ल्ड २०२५ चा मुकूट जिंकणारी ओपल सुचाता चुआंगश्री केवळ सौंदर्य आणि आत्मविश्वासाचं प्रतीक नाही, तर ती शिक्षणातही तितकीच चमकली आहे. अभ्यासात सातत्याने उजवी ठरलेली ओपलने आपले प्राथमिक व माध्यमिक शिक्षण काजोंकिएत्सुक्सा शाळेत पूर्ण केले. त्यानंतर थायलंडमधील नामांकित ट्रायम उदोम सुक्सा शाळेतून तिने उच्च माध्यमिक शिक्षण घेतलं. तिच्या शैक्षणिक यशामुळे ओपल ही ‘ब्युटी विथ ब्रेन्स’चं खरं उदाहरण ठरते आणि नव्या पिढीसाठी एक जबरदस्त रोल मॉडेल बनते. (फोटो स्रोत: @suchaata/instagram)
-
सुचाताने शिक्षणातही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. शालेय शिक्षणादरम्यान तिने कला शाखेत चिनी भाषा हा प्रमुख विषय म्हणून निवडला. सध्या ती थायलंडमधील प्रतिष्ठित थम्मासॅट विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागात राजकारण आणि आंतरराष्ट्रीय संबंध या विषयांत पदवी शिक्षण घेत आहे. सुचाताचे स्वप्न आहे एक दिवस राजदूत होण्याचं! तिचं हे ध्येय तिच्या बुद्धिमत्ता आणि दूरदृष्टीचं उत्तम उदाहरण आहे. (फोटो स्रोत: @suchaata/instagram)
-
सुचाता ही त्रिभाषिक आहे. तिला थाई, इंग्रजी आणि चिनी भाषेचं उत्तम ज्ञान आहे. तिची ही बहुभाषिक क्षमता तिच्या जागतिक दृष्टिकोनाची आणि सांस्कृतिक जाणिवेची साक्ष देते. (फोटो स्रोत: @suchaata/instagram)
-
अवघ्या १८ व्या वर्षी स्पर्धेच्या मंचावर पाऊल ठेवत सुचाताने मिस युनिव्हर्स थायलंडमध्ये तिसरे स्थान मिळवले. काहीच वर्षांत २०२४ मध्ये तिने मिस युनिव्हर्स थायलंडचा मुकूट पटकावत आपली योग्यता सिद्ध केली. (छायाचित्र स्रोत: @suchaata/instagram)
-
सुचाताने मिस युनिव्हर्स २०२४ मध्ये थायलंडचे प्रतिनिधित्व करत तिसरी उपविजेती म्हणून आपली छाप पाडली. तिच्या सामाजिक भानासाठी तिला ‘व्हॉइस फॉर चेंज – सिल्व्हर अवॉर्ड’नेही गौरवण्यात आलं. मात्र, मिस वर्ल्डसारख्या आणखी मोठ्या स्वप्नासाठी तिने मिस युनिव्हर्सचा किताब अकाली सोडण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि तोच निर्णय तिच्या इतिहासनिर्मितीचं कारण ठरला. (फोटो स्रोत: @suchaata/instagram)
-
मिस वर्ल्ड २०२५ – सुचाताच्या स्वप्नांची मोठी उडी
२२ एप्रिल २०२५ रोजी सुचाताची थायलंडची अधिकृत प्रतिनिधी म्हणून निवड झाली आणि तिच्या मिस वर्ल्ड प्रवासाची सुरुवात झाली. ३१ मे २०२५ रोजी हैदराबादच्या HITEX एक्झिबिशन सेंटरमध्ये झालेल्या ७२ व्या मिस वर्ल्ड फेस्टिव्हलमध्ये तिने आपल्या आत्मविश्वास, सौंदर्य आणि प्रतिभेच्या जोरावर हा प्रतिष्ठित किताब जिंकला. विशेष म्हणजे, तिने मल्टीमीडिया चॅलेंज जिंकून थेट टॉप ४० मध्ये आपले स्थानही पक्कं केलं. (फोटो स्रोत: @suchaata/instagram) -
सुचाताचं आयुष्य केवळ ग्लॅमरने भरलेलं नाही, तर ते संघर्षांनीही सजलेलं आहे. वयाच्या १६ व्या वर्षी तिला शस्त्रक्रियेचा सामना करावा लागला. एक अनुभव, ज्याने तिला शिकवलं की खरी भीती कोणत्याही वेदनेपेक्षा मोठी असते, ती म्हणजे आपल्या स्वप्नांना गमावण्याची. पण, सुचाताने हार मानली नाही. आज तिची ही जिद्द आणि संघर्षातून घडलेली यशोगाथा लाखो महिलांसाठी एक प्रेरणादायक प्रकाशझोत ठरली आहे. (फोटो स्रोत: @suchaata/instagram)
-
प्रेरणा देणारी ओपल
सुचाताने स्तनाच्या कर्करोगाशी झुंजणाऱ्या महिलांसाठी कार्य केलं आहे. तिच्यासाठी सर्वात भावूक आणि अभिमानाचा क्षण तो होता, जेव्हा एका महिलेनं सांगितलं, “मी आज कर्करोगमुक्त आहे आणि ओपलमुळेच मी लढत राहिले.” (फोटो स्रोत: @suchaata/instagram) -
सुचाताला प्राण्यांची खूप आवड आहे. तिच्याकडे मांजरी आणि कुत्र्यांचा छोटासा संसार आहे. तिचा आवडता जीवनमंत्र – “तुमच्यामुळे कोणाचं तरी आयुष्य सहज झालं, तर तेच खऱ्या अर्थानं यश आहे.”(फोटो स्रोत: @suchaata/instagram)
Miss World 2025: ओपल सुचाता चुआंगश्री फक्त सुंदर नाही तर उच्चशिक्षितही आहे; जाणून घ्या तिचा प्रवास
मिस वर्ल्ड २०२५ शिक्षण: थायलंडच्या ओपल सुचाता चुआंगश्रीने मिस वर्ल्ड २०२५ चा किताब जिंकून इतिहास रचला आहे. हे प्रतिष्ठित पदक पटकावणारी ती पहिली थाई महिला आहे. त्यांच्या शिक्षण आणि आयुष्याशी संबंधित काही खास गोष्टी जाणून घेऊया.
Web Title: Miss world 2025 thailand opal suchata chuangcharee education journey svk 05