कर्नाटकमध्ये भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तसेच विरोधी पक्षनेतेपद गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त आहे. विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर भाजपाने या दोन्ही महत्त्वाच्या पदावर कोणाचीही नियुक्ती केलेली नव्हती. येथे लवकरच हिवाळी अधिवेशन होणार आहे. याच कारणामुळे भाजपाच्या स्थानिक नेत्यांकडून लवकरात लवकर या दोन्ही पदांवर नेत्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी केली जात होती. असे असतानाच आता भाजपाने येथे माजी मुख्यमंत्री तथा भाजपाचे नेते बी एस येडियुरप्पा यांचे चिरंजीव तसेच आमदार बी वाय विजयेंद्र यांची कर्नाटकच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.

विजयेंद्र यांची प्रदेशाध्यत्रपदी निवड

बी एस येडियुरप्पा सक्रिय राजकारणातून बाजूला झालेले आहेत. याच कारणामुळे लिंगायत समाजाची मते कायम भाजपासोबतच राहावीत यासाठी भाजपाने त्यांचे पुत्र विजयेंद्र यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली. बी वाय विजयेंद्र हे पहिल्यांदाच आमदार झालेले आहेत.

लोकसभेची निवडणूक पाहता भाजपाचा निर्णय

विधानसभा निवडणुकीत पराभव झालेला असला तरी भाजपाने येथे आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून जातीय समीकरण साधण्यासाठी भाजपाने लिंगायत समाजाचे नेते विजयेंद्र यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. याआधी भाजपाचे नेते नलीन कुमार कटील हे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष होते. गेल्या तीन वर्षांपासून ते ही जबाबदारी सांभाळत होते. कटील यांचा कार्यकाळ ऑगस्ट २०२२ मध्येच संपला होता. मात्र विधानसभा निवडणूक होईपर्यंत त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी कायम ठेवण्यात आली होती.

आमदारांची संख्या १२१ वरून ६६ पर्यंत घसरली

कर्नाटकमध्ये भाजपाने जेडीएस पक्षाशी युती केलेली आहे. या पक्षाचा वोक्लालिगा समाजावर मोठा प्रभाव आहे. त्यामुळे लिंगायत समाजावील प्रभाव कायम राहावा किंवा त्यांची मते मिळवीत यासाठी भाजपाने ही जबाबदारी विजयेंद्र यांच्यावर सोपवली आहे. येडियुरप्पा हे लिंगायत समाजाचे प्रतिनिधीत्व करणारे, महत्त्वाचे नेते आहेत. मात्र भाजपाने विधानसभा निवडणुकीत त्यांना बाजूला सारले होते. कदाचित याच कारणामुळे भाजपाच्या आमदारांची संख्या १२१ वरून थेट ६६ पर्यंत घसली. कर्नाटकच्या एकूण लोसंख्येपैकी १७ टक्के लोक हे लिंगायत समाजाचे आहेत.

म्हणून विजयेंद्र यांची प्रदेशाध्यक्षपदी नेमणूक

विधानसभा निवडणुकीत येडियुरप्पा यांना बाजूला सारल्यामुळे बसलेल्या फटक्याची जाणीव भाजपाला झाली असावी. कदाचित याच कारणामुळे येडियुरप्पा यांचे पुत्र विजयेंद्र यांच्याकडे पक्षाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने २८ पैकी २५ जागांवर विजय मिळवला होता. या निवडणुकीदरम्यान भाजपाचे नेतृत्व येडियुरप्पा यांच्याकडेच होते.

मुलासाठी येडियुरप्पा यांचे खास प्रयत्न

आगामी लोकसभा निवडणूक लक्षात घेता भाजपाने येडियुरप्पा यांना पुन्हा एकदा पक्षात स्थान देण्यास सुरुवात केली होती. भाजपाने २०२२ साली त्यांचा पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश केला होता. तसेच विजयेंद्र यांना विधानसभा निवडणुकीत तिकीट दिले होते. गेल्या अनेक दिवसांपासून येडियुरप्पा आपला मुलगा विजयेंद्र यांना राजकारणात जागा मिळावी यासाठी प्रयत्नरत होते. विधानसभा निवडणुकीत मुलाला तिकीट मिळावे यासाठी त्यांनी खास प्रयत्न केले होते. आता मात्र विदयेंद्र यांची थेट प्रदेशाध्यक्षपदी नेमणूक झाली आहे. या नेमणुकीमुळे कर्नाटक प्रदेश भाजपात अनेक बदल होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस बी एल संतोष हे कर्नाटकच्या राजकारणात स्थिरावण्याचा प्रयत्न करत आहेत. कटील हे संतोष यांचे विश्वासू मानले जातात. मात्र भाजपाने कटील यांच्याकडे असलेले प्रदेशाध्यक्षपद विजयेंद्र यांच्याकडे सोपवल्यामुळे संतोष यांना बाजूला सारले जात असल्याचे संकेत दिले आहेत. विजयेंद्र यांच्याकडे पक्षाचे नेतृत्व आल्यामुळे आपल्या मुलाला राजकारणात स्थिरस्थावर होण्यासाठी येडियुरप्पा पूर्ण ताकद लावणार आहेत.

शोभा करंदालजे यांचे नाव होते चर्चेत

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्री शोभा करंदालजे यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. शोभा या वोक्कालिगा समाजाच्या नेत्या आहेत. मात्र भाजपाने जेडीएस पक्षाशी युती केलेली आहे आणि जेडीएस पक्षाचे वोक्कालिगा समाजावर चांगले प्रभुत्व आहे. याच कारणामुळे पुन्हा एकदा प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी वोक्कालिगा समाजाच्या नेत्याकडे देणे नेतृत्वाला योग्य वाटले नसावे. म्हणूनच भाजपाने प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी एका लिंगायत समाजाच्या नेत्याकडे सोपवली आहे. आता विधिमंडळ नेतेपदी एखाद्या ओबीसी नेत्याची नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे, असे भाजपातील एका नेत्याने म्हटले.