छत्रपती संभाजीनगर : ‘मामुली’ या तीन शब्दाने काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्यासारख्या दिग्गज नेत्यास विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला होता. मारवाडी, मुस्लिम आणि लिंगायत अशी ‘मामुली’ शब्दाची फोड. ‘माधव’ सूत्रातून बांधणी करणाऱ्या भाजपला ‘मामुली’ मधील लिंगायत मतपेढी अधिक मजबूत करायची असल्याचे संकेत राजकीय पटलावर देण्यात आले आहेत. राज्यसभेसाठी डॉ. अजित गोपछडे यांना देण्यात आलेली उमेदवारी या मतपेढीला भाजप प्राधान्य देत असल्याचा संदेश देण्यासाठी घेण्यात आला. लातूर, धाराशिव, सोलापूर, नांदेड या लोकसभा मतदारसंघात तर विधानसभेच्या ३० मतदारसंघात लिंगायत मतांचा प्रभाव असल्याचा दावा केला जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : नांदेडमधील सूर्यकांता पाटील-किन्हाळकर या माजी मंत्र्यांची भाजपमध्ये उपेक्षाच !

लातूर व धाराशिव जिल्ह्यातील कर्नाटकाला जोडून असणाऱ्या भागात कानडी मातृभाषा असणाऱ्या लिंगायत मतदारांची संख्या अधिक आहे. ‘तम तम मंदी’ असा कानडी शब्द राजकीय पटावर एकगठ्ठा लिंगायत मतांसाठी वापरला जातो. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकुरकर यांचे राजकीय यश लिंगायत मतांमध्ये दडलेले होते. उमरगा हा लिंगायतबहुल मतदारसंघ लातूरला लोकसभेला जोडलेला असल्याने सात वेळा ते निवडून आले. औसा, निलंगा, अहमदपूर, उदगीर, उमरगा, सोलापूर, अक्कलकोट, इचलकरंजी, मिरज, जत आणि तासगाव या मतदारसंघांत अनेकांची लिंगायत मतदारांची पेढी तयार झाली. अलिकडच्या काळात विनय कोरे यांनी जनसुराज्य पक्षातूनही या मतपेढीला आकार दिला. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी हे तर सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आले. आता धाराशिव लोकसभा मतदारसंघातून प्रभावी लिंगायत नेता पुढे आणावा असे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. काँग्रेसचे नेते बसवराज पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा जोरदार आहे. येत्या दोन- तीन दिवसांत ते पक्षांतर करतील असे छातीठोकपणे कार्यकर्ते सांगू लागले आहेत. हा प्रयोगही लिंगायत मतपेढी वाढविण्यासाठीच घेतला जात असल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा : बबन घोलप यांचा फायदा कोणाला ?

‘माधव’ सूत्राबरोबरच लिंगायत मतपेढीला आकार देण्यासाठी डॉ. अजित गोपछडे यांचा किती उपयोग होईल यावरुन भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये शंका आहेत. केवळ वैद्यकीय आघाडीमध्ये काम करणारे संघ परिवारातील व्यक्ती अशी गोपछडे यांची ओळख होती. मात्र, भाजपला आवश्यक असणाऱ्या ‘माधव’ सूत्राला लिंगायत मतपेढीचा आधार देण्याचे प्रयत्न आकारास येतील असे चित्र निर्माण केले जात आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp gives rajya sabha candidature to dr ajit gopchade to attract lingayat voters of latur dharashiv solapur nanded print politics news css