RSS Kerala Kesari Article : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या ‘केसरी’ या मल्याळम साप्ताहिकात नुकताच एक लेख प्रसिद्ध झाला. या लेखातून धर्मांतरविरोधी कायद्याला कथित विरोध करणाऱ्या काही चर्चप्रमुखांसह धर्मगुरूंना लक्ष्य करण्यात आलं. केरळमधील सायरो-मलबार चर्चने या लेखाचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. या सर्व घडामोडींमुळे राज्यात भाजपानं सुरू केलेल्या ख्रिश्चन जनसंपर्क मोहिमेला धक्का बसण्याची शक्यता आहे. केरळमध्ये या वर्षाच्या अखेरीस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत; तर २०२६ मध्ये विधानसभा निवडणूक पार पडणार आहे.
आरएसएसशी संबंधित केसरी या साप्ताहिकात लेख छापून आल्यानंतर सोमवारी सायरो-मलबार चर्चने या लेखाचा तीव्र निषेध केला. हे चर्च भाजपाच्या ख्रिश्चन जनसंपर्क मोहिमेसाठी अतिशय महत्त्वाचे मानले जाते. “केरळमधील निरापराध लोकांना खोट्या प्रचाराद्वारे असहिष्णू करून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दंगल घडवण्याचा प्रयत्न आहे का,” असा प्रश्न सायरो-मलबार चर्चकडून उपस्थित करण्यात आला.
‘केसरी‘च्या लेखामध्ये काय म्हटलंय?
‘केसरी’ या साप्ताहिकाच्या ताज्या अंकात “क्रोनॉलॉजी ऑफ ग्लोबल कन्व्हर्जन” (जागतिक धर्मांतराची कालक्रमानुसार मांडणी) या शीर्षकाखाली लेख प्रकाशित झाला. हा लेख हिंदू ऐक्य वेदीचे राज्य उपाध्यक्ष ई. एस. बिजू यांनी लिहिला आहे. हिंदू ऐक्य वेदी ही केरळमधील संघ परिवाराशी संलग्न विविध संघटनांची आघाडी मानली जाते. या लेखात बिजू यांनी देशभरातील धार्मिक धर्मांतरावर संपूर्ण बंदी घालण्याची मागणी केली आहे. “सध्याची विचित्र परिस्थिती संपली पाहिजे. गरज पडल्यास संविधानात दुरुस्ती करावी… काही चर्चप्रमुख आणि धर्मगुरू ११ राज्यांमध्ये लागू असलेले धर्मांतरविरोधी कायदे रद्द करण्याची मागणी करीत आहेत,” असा आरोप बिजू यांनी लेखातून केला आहे.
आणखी वाचा : बिहारमध्ये तेजस्वी यादव लढवणार २४३ जागा! राहुल गांधी व काँग्रेससाठी धक्का?
भाजपावरही उठवली होती टीकेची झोड
जुलै महिन्यात छत्तीसगडमध्ये केरळमधील दोन कॅथॉलिक नन्सना जबरदस्तीने धर्मांतर आणि मानवी तस्करीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. त्यावेळी हिंदू ऐक्य वेदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील इतर कट्टरपंथी गटांनी ख्रिस्ती धर्मांतराचा मुद्दा उकरून काढला होता. तसेच, त्या नन्सना पाठिंबा देण्यासाठी दुर्ग येथे गेलेल्या भाजपा नेत्यांवरही त्यांनी टीकेची झोड उठवली होती. ‘केसरी‘च्या लेखात या प्रकरणाचाही उल्लेख करण्यात आला आहे. राजकीय आणि धार्मिक नेत्यांनी छत्तीसगडमधील नन्स प्रकरणाचा धार्मिक द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप लेखातून करण्यात आला आहे.
‘केसरी‘तील लेखात धर्मांतराचा मुद्दा
न्यायालयीन प्रक्रियेत असलेल्या या प्रकरणात राजकीय पक्ष व सरकार यांचा हस्तक्षेप अयोग्य असल्याचं लेखात नमूद करण्यात आलं आहे. हा हस्तक्षेप पीडितांना न्याय नाकारण्यासारखाच असल्याची टीकाही त्यात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या लेखात भाजपाच्या कोणत्याही नेत्याचं नाव थेटपणे घेण्यात आलेलं नाही. मात्र, त्यात धार्मिक धर्मांतराबाबतची चिंता व्यक्त करण्यात आली आहे. “राज्यातील बहुसंख्य समाजानं सदैव जागृत राहिलं पाहिजं. हिंदू समाजाच्या उन्नती व एकतेसाठी प्रयत्न करणाऱ्यांनी कोणतीही रणनीती अवलंबून धर्मांतराच्या शक्तींना पराभूत केलं पाहिजे. जर धर्मांतर हा धार्मिक शक्तींचा अधिकार असेल, तर धर्मांतराला विरोध करणे आणि त्याविरुद्ध संघर्ष करणं हा हिंदूंचाही अधिकार व कर्तव्य आहे,” असे बिजू यांनी लेखात लिहिलं आहे.
‘केसरी‘च्या लेखाला सायरो-मलबार चर्चकडून प्रत्युत्तर
केसरी या साप्ताहिकामध्ये छापून आलेल्या लेखावर सायरो-मलबार चर्चने फेसबुकवरून पोस्ट करीत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. “केसरी या साप्ताहिकातून असा अपप्रचार का केला जात आहे? हा लेख सर्वसामान्यांची माथी भडकावणारा आणि दिशाभूल करणारा आहे. केरळला सांप्रदायिक करण्याचा व भारतात ध्रुवीकरण घडवण्याचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न आहे. या लेखातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा खोटेपणा दिसून येतो,” अशी टीका सायरो-मलबार चर्चने केली आहे. दरम्यान- ‘दीपिका’ या कॅथॉलिक चर्चच्या अधिकृत दैनिकातूनही राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करण्यात आली आहे. “शताब्दी वर्षातही आरएसएस आपली ‘विचारधारा’ लपवू शकत नाही,” असा घणाघात संपादकीय लेखातून करण्यात आला आहे.
हेही वाचा : Asaduddin Owaisi : भाजपाकडून वक्फ बोर्डाला कमकुवत करण्याचा प्रयत्न? असदुद्दीन ओवैसी यांचा आरोप काय?
केरळमधील भाजपाच्या ख्रिस्ती मोहिमेला धक्का?
काँग्रेसनेही याच मुद्द्याला हाताशी धरून भाजपाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. “केसरी साप्ताहिकातील लेखातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा ख्रिस्ती धर्माविषयीचा विरोधी दृष्टिकोन दिसून येतो. या लेखामुळे भाजपाचे खरे स्वरूप उघड झाले आहे. छत्तीसगडमध्ये अटक झालेल्या नन्सबरोबर छायाचित्रे काढणारे भाजपाचे राज्याध्यक्ष राजीव चंद्रशेखर यांचाही चेहरा उघड झाला आहे,” अशी टीका काँग्रेसचे सरचिटणीस (संघटन) के. सी. वेणुगोपाल यांनी केली आहे.
‘केसरी’च्या लेखावर भाजपाची प्रतिक्रिया काय?
दरम्यान, केरळमध्ये ख्रिस्ती समाजाशी संवाद साधण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या भाजपाने मात्र या लेखावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. गेल्या काही महिन्यांत पक्षाने राज्य व जिल्हा स्तरावरील संघटनांमध्ये अधिक ख्रिस्ती प्रतिनिधींना स्थान देण्याचा प्रयत्न केला आहे. धर्मांतराच्या प्रश्नावर मात्र भाजपाकडून सावध भूमिका घेतली जात असून, प्रामुख्याने मोदी सरकारच्या विकासाच्या अजेंड्यावर भर दिला जात आहे. जुलै महिन्यात नन्सना अटक झाली तेव्हा पक्षाने ख्रिस्ती समाजाशी संपर्क मोहिमेत मोठी प्रगती केली होती. त्या काळात भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी ख्रिस्ती कुटुंबांना व धर्मगुरूंच्या सणासुदीच्या काळात भेटीगाठी घेतल्या होत्या. आता केसरी या साप्ताहिकात छापून आलेल्या लेखावर भाजपाचे नेते काय प्रतिक्रिया देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.