आगामी लोकसभा निवडणूक आणि या निवडणुकीसाठी जातीय समीकरणाचा विचार करता, काँग्रेसने टीकाराम जुल्ली यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती केली आहे. ते दलित समाजातून येतात. जुल्ली हे राजस्थानचे दलित समाजातून येणारे पहिले विरोधी पक्षनेते ठरले आहेत. गोविंद सिंह डोटासरा यांच्याकडे राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद कायम असेल.
पक्षाचे मानले आभार
टीकाराम जुल्ली हे आतापर्यंत तीन वेळा आमदार राहिलेले आहेत. विशेष म्हणजे अशोक गहलोत सरकारमध्ये ते सामाजिक न्यायमंत्री होते. विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती झाल्यनंतर त्यांनी काँग्रेस पक्षाचे आभार मानले. तसेच राज्यातील सरकार योग्य मार्गाने काम कसे करेल याकडे माझे लक्ष असेल, असे टीकाराम जुल्ली म्हणाले.
“सरकार नागरिकांना विसरत असेल तर..,”
“हे सरकार राज्यातील दलित, गरीब, मागास, अल्पसंख्याक, विद्यार्थी, महिला, वृद्ध, उद्योजक, सामान्य माणूस किंवा कोणत्याही वर्गातील नागरिकाला विसरत असेल, तर आम्ही सरकारच्या ते लक्षात आणून देऊ. लोकांच्या कल्याणासाठी तुम्हाला सत्ता दिलेली आहे, याची आम्ही सत्ताधाऱ्यांना सतत जाणीव करून देऊ,” असेही जुल्ली यांनी स्पष्ट केले.
जातीय समीकरण साधण्याचा प्रयत्न
जुल्ली हे दलित समाजातून येतात; तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेले डोटसारा हे जाट समाजातून येतात. आगामी लोकसभा निवडणूक ही अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे जाट आणि दलित समाजातील नेत्यांना संधी देऊन, या समाजांतील मतांना आकर्षित करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जातोय. काँग्रेसचा हा प्रयत्न किती यशस्वी ठरणार, ते पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.
राजकारणात येण्याआधी समाजकार्यात सक्रिय
जुल्ली हे राजकारणात येण्याआधी सामाजिक कार्यांत सक्रिय होते. रक्तदान शिबिरांचे आयोजन, गरीब घरांतील मुलींच्या लग्नासाठी सामूहिक विवाहसोहळे आयोजित करणे अशा प्रकारची कामे जुल्ली करायचे. मेघवाल विकास समिती, अलवर विकास समितीच्या माध्यमातूनही त्यांनी दलित समाजाच्या विकासासाठी प्रयत्न केलेला आहे. जुल्ली हे २००५ ते २००८ या काळात अलवर जिल्हा परिषदेचे जिल्हाप्रमुख होते. ते जितेंद्र सिंह या काँग्रेस नेत्यांच्या फार जवळचे नेते मानले जातात. जुल्ली यांना विरोधी पक्षनेतेपद मिळावे यासाठी जितेंद्र सिंह यांनी प्रयत्न केल्याचे म्हटले जात आहे.
२००८ साली पहिल्यांदा आमदार
जुल्ली हे २००८ साली पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. त्यांनी या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार जगदीश प्रसाद यांचा साधारण आठ हजार मतांच्या फरकांनी पराभव केला होता. २०१३ सालच्या मोदी लाटेत त्यांचा पराभव झाला. २०१८ साली जुल्ली यांनी पुन्हा एकदा भाजपाच्या उमेदवाराला पराभूत करत निवडणूक जिंकली होती.
गहलोत सरकारमध्ये अगोदर राज्यमंत्री आणि त्यानंतर बढती
जुल्ली सुरुवातीला अशोक गहलोत यांच्या सरकारमध्ये राज्यमंत्री होते. नोव्हेंबर २०२१ मध्ये जुल्ली यांना बढती मिळाली. त्यांना मंत्रिपद देण्यात आले. २०१० साली राज्यात मंत्री असताना त्यांनी हरियाणातील रोहतकमधील दयानंद विद्यापीठातून कला शाखेत पदवी मिळवली. २०१५ साली त्यांनी राजस्थान विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. त्यांना दोन मुली आहेत.