छत्रपती संभाजीनगर – मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर अन्न व नागरी पुरवठा विभागासारख्या महत्त्वाच्या मंत्रीपदाचा राजीनामा देण्याची वेळ आलेले अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांचे मौन अखेर अनेक महिन्यानंतर सुटले. मौन सोडताना मुंडे यांनी पहिले लक्ष्य बीडचे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांना केले आहे.

बीडमधील खासगी शिकवणीचालक आणि अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळ प्रकरणात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झालेला आरोपी विजय पवार हा आमदार संदीप क्षीरसागर यांचा निकटवर्तीय आहे. त्यामुळेच विजय पवारला आमदार क्षीरसागर यांनी बीडच्या शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष केले होते. विजय पवारविरुद्ध गुन्हा दाखल झाला त्याच रात्री तो आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासोबत होता आणि त्या पुढच्या दोन दिवसात पीडितेच्या वडिलांना २० फोन गेले असा थेट आरोप आमदार धनंजय मुंडे यांनी केला.

याप्रकरणात सीडीआर तपासावेत, अशी मागणी करून हा प्रश्न विधिमंडळात उपस्थित करण्यात येईल आणि मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेटही आपण घेणार असल्याचे आमदार मुंडे यांनी पत्रकार बैठक घेऊन सांगितले. यावेळी मुंडेंसोबत डॉ. योगेश क्षीरसागर यांचीही उपस्थिती होती. संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचाही हात असून त्यांची चौकशी करावी, अशी मागणी करत आमदार संदीप क्षीरसागर यांनी मुंडे यांना सातत्याने लक्ष्य केले होते. विधिमंडळातही ते मुंडे यांच्यावर आरोप करत होते. बीड जिल्ह्यात धनंजय मुंडे यांच्याविरोधात वातावरण तापवण्यासह संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ बीडमध्ये काढण्यात आलेल्या पहिल्या  मोर्चासाठीची जुळवाजळव करण्यात संदीप क्षीरसागर महत्वाच्या भूमिकेत होते.

धनंजय मुंडे हे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत. सरकार आणि प्रशासन त्यांचे आहे. त्यांना या प्रकरणात लक्ष घालावे का वाटले, त्यासाठी पत्रकार परिषद का घ्यावीशी वाटली, याचीही उलट तपासणी व्हायला पाहिजे. आरोपी माझ्यासोबत होते की नाही वगैरेची चौकशी करावी.

संदीप क्षीरसागर, आमदार, राष्ट्रवादी (शरद पवार)