नंदुरबार : नंदुरबार लोकसभा मतदारसंघात महायुतीतील मित्रपक्षांकडून साथ मिळत नसल्याने भाजपच्या उमेदवार डॉ. हिना गावित यांनी शनिवारी येथील शिवसेना भवनात शिंदे गटाचे नेते चंद्रकांत रघुवंशी यांची भेट घेत प्रचाराचे आमंत्रण दिले. परंतु, गावित आणि रघुवंशी गटातील वादावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्तरावरच चर्चा होऊ शकते. ते जो निर्णय देतील तो अंतिम असेल, असे रघुवंशी यांनी स्पष्ट केल्याने सध्यातरी वादावर कोणताही तोडगा निघू शकलेला नाही.

शिंदे गटाने प्रारंभापासूनच डॉ. हिना गावित यांच्या उमेदवारीस विरोध केला होता. तरीही भाजपने त्यांना पुन्हा उमेदवारी दिल्याने नाराज शिंदे गट प्रचारापासून दूर असून त्यांच्या कार्यकर्त्यांनी थेट विरोधी काँग्रेस उमेदवाराला बळ देण्यास सुरुवात केल्याने भाजपमध्ये अस्वस्थता आहे. रघुवंशी स्वत: काँग्रेसचा प्रचार करत नसले तरी त्यांचे समर्थक उघडपणे काँग्रेसच्या मिरवणुकीत फिरत असल्याने त्यांना रघुवंशी यांचे पाठबळ असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी डॉ. हिना गावित स्वत: चंद्रकांत रघुवंशी यांच्या कार्यालयात दाखल झाल्या. प्रारंभी काही निवडक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत दोन्ही नेत्यांची बैठक झाली. नंतर काही मिनिटे गावित आणि रघुवंशी यांच्यातच चर्चा झाली. यावेळी शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राम रघुवंशी वगळता कोणीही उपस्थित नव्हते.

आणखी वाचा-उत्तर प्रदेशात नरेंद्र मोदी आणि योगींच्याच विरोधकांपेक्षा अधिक सभा!…

कार्यकर्त्यांसमवेत झालेल्या बैठकीत गावित यांनी रघुवंशी यांना प्रचारासाठी आमंत्रित केले. यावेळी रघुवंशी यांनी, आपल्या कार्यकर्त्यांसह आपल्यात असलेली दुही पाहता दोन्ही गटातील वाद हे मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या समक्षच सुटतील, असे नमूद केले. ते जे निर्णय घेतील, तो अंतिम असेल, असे त्यांनी सांगितल्यानंतर गावित यांनी माध्यमांशी बोलणे टाळले. शिवसेना हा महायुतीतील घटकपक्ष असल्याने त्यांना प्रचारासाठी आमंत्रित करण्यासाठी आले होते, असे गावित यांनी नमूद केले.