गँगस्टर राजू थेठच्या हत्येचे पडसाद राजस्थानच्या राजकारणात उमटे. राजू थेठ शनिवारी (३ डिसेंबर) सिकर जिल्ह्यात सशस्त्र हल्लेखोरांनी हत्या केली होती. जातीय समीकरण लक्षात घेता येथे वेगवेगळ्या पक्षांनी राजू थेठच्या मृत्यूनंतर वेगवेगळ्या भूमिका घेतल्या आहेत.
राजू थेठ याची शनिवारी वयाच्या ४० व्या वर्षी हत्या झाली. यापूर्वी पाच वर्षांआधी म्हणजेच २०१७ साली आनंदपाल सिंह या दुसऱ्या अशाच गँगस्टरला एन्काऊंटरमध्ये ठार करण्यात आले होते. अगोदर राजू थेठ आणि आनंदपाल सिंह हे छोटे गुन्हेगार समजले जायचे. मात्र पुढे त्यांनी आपापल्या दोन स्वतंत्र टोळ्या निर्माण केल्या होत्या. त्यांच्याकडून अवैध दारूविक्री तसेच खंडणी केली जायची.
हेही वाचा >> शशी थरूर यांना थेट राष्ट्रवादीकडून ऑफर, म्हणाले “पक्षात येण्याची… “
राजू थेठ जाट तर आनंदपाल हा राजपूत सामजातून होता . याच कारणामुळे त्या-त्या जातीचे लोक त्यांच्या पाठीमागे होते. अनेक तरुणांना हे दोघे रॉबिनहूड वाटायचे. हे दोन्ही गँगस्टर चांगले असून परिस्थितीमुळे त्यांना हा मार्ग निवडावा लागला, अशी भावना जाट आणि राजपूत समाजात होती. विशेष म्हणजे या दोन्ही गँगस्टर्सना राजकीय संरक्षण होते असे म्हटले जाते. येथे जात आणि समाजाधारित राजकारणाची पाळमुळं रुजलेली असल्यामुळे त्यांना हे संरक्षण मिळत होते, असे म्हटले जाते. मात्र राजकीय पक्षांनी याला नकार दिलेला आहे. राजू थेठच्या हत्येनंतर राजस्थानमधील राजकीय नेत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
हेही वाचा >> Gujarat Election 2022 : गुजरात निवडणुकीत महिला मतदारांच्या टक्केवारीत घट; नक्की काय आहे कारण?
“राजू थेठ हा गुन्हेगार होत, असे तुम्ही म्हणाल. मात्र तो जर गुन्हेगार असेल तर ते ठरवण्याचा अधिकार न्यायालयाचा आहे. राजू थेठची हत्या म्हणजे पोलीस आणि तपाससंस्थांचे अपयश आहे. सिकर येथील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे,” अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे आमदार मुकेश भाकर यांनी दिली आहे. भाकर यांनी राजू थेठच्या हत्येनंतर सिकर जिल्ह्यात जाऊन आंदोलन केले होते. राजस्थान विद्यापीठ विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष निर्मल चौधरी हे जाट समाजाचे आहेत. यांनी थेठच्या कुटुंबीयांना संरक्षण पुरवावे अशी मागणी केली आहे.
राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीचे खासदार हनुमान बेनिवाल यांनीदेखील सिकर जिल्ह्यात धरने आंदोलन केले होते. सरकारने या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे तसेच थेठच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिल्यानंतर बेनिवाल यांनी आपले आंदोलन मागे घेतले.
हेही वाचा >> MCD Election : मतदान यादीतून अनेक नावं गायब…; ‘आप’ करणार निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार!
तर आनंदपाल या गँगस्टरच्या मृत्यूनंतर राजपूत समाज भाजपावर नाराज आहे. राजपूत समाजाकडून भाजपाविरोधी मत तयार झाल्याचे येथील जानकार सांगतात. आनंदपाल याची बनावट एन्काऊंटरच्या माध्यमातून हत्या करण्यात आली, असा दावा राजपूत समाजाकडून केला जातो. एन्काऊंटरमध्ये आनंदपालचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या गावात हजारो तरुणांनी गर्दी केली होती. तसेच या समाजाने आनंदपालाचे अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला होता.