नागपूर: राज्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे असल्याने प्रत्येक नागपूरकरांना त्याचा सार्थ अभिमान. ते नागपुरात आले की त्यांच्यासोबत छायाचित्रे काढण्यासाठी होणारी गर्दी यातून याची प्रचिती येते. मात्र कधी -कधी एखाद्या व्यक्तीवरचे प्रेम व्यक्त करताना ते ऊतू गेल्यास त्याचे चटके संबंधित व्यक्तीला सहन करावे लागते.  सध्या राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारच्या नेतृत्वाला याचाच अनुभव येत आहे.  यासाठी कारणीभूत ठरले ते दोन नागपूरकर. त्यानी केलेल्या विधानांमुळे ऐन अधिवेशन काळात सरकार चांगलेच अडचणीत सापडले आहेत.यातील पहिले नागपूरकर आहेत प्रशांत कोरटकर आणि दुसरे आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैय्याजी जोशी. वरील दोघांनी प्रथम वादग्रस्त वक्तव्य करून नंतर  ते अंगलट येतोय हे लक्षात येताच त्यापासून हात झटकले. मात्र  यामुळे  सरकारची जी शोभा व्हायची ती झालीच. खुद्द मुख्यमंत्र्यांना खुलासा करावा लागला. यातच सर्व काही आले. मात्र या सर्व प्रकरणातील वेळ,बारकावे लक्षात घेतले तर अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यापैकी एक प्रश्न पडतो तो हा की, सर्व प्रकार ‘ तू मारल्या सारखं कर…’ या घाटीतील तर नाही ना?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोरटकर ‘ चिल्लर ‘ मग पोलीस संरक्षण का ?

राज्यातील मराठा समाज भाजपवर  नाराज असताना  नागपूरकर पत्रकार प्रशांत कोरटकरने   इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना  धमकी देताना चक्क शिवछत्रपतींबाबतच वादग्रस्त वक्तव्य केले. एवढेच करून कोरटकर थांबला नाही तर त्याने त्यापुढे जात ” तुम्ही ब्राह्मण मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली आहात” असे  धक्कादायक विधान केले.  हे कोरटकर कोण? हे नागपूरकरांना सांगण्याची गरज नाही. त्याची आर्थिक भरभराट कोणाच्या काळात झाली हे वेगळे सांगायला  नको. त्यामुळे त्याने केलेले वक्तव्य अनवधानाने केले असण्याची शक्यता कमीच वाटते. यातच पोलिसांना त्याने दिलेला चकमाही आश्चर्यकारक वाटावा असाच आहे. तो व्हिडिओ जारी करतो आणि पोलीस म्हणतात तो फरार आहे. यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. विधिमंडळात विरोधी पक्षाने हा मुद्दा रेटून धरल्यावर मुख्यमंत्र्यांना त्यावर भाष्य करावे लागले.

‘ कोरटकर चिल्लर ‘ आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले  पण त्यांनाच त्यांचे नाव घ्यावे लागले यावरून चिल्लर माणसाला महत्व आले. कोरटकर यांनी  वादणयग्रस्त विधान कोणाच्या सांगण्यावरून केले ? नंतर त्याने  सारवासारव का केली. हे सर्व प्रश्न अनुत्तरित आहेत.

भैय्याजी जोशी यांचे वादग्रस्त

वक्तव्यमुंबईत विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना आणि मुंबईसाठी मराठीचा मुद्दा अत्यंत संवेदनशील असताना राष्ट्रीय स्वसंसेवक संघाचे भैय्याजी जोशी यांनीघाटकोपरची भाषा गुजराती असे विधान करून नव्या वादाला तोंड फोडले. नेहमी प्रमाणे जोशी यांनी यू टर्न घेतला.

” मी विविध भाषांच्या सह अस्तित्वावर बोलत होतो .मुंबई व महाराष्ट्राची भाषा मराठीच आहे व प्रत्येकाला मराठी भाषा शिकली पाहिजे” असे  जोशी यांनी नंतर स्पष्ट केले. पण त्यांच्या वक्तव्यावर सरकारला   खुलासा करावा लागला. महाराष्ट्राची भाषा मराठीच आहे हे सांगावें लागले. मात्र जोशींच्या वक्तव्यातून भाजपचे मराठी भाषा प्रेम किती बेगडी आहे हे स्पष्ट झाले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Government in trouble over controversial statements of prashant koratkar and bhaiyyaji joshi print politics news amy