Loksabha Election Exit Poll सर्व देशाच्या नजरा एक्झिट पोलकडे लागल्या आहेत. पुढील दोन दिवस सर्वत्र एक्झिट पोलच्या अंदाजाची चर्चा असणार आहे. ४ जून रोजी अंतिम निकाल जाहीर होतील. पण त्यापूर्वी एक्झिट पोलचे निष्कर्ष काय आहेत? याची उत्सुकता नागरिकांमध्ये आहे. याच पार्श्वभूमीवर मागील लोकसभा निवडणुकींच्या एक्झिट पोलच्या आकडेवारीवर आणि एक्झिट पोलचा अंदाज किती अचूक होता, यावर एक नजर टाकूया

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२०१४ आणि २०१९ या दोन सार्वत्रिक निवडणुका नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपाने मोठ्या फरकाने जिंकल्या होत्या. २०१४ च्या लोकसभा निवडणुका ७ एप्रिल ते १२ मे दरम्यान झाल्या होत्या, ज्याचा निकाल १६ मे रोजी जाहीर झाला होता. तर, २०१९ च्या निवडणुका ११ एप्रिल ते १९ मे या कालावधीत झाल्या होत्या आणि याचा निकाल २३ मे रोजी जाहीर करण्यात आला होता.

एक्झिट पोल २०१४ (छायाचित्र-लोकसत्ता डिजिटल टिम)

हेही वाचा : Exit Poll: ‘एक्झिट पोल’ म्हणजे काय? निकालाचा अंदाज कसा लावला जातो?

२०१४ मध्ये, सरासरी आठ एक्झिट पोलमध्ये भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला २८३ जागा आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएला १०५ जागा मिळाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्या वर्षी ‘मोदी लाट’ किती असेल याचा अंदाज लावता आला नाही; ज्यामुळे एक्झिट पोल आणि निकालाच्या आकडेवारीत बरेच अंतर होते. २०१४ च्या निवडणुकीत एनडीएला ३३६ जागा मिळाल्या आणि यूपीएला केवळ ६० जागा मिळाल्या. यापैकी भाजपाला २८२, तर काँग्रेसला ४४ जागा मिळाल्या.

एक्झिट पोल २०१९ (छायाचित्र-लोकसत्ता डिजिटल टिम)

२०१९ मध्ये, सरासरी १३ एक्झिट पोलने एनडीएची एकत्रित संख्या ३०६ आणि यूपीएची एकत्रित संख्या १२० असेल, असा अंदाज वर्तवला होता. हादेखील अंदाज अचूक नव्हता. कारण २०१९ च्या निवडणुकीत एनडीएने एकूण ३५३ जागा जिंकल्या, तर यूपीएने ९३ जागा जिंकल्या. त्यापैकी भाजपाला ३०३ आणि काँग्रेसला ५२ जागा मिळाल्या होत्या.

एक्झिट पोल २००९ (छायाचित्र-लोकसत्ता डिजिटल टिम)

हेही वाचा : Loksabha Election 2024 Results: ४ जूनला कशाप्रकारे पार पडेल मतमोजणी? काय असते प्रक्रिया आणि नियम?

२००९ मध्ये यूपीए पुन्हा सत्तेत आले होते. त्यावेळी सरासरी चार एक्झिट पोलने यूपीएच्या संख्येला कमी लेखले होते. त्यांनी यूपीएला १९५ आणि एनडीएला १८५ जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला होता. परंतु, त्या निवडणुकीत यूपीएला २६२ जागा, तर एनडीएला १५८ जागा मिळाल्या होत्या. यापैकी काँग्रेसने २०६ जागा आणि भाजपाने ११६ जागा जिंकल्या होत्या.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How close exit polls were in 2009 2014 2019 rac