गडचिरोली : लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपला गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी आणि ओबीसी समाजाच्या नाराजीचा मोठा फटका बसला होता. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आदिवासी समाजाच्या नाराजीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. नुकत्याच झालेल्या धनगर आरक्षणविरोधी मोर्चात जिल्हाभरातून आलेल्या आदिवासींनी भाजपचे आमदार डॉ. देवराव होळी भाषणाला उभे राहताच ‘होळी गो बॅक’च्या घोषणा दिल्या. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत आदिवासींची नाराजी दूर करण्याचे भाजपपुढे मोठे आव्हान असणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गडचिरोली जिल्ह्यात तीनही विधानसभा क्षेत्र अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. जिल्ह्यात असलेली आदिवासींची मते प्रत्येक निवडणुकीत निर्णायक ठरली आहे. त्यामुळे ही मते आपल्याकडे कशी वळवता येईल याकडे प्रत्येक पक्षाचा कल असतो. २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा आणि विधानसभेत ही मते खेचण्यात भाजपला बऱ्यापैकी यश आले होते. परंतु २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आदिवासी मतदार भाजपपासून दुरावला गेला. तत्पूर्वी, कधी नव्हे ते आदिवासी समाजाच्या युवकांनी एकत्र येत गडचिरोली शहरात भाजपचे तत्कालीन खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी आणि आमदार कृष्णा गजबे यांच्या विरोधात मोर्चा काढला होता. निमित्त होते आमदार होळी यांच्या वादग्रस्त विधानाचे. तेव्हापासून आदिवासी तरुणांमध्ये भाजपविषयी दुरावा निर्माण झाला आहे. त्यानंतर झालेल्या आंदोलन आणि मोर्चात आमदार डॉ. देवराव होळी यांना आदिवासी समाजातून मोठा विरोध झाला.

हेही वाचा : Uttar Pradesh Politics: उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष अन् भाजपात वाद का पेटला? चर्चेत आलेले जेपी सेंटर नेमके काय आहे?

काही दिवसांपूर्वी धनगरांना आदिवासींतून आरक्षण नको ही मागणी घेऊन गडचिरोलीत हजारो आदिवासींनी एकत्र येत मोर्चा काढला होता. यात देखील आमदार होळी भाषणासाठी उभे झाले असता त्यांचा मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला. इतकेच नव्हे तर आदिवासी तरुणांनी ‘होळी गो बॅक’च्या घोषणा दिल्या. यावरून आदिवासींमध्ये भाजपविषयी असलेली नाराजी अद्याप दूर झालेली नाही, हेच दिसून आले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप ही नाराजी कशी दूर करणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.

हेही वाचा : ‘लाडकी बहीण’ला ‘महालक्ष्मी’ने उत्तर? काँग्रेसच्या जाहीरनाम्यात समावेशाची शक्यता

नाराजी भाजपविषयी की होळींविषयी?

मागील वर्षभरापासून विविध मोर्चात, आंदोलनात एकत्र जमलेल्या आदिवासींमध्ये भाजपविरोधी सूर दिसून आला. दुसरीकडे, यात आमदार देवराव होळी यांना लक्ष्य करण्यात आले. त्यामुळे आदिवासींची नाराजी ही भाजपवर नसून आमदार होळींवर आहे, असाही एक मतप्रवाह भाजपमध्ये आहे. त्यामुळे भाजपमधील एका गटाचा आमदार होळी यांच्या उमेदवारीला विरोध आहे. त्यांनी पक्ष नेतृत्वाकडे उमेदवार बदलाचीदेखील मागणी केली आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In gadchiroli bjp has challenge to overcome the displeasure among tribal community print politics news css