अलिबाग : राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात यावेळेस स्थान मिळालेले नसले तरी विधिमंडळ अधिवेशनानंतर होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात पहिलं नाव हे माझेच असेल असा विश्वास शिंदे गटाचे विधिमंडळातील पक्षप्रतोद आमदार भरत गोगावले यांनी व्यक्त केला. मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने नाराज नसल्याचे स्पष्टीकरणही त्यांनी यावेळी दिले. राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार मंगळवारी पार पडला या मंत्रिमंडळ विस्तारात रायगडच्या एकाही आमदाराला स्थान मिळू शकले नाही़ त्यामुळे रायगडात नाराजीचा सूर होता़. भाजप आणि शिंदे समर्थक गटाचे प्रत्येकी तीन आमदार असून एकाही आमदाराचा मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने रायगडकरांना मंत्रिमंडळात स्थान का नाही, असा प्रश्न विचारला जाऊ लागला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा… चित्रपटाच्या पोस्टर्सवरून केरळमध्ये राजकीय वातावरण तापले

हेही वाचा… मंत्रालयातील मंत्र्यांच्या दालनांची जागा बदलली तेव्हा…

महाडचे आमदार भरत गोगावले यांची मंत्रिमंडळात वर्णी लागेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. त्यांचे नावही चर्चेत होते. मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी झालेल्या बैठकीत त्यांना निमंत्रित करण्यात आले होते. मात्र आयत्यावेळी त्यांचे नाव वगळण्यात आले; त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.

भरत गोगावले यांनी यावर गुरुवारी आपली प्रतिक्रिया दिली. राजकारणात तडजोडी कराव्या लागतात. आज मंत्रिमंडळात समावेश झालेला नसला तरी पुढील मंत्रिमंडळ विस्तारात माझे नाव पहिलेच असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुढील मंत्रिमंडळ विस्तार केला जाईल त्यात माझ्यासह आणखीन काही सहकाऱ्यांचा समावेश असेल. रायगडचा पालकमंत्री मीच होईन. जिल्ह्यातील भाजप आमदारांचाही आपल्याला पाठिंबा असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. सुरुवातीपासून एकनाथ शिंदे यांच्यासोबत होतो आणि कायम त्यांच्यासोबत राहीन. जे मंत्री सत्ता सोडून शिंदे गटात आमच्यासोबत आले होते त्यांना मंत्रिमंडळात प्राधान्य देणे गरजेचे होते, त्यामुळे एक पाऊल मी मागे आलो. कार्यकर्त्यांनी नाराज होऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In news cabinet expansion my name will be first said by mla bharat gogawale print politics news asj