पंढरपूर : सांगोला विधानसभा मतदारसंघ म्हटले की, दिवंगत आमदार गणपतराव देशमुख हे नाव सहजपणे पुढे येते. सांगोल्यात देशमुख आणि त्यांचे परंपरागत प्रतिस्पर्धी आमदार शहाजीबापू पाटील यांच्यातील लढती आजवर अनेकदा रंगल्या आहेत. गेल्या निवडणुकीपासून प्रत्यक्ष देशमुख हे निवडणूक रिंगणात नसले, तरी शेकापचे देशमुख घराणे आणि शहाजीबापू यांच्यातच सामना रंगत आहे. याही वर्षीही अशीच लढाई होणार हे निश्चित असले, तरी मतदारसंघात पोहोचलेले पाणी, काही प्रमाणात हटलेला दुष्काळ, विकासकामांचे जाळे ही शहाजीबापूंची यंदा जमेची बाजू आहे. दुसरीकडे आजवर बालेकिल्ला म्हणून ओळख असलेला सांगोला राखण्याचे आव्हान शेकाप आणि देशमुख कुटुंबीयांपुढे आहे.

राज्यातील शेकापचे ज्येष्ठ नेते दिवंगत गणपतराव देशमुख तब्बल पाच दशके सांगोला मतदारसंघाचे आमदार होते. या काळात १९९५ मध्येच त्यांना पराभव पाहावा लागला होता. १९९५ आणि २०१९ च्या निवडणुकीत देशमुख यांचे परंपरागत प्रतिस्पर्धी आमदार शहाजीबापू पाटील यांनी विजय प्राप्त केला. जनमानसात असलेली प्रतिमा आणि जातीय समीकरणाच्या जिवावर गणपतराव देशमुख यांची सांगोल्यावरील पकड कायम घट्ट राहिली. मात्र त्यांच्यामागे आता शेकाप आणि देशमुख घराण्यास आपले अस्तित्व टिकवण्यासाठी लढाई करावी लागणार आहे.

हेही वाचा :PM Modi Election Rallies: हरियाणात विजय मिळवणं भाजपासाठी महत्त्वाचं का? ही आहेत तीन कारणे…

गेल्या निवडणुकीत गणपतराव यांनी माघार घेतली होती. त्यावेळी त्यांनी त्यांचे वारसदार म्हणून नातू डॉ. अनिकेत देशमुख यांचे नाव निश्चित केले. त्यांच्या विरोधात निवडणुकीतील शिवसेनेचे पारंपरिक उमेदवार शहाजीबापू पाटील हे उभे होते. या अटीतटीच्या निवडणुकीत शहाजीबापू यांनी ८०० मतांनी निसटता विजय मिळवला. त्यानंतर गणपत आबांचे निधन झाले. मतदारसंघ हातातून जाणे, गणपतराव देशमुखांचे निधन यामुळे शेकाप काहीशी पिछाडीवर गेली आहे.

शेकापपुढे आव्हान

गणपतराव देशमुख यांच्यानंतर काहीशा पोरक्या झालेल्या या मतदारसंघात या वेळी त्यांचे दुसरे नातू बाबासाहेब देशमुख हे निवडणुकीची तयारी करीत आहेत. शेकापचा हा बालेकिल्ला अबाधित ठेवण्याचे आव्हान बाबासाहेबांसमोर आहे. जनसंपर्क आणि शेकापच्या पारंपरिक मतदारांचा पाठिंबा ही त्यांची जमेची बाजू आहे. मात्र शेकापकडून मागील निवडणूक लढवलेले डॉ. अनिकेत देशमुख यांनाही यंदाची निवडणूक लढवायची आहे. ते लोकसभेसाठी माढा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून इच्छुक होते. मात्र त्यांना थांबण्याची सूचना करण्यात आली. दरम्यानच्या काळात अनिकेत देशमुख हे भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्याही संपर्कात आलेले आहेत. गणपतराव देशमुख यांच्या स्मारकाच्या उद्घाटनास त्यांनी फडणवीस यांना सांगोल्यात आणले होते. यंदाच्या निवडणुकीत डॉ. अनिकेत काय भूमिका घेतात यावरही राजकारण अवलंबून असणार आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते दीपक साळुंखे हेही यंदा सांगोल्यातून इच्छुक आहेत. महायुतीच्या जागावाटपात हा मतदारसंघ शिवसेनेकडे जाणार हे निश्चित असताना साळुंखे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

हेही वाचा :हरियाणामध्ये ‘आप’ला बळ; केजरीवाल यांच्या सुटकेमुळे नेते, कार्यकर्त्यांची भावना

दुष्काळ नियंत्रणाचा फायदा?

२०२२ मध्ये महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेत बंड झाले. यामध्ये सांगोल्याचे आमदार शहाजीबापू अग्रस्थानी होते. त्यांचे ‘काय झाडी… काय डोंगार…’ हे माणदेशी शैलीतील वाक्य त्यावेळी राज्यभर गाजले. सत्ता मिळाल्यानंतर शहाजीबापू यांनी मतदारसंघात मोठ्या प्रमाणात निधी आणला. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मदतीने सांगोल्यातील पाणीप्रश्न मार्गी लावला. सांगोला हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जात होता. मात्र, आता परिस्थिती बदलत आहे. सांगोल्याच्या दुष्काळी गावांना भाजप सरकारने पाणी दिले. उपसा सिंचन योजना सुरू केल्या. पाणी आल्याने शेतीचे चित्रही बदलले आहे. त्याचा फायदा शहाजीबापूंना मिळू शकतो.