Rini Ann George harassment allegations against congress mla युवक काँग्रेसच्या केरळ युनिटचे अध्यक्ष राहुल मम्कुट्टाथील यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मल्याळम अभिनेत्री रिनी ॲन जॉर्जने केलेल्या छळाच्या आरोपांनंतर त्यांनी आपल्या निर्णयाची घोषणा केली. राहुल मम्कुट्टाथील म्हणाले की, त्यांनी काहीही चुकीचे केले नाही, त्यांनी जॉर्जला ‘मैत्रीण’ असेही संबोधले आणि आपल्या विरोधात कोणतीही तक्रार असल्यास कायदेशीर मार्ग अवलंबू असे म्हणाले. काँग्रेसप्रमुखावर अभिनेत्रीने काय आरोप केले? त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय का घेतला? भाजपाने काँग्रेस नेत्यावर नक्की काय आरोप केले? त्याविषयी जाणून घेऊयात.

काँग्रेस नेत्यांनी नक्की काय म्हटले?

  • ते म्हणाले, “माझ्यावर कोणतीही कायदेशीर तक्रार आहे का? ज्या महिलेने हे विधान केले आहे, तिने माझे नाव घेतलेले नाही. ती माझी मैत्रीण आहे. राज्यातील कोणत्याही पोलिस ठाण्यात माझ्या विरोधात कोणतीही तक्रार आहे का? पक्ष कार्यकर्त्यांनी माझा बचाव करण्याची गरज नाही. त्यामुळेच मी राज्य युवक काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे. पक्षाने मला राजीनामा देण्यास सांगितले नाही,” असेही ते म्हणाले.
  • अभिनेत्री रिनी ॲन जॉर्जने मम्कुट्टाथील यांचे नाव घेतले नाही, परंतु भाजपाने आरोप केला की, अभिनेत्री पालक्काडच्या आमदाराविषयीच बोलत आहे.
  • जॉर्जने त्यांच्यावर अनेकवेळा आक्षेपार्ह संदेश पाठवल्याचा आणि तिला त्यांच्या हॉटेल रूममध्ये बोलावल्याचा आरोप केला.
  • त्यानंतर भाजपाने काँग्रेसचे पालक्काडचे आमदार राहुल मम्कुट्टाथील यांच्या कार्यालयावर निषेध मोर्चा काढून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

कोण आहेत राहुल मम्कुट्टाथील?

राहुल मम्कुट्टाथील यांना राहुल बीआर म्हणूनही ओळखले जाते. ते केरळमधील काँग्रेस पक्षाच्या तरुण चेहऱ्यांपैकी एक आहेत. त्यांनी दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून इतिहास आणि इंग्रजी साहित्यात पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी विद्यार्थी राजकारणातून राज्याच्या राजकारणात प्रवेश केला. छळाच्या गंभीर आरोपांनंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

लेखिकेचाही काँग्रेस नेत्यावर आरोप

अभिनेत्री जॉर्जच्या आरोपानंतर लेखिका हनी भास्करन यांनी मम्कुट्टाथील यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून तिला संदेश पाठवल्याचा आरोप केला. मम्कुट्टाथील यांनी तिच्या इन्स्टाग्रामवरील एका फोटोवर प्रतिक्रिया दिली, त्यानंतर त्यांच्यामध्ये संवाद सुरू झाला. भास्करन यांनी आरोप केला की, आमदार आपल्या समवयस्क महिलांबरोबर नेहमीच अश्लील पद्धतीने संवाद साधतात. भास्करन यांनी मल्याळम वृत्तपत्र ‘मनोरमा’ला सांगितले, “मी त्यांच्या अनेक पीडितांना ओळखते आणि आणखी महिला तक्रारी घेऊन पुढे येतील. तो प्रत्येक महिलेला सांगतो की तिच्यावरच त्याचे प्रेम आहे,” असे त्या म्हणाल्या.

युवक काँग्रेसच्या अध्यक्षांनी सर्वात आधी ९ जून रोजी इन्स्टाग्रामवर त्यांच्याशी संपर्क साधला होता. त्यावेळी त्या श्रीलंकेत होत्या. काँग्रेस अध्यक्षांनी त्यांच्या एका फोटोवर ‘हार्ट’ इमोजीसह प्रतिक्रिया दिली आणि तिच्या प्रवासाबद्दल विचारपूस करण्यास सुरुवात केली. त्यांनी निलंबूर निवडणुकीबद्दलही विनोद केले. सुरुवातीला भास्करन यांनी सहजपणे उत्तर दिले, परंतु नंतर त्यांच्या संभाषणाचा विषय बदलला. त्यानंतर भास्करन यांनी पुढे उत्तर न देण्याचा निर्णय घेतला आणि संभाषण संपले असे त्या सांगतात. “तुम्ही मला कोणत्या कारणाने संदेश पाठवला होता, त्यामागील वाईट सत्य मला समजले,” असे त्या म्हणाल्या.

त्या सांगतात की, त्यांना इतरांकडून समजले की राहुल यांनी एका पार्टीत त्या संभाषणाबद्दल बढाई मारली आणि कथा अशा प्रकारे वळवली जणू भास्करन यांनीच त्यांच्याशी संपर्क साधला होता. त्यांनी आपल्या राजकीय वर्तुळात हा खोटा दावा पसरवला. भास्करन यांनी सांगितले की, इतर महिलांनीही अशाच छळाबद्दल सांगितले. त्या म्हणाल्या, “महिलांना तुमची ही बाजू माहीत असणे आवश्यक आहे. तुम्ही महिलांशी गप्पा मारता आणि नंतर त्या संभाषणांना अश्लील गप्पांमध्ये बदलून त्यांची चेष्टा आणि अपमान करता,” असाही आरोप भास्करन यांनी केला. “मला तुमच्या स्वतःच्या पक्षातील महिलांची भीती वाटते, ज्यांनी तुमच्याशी संवाद साधला आहे. त्यांनी तुमच्याकडून किती अश्लीलता सहन केली असेल? ज्या महिलांनी तुमच्याबरोबर कोणतीही खाजगी गोष्ट शेअर केली आहे, त्या आता शांत भीतीने जगत असाव्यात,” असेही त्या म्हणाल्या.

लेखिकेचा वरिष्ठ काँग्रेस नेत्यांवरही आरोप

लेखिकेने पुढे आरोप केला की, शफी परंबिलसारख्या वरिष्ठ नेत्यांनाही अशा वर्तणुकीची माहिती होती, परंतु त्यांनी तक्रारींकडे दुर्लक्ष केले. भास्करन यांच्या मते, राहुल यांच्यासारखे पुरुष महिलांच्या विश्वासाचा गैरवापर करतात, खाजगी चर्चांना अश्लील गप्पांमध्ये बदलतात आणि खोट्या गोष्टी पसरवतात, ज्यामुळे मानसिक त्रास होतो. भास्करन यांनी ही कृत्ये छळापेक्षा अधिक धोकादायक असल्याचे म्हटले.

काँग्रेस आरोपांची चौकशी करणार

विरोधी पक्षनेते व्ही. डी. सतीशन म्हणाले की, काँग्रेस पक्ष आरोपांची चौकशी केल्यानंतर कारवाई करेल. त्यांनी सांगितले, “पक्ष आरोपांची चौकशी करेल, आम्ही आरोपांची गंभीरता तपासू, जर ते खूप गंभीर असतील तर आम्ही आवश्यक कारवाई करू, ही एक प्रक्रिया आहे. त्यांनाही आपली बाजू मांडण्याची संधी मिळेल. त्यानंतरच आम्ही निर्णय घेऊ. आम्ही त्वरित निर्णय घेऊ आणि यात कोणताही विलंब होणार नाही. पक्षासमोर कोणतीही तक्रार नाही. जर कोणी काही आरोप करत असेल, तर आम्ही त्याची चौकशी करू. आम्ही ते खूप गांभीर्याने घेऊ, कोणतीही दया दाखवली जाणार नाही,” असे काँग्रेस नेते म्हणाले.