सत्ताधारी पक्षात आणि तोही भाजपमध्ये जाहीर प्रवेश मोठ्या दिमाखात आणि तोऱ्यातच व्हायला हवा, म्हणून भव्य शामियाना उभारला. पक्ष प्रवेशासाठी प्रदेश पातळीवरील दिग्गज मंडळी येणार म्हणजे केवळ मंडप उभारून ऐनवेळी पाऊस आला तर नेत्यांबरोबर कार्यकर्त्यांचीही आबदा व्हायला नको म्हणून शामियाना उभा करत असताना दक्षताही घेतली गेली. कार्यक्रमासाठी स्थानिक नेत्यांच्या आग्रहाखातर चोख व्यवस्था करण्यात आली. खर्चही हातचा न राखता करण्यात आला. हा खर्च महापालिका निवडणुकीसाठी मशागत, पेरणीसाठी होता याचे दु:ख करण्याचे कारण नाही, मात्र पक्ष प्रवेशाचा जाहीर कार्यक्रम असताना ‘कार्यकर्त्यांचा मेळावा’ अशा जाहिराती दिल्या गेल्या. म्हणजे चाट एकाला, मिरवतोय मात्र दुसराच याचीच वेदना ‘सांगताही येत नाही, अन् सहनही होत नाही’…
मंत्र्यांचीच फसवणूक ?
भीमा-कृष्णा स्थिरीकरण प्रकल्पात कृष्णा नदीचे पाणी अद्यापही भीमा नदीत पोहोचले नसताना ते गृहीत धरून कृष्णा-मराठवाडा उपसा सिंचन योजना साकारली आहे. उजनी धरणातून भीमा नदीच्या येणाऱ्या पाण्याचा उपयोग करून ही कृष्णा-मराठवाडा उपसा सिंचन योजना टप्पा क्र. २ ची पंपगृह पाहणी करण्यासाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे आले होते. या योजनेचे पंपगृह उत्तर सोलापूर तालुक्यातील नेमक्या कोणत्या गावात आहे, याचा जलसंपदा विभागाला विसर पडला असावा. हे पंपगृह गावडी दारफळ येथे असताना प्रत्यक्षात विखे-पाटील यांचा दौरा पडसाळी गावात आयोजित करण्यात आला. ही मंत्र्यांची फसवणूकच. मंत्र्यांच्या दौऱ्यात झालेली झालेली चूक कोणाची हे मात्र गुलदस्त्यातच आहे.
गैरसोय… तरीही श्रेयवादाची लढाई
नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या ‘वन्दे भारत एक्स्प्रेस’ला अहिल्यानगर रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. परंतु यावरून विद्यामान खासदार नीलेश लंके व माजी खासदार डॉ. सुजय विखे यांच्यामध्ये हा श्रेयवाद रंगला आहे. नगरहून पुण्याला जाण्यासाठी किंवा पुण्याहून नगरला येण्यासाठी या ‘वन्दे भारत’चे वेळापत्रक नगरकरांच्या दृष्टीने गैरसोयीचे आहे, याकडे सामाजिक संस्था, संघटना लक्ष वेधत आहेत. परंतु त्याकडे आजी-माजी खासदारांचे दुर्लक्ष. नगर-पुणे रस्तेमार्गे प्रवासासाठी पूर्वी अडीच-तीन तासांचा कालावधी लागत होता, हा प्रवास आता वाहतूक कोंडीमुळे साडेचार-पाच तासांवर गेला आहे. यावर मात करण्यासाठी नगर-पुणे इंटरसिटी रेल्वे सुरू करण्याची नगरकरांची जुनीच मागणी आहे. ही मागणी पूर्ण झाली नाही. त्यातच वन्दे भारत रेल्वे पहिल्याच दिवशी, रविवारी रात्री नगर स्थानकावर अर्धा तास उशिरा आली. या वेळी खासदार लंके यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी करीत श्रेय अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला.
(संकलन : एजाज हुसेन मुजावर, मोहनीराज लहाडे, दिगंबर शिंदे)