दिल्लीचे उपमुख्यमंत्री तथा आम आदमी पार्टीचे (आप) नेते मनिष सिसोदिया यांना सीबीआयने अटक केली आहे. दिल्लीमधील कथित उत्पादन शुल्क घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. मागील अनेक महिन्यांपासून सीबीआयकडून सिसोदिया यांची वेळोवेळी चौकशी करण्यात येत होती. मात्र आता त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, सीबीआयच्या या कारवाईनंतर विरोधी पक्षांनी आक्रमक पवित्रा धारण केला आहे. तृणमूल काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल, भारत राष्ट्र समितीने या अटेकचा निषेध केला आहे. विशेष म्हणजे संपूर्ण भारतात सध्या चर्चा होत असलेल्या या विषयावर काँग्रेसमधील हायकमांडने मात्र अद्याप आपली भूमिका जाहीर केलेली नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> ‘उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत,’ देवेंद्र फडणवीसांच्या विधानाचा अर्थ काय? पुन्हा युती होणार?

दिल्ली काँग्रेसकडून कारवाईचे स्वागत

आप पक्षाचे नेते तथा मंत्री सत्येंद्र जैन यांनाही याआधी आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. सिसोदिया हे तुरुंगात जाणारे आप पक्षाचे दुसरे नेते आहेत. दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष अनिल चौधरी यांनी या अटकेचे स्वागत केले आहे. “काँग्रेसचे नेते तसेच कार्यकर्ते जे आरोप करत होते, त्या आरोपांत सत्यता असल्याचे सिसोदिया यांच्या अटकेनंतर सिद्ध झालेले आहे. संपूर्ण देश जेव्हा करोना महासाथीच्या संकटात होता, तेव्हा मनिष सिसोदिया मुख्यंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासोबत मद्य वितरण धोरणाचा मसुदा तयार करण्यात व्यस्त होते. भाजपाचे नेतेदेखील त्यांच्यासोबत होते. सिसोदिया यांच्या अटकेनंतर देशात अजूनही कायदा जिवंत असल्याचे सिद्ध झाले आहे. या प्रकरणाचा प्रामाणिकपणे तपास झाला, तर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हेदेखील तुरुंगात असतील,” अशी प्रतिक्रिया चौधरी यांनी दिली. दिल्ली काँग्रेसचे नेते संदीप दीक्षित यांनीही या कारवाईचे स्वागत केले आहे.

हेही वाचा >>> अरविंद केजरीवाल यांचे साथीदार, दिल्ली सरकारमध्ये सांभाळली अनेक महत्त्वाची खाती; अटक झालेले मनिष सिसोदिया कोण आहेत?

काँग्रेसच्या अभिषेक मनू सिंघवींकडून निषेध

चौधरी यांनी सिसोदिया यांच्यावरील कारवाईचे स्वागत केले असले तरी काँग्रेसच्या कार्यकारी समितीचे सदस्य असलेल्या अभिषेक मनू सिंघी यांनी सिसोदिया यांची बाजू घेतली आहे. “मनिष सिसोदिया तुमच्या पाठीशी देव असो. सत्तेचा सरळसरळ दुरुपयोग केला जात आहे. एवढ्या उशिराने या प्रकरणात का अटक करण्यात आली?” असा सवाल सिंघवी यांनी उपस्थित केला.

…तर सिसोदियांना अटक झाली नसती

आरजेडीचे खासदार मनोज झा यांनी सिसोदिया यांची बाजू घेतली आहे. सिसोदिया यांच्यावरील कारवाईनंतर मला धक्का बसला. मात्र मला याचे आश्चर्य वाटलेले नाही. कारण माझ्या पक्षातील नेत्यांवरही अशीच कारवाई करण्यात आली होती, अशी प्रतिक्रिया मनोज झा यांनी दिली. तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन यांनीही भाजपावर टीका केली. “मनिष सिसोदिया यांनी भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असता, तर त्यांच्यावर कारवाई झाली नसती,” असे ओब्रायन म्हणाले आहेत.

हेही वाचा >>> विश्लेषण : मनिष सिसोदियांच्या अटकेचा ‘आप’वर काय परिणाम होणार? जाणून घ्या सविस्तर

…म्हणजेच भाजपाने पराभव मान्य केला आहे- अखिलेश यादव

समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीदेखील भाजपावर टीका केली आहे. मनिष सिसोदियांची अटक हेच दर्शवते की भाजपाने २०२४ साली आपला पराभव मान्य केलेला आहे, असे अखिलेश यादव म्हणाले आहेत. दरम्यान, सिसोदिया यांच्या अटकेनंतर आप पक्षाने आक्रमक पवित्रा धारण केला आहे. सिसोदिया यांच्या कुटुंबीयांची आम्ही काळजी घेऊ, अशी प्रतिक्रिया अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manish sisodia arrest opposition party criticizes bjp but congress high command remain silent prd