Mp arrested in liquor scam आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या कार्यकाळात झालेल्या कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाई अंतर्गत खासदार खासदार पी.व्ही. मिधुन रेड्डी यांना अटक करण्यात आली आहे. मिधुन रेड्डी वायएसआर आंध्र प्रदेशचे माजी मंत्री आणि पक्षाचे वरिष्ठ नेते पेद्दीरेड्डी रामचंद्र रेड्डी यांचे पुत्र आहेत. ते माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांचेदेखील विश्वासू मानले जातात. कोण आहेत मिथुन रेड्डी? जाणून घेऊयात.

मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी अटक

विशेष तपास पथकाने (एसआयटी) शनिवारी कथित आंध्र प्रदेश मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी कारवाई करत मिधुन यांना अटक केली आहे. मिधुन हे राजमपेट येथील तीनवेळा खासदार आहेत आणि पक्षातील प्रमुख नेते आहेत. त्यामुळे, सोमवारपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात वायएसआरसीपीला त्यांच्या अनुपस्थितीची उणीव भासण्याची शक्यता आहे. पक्षातील सूत्रांनी सांगितले की, मिधुन राजकीय सूडबुद्धीच्या या खेळाला तोंड देऊ शकतील, कारण ते मजबूत राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील आहेत. “ते केवळ पक्षातील एक प्रमुख नेते आणि पेद्दीरेड्डी यांचा मुलगा असल्याने त्यांना अटक करण्यात आली,” असे सूत्रांनी सांगितले.

मिधुन यांना जनतेचे नेते असे संबोधत अन्य एका सूत्राने सांगितले की, मिधुन रेड्डी अनेकदा जगन मोहन रेड्डी यांच्याबरोबर असतात. “त्यांच्या लोकप्रियतेमुळे केवळ तेलुगू देसम पक्षालाच (टीडीपी) नाही तर भाजपालाही त्रास झाला आहे,” असेही सूत्राने म्हटले. गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत वायएसआरसीपीचा पराभव झाला. पक्षाला आंध्र प्रदेशातील २५ पैकी केवळ चार जागा जिंकता आल्या. त्यावेळी पक्षातील प्रमुख नेते व्ही. विजयसाई रेड्डी यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला. त्यांच्यानंतर मिधुन दिल्लीत पक्षाचा आवाज म्हणून उदयास आले.

पक्षाच्या एका सदस्याने सांगितले, “विजयसाई रेड्डी बाहेर पडल्यानंतर मिधुन तरुण कार्यकर्त्यांसाठी आधारस्तंभ ठरले. ते दिल्लीत पक्षाचा चेहरादेखील होते. त्यांचे वडील टीडीपीच्या सर्वात मोठ्या टीकाकारांपैकी एक आहेत. मिधुन यांना अटक करून जगन मोहन रेड्डी यांच्या जवळच्या सहकाऱ्यांना सोडले जाणार नाही, असा संदेश टीडीपी देऊ इच्छित आहे,” असे पक्षाच्या एका सदस्याने सांगितले.

कोण आहेत मिधुन रेड्डी?

  • मेकॅनिकल इंजिनिअर असलेले मिधुन यांनी आंतरराष्ट्रीय व्यवसायात एमबीए पूर्ण केले.
  • त्यांनी २०१४ मध्ये राजकारणात प्रवेश केला. त्यापूर्वी त्यांनी हैदराबादमधील एका खासगी कंपनीत काम केले.
  • राजकारणात प्रवेश केल्यानंतर त्याचवर्षी त्यांनी पहिल्यांदा राजमपेटची जागा जिंकली. तेव्हापासून ते या जागेवरून निवडणूक आले आहेत.
  • २०१४ मध्ये, मिधुनने आंध्र भाजपाचे माजी प्रमुख दग्गुबती पुरंदेश्वरी यांचा १ लाखाहून अधिक मतांनी पराभव केला.
  • त्यांनतरच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी टीडीपीच्या डी.के. सत्यप्रभा यांचा पराभव केला.
  • गेल्या वर्षी, त्यांनी आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन. किरण कुमार रेड्डी यांच्या विरोधात यशस्वीपणे निवडणूक लढवली आणि ७६,००० हून अधिक मतांनी त्यांचा पराभव केला.

मिधुन रेड्डी यांच्यावरील आरोप काय?

एसआयटीनुसार, काही स्थानिक मद्य ब्रँड्सना फायदा देण्यासाठी कथित मद्य धोरण तयार केले गेले होते, ज्यात लोकप्रिय मद्य ब्रँड्सच्या जागी कमी ज्ञात ब्रँड्स आणले गेले आणि त्या बदल्यात ३,२०० कोटी रुपयांची लाच घेण्यात आली. अटक नोटिसीनुसार, “मिधुन हे घोटाळ्याचे सुरुवातीपासून मुख्य सूत्रधार (core conspirator) आहेत. त्यांनी धोरणात्मक बदल घडवून आणले आणि डिस्टिलरीज आणि पुरवठादारांकडून लाच मिळवण्यासाठी सह-आरोपींशी समन्वय साधला,” असा आरोप त्यांच्यावर आहे.

२०१५ मध्ये आपल्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीला मिधुन तिरुपती विमानतळावर एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला कथितपणे मारहाण केल्याच्या वादामुळे चर्चेत आले होते. या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या टाकेनंतर टीडीपीने राजकीय सूडबुद्धी असल्याच्या आरोपांना फेटाळून लावले आहे. टीडीपीने दावा केला की, मिधुन यांचा घोटाळ्यात सहभाग सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे आहेत.

“बेकायदा मार्गाने मिळवलेला पैसा वायएसआरसीपीच्या २०२४ च्या विधानसभा निवडणूक प्रचारासाठी वापरला गेला,” असे एका सूत्राने सांगितले. मात्र, वायएसआरसीपीच्या नेत्यांनी सांगितले की, मिधुन हे केंद्र सरकारच्या अनेक भाजपा नेत्यांशी टीडीपीच्या स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांची तक्रार करत होते. ते भाजपाच्या संपर्कात येऊ नये, अशी टीडीपीची इच्छा होती, त्यामुळेच ही अटक करण्यात आल्याचे वायएसआरसीपीच्या नेत्यांनी म्हटले.