नागपूर : आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने भाजपने नागपुरात कंबर कसली आहे. कुठल्याही परिस्थितीत जिल्हा परिषदेवर पक्षाचा झेडा फडकावयाचाच या जिद्दीने पक्ष नेतृत्वाचे प्रयत्न सुरू आहेत. यात अडथळा ठरू शकणाऱ्या विरोधी पक्षातील प्रभावी नेत्यांना हेरून त्यांना एक तर भाजपमध्ये तरी आणायचे किंवा ते शक्य नसेल तर त्याच्या राजकारणातील बलस्थानांवर सत्तेच्या माध्यमातून नियंत्रण ठेवायचे. नागपूर जिल्ह्यात काँग्रेस नेते व माजी मंत्री सुनील केदार यांच्याबाबतीत हेच धोरण भाजपने अवलंबीले आहे. पहिले जिल्हा बँक आणि आता कळमणा बाजारसमितीवर सरकारी नियंत्रणाचे प्रयत्न केले जात आहे. दोन दिवसांपूर्वी विधानसभेत या मुद्यावर झालेली मांडणी याच धोरणाचा एक भाग मानला जातो.

नागपूर जिल्हा परिषदेवर काँग्रेसची सत्ता होती. ही सत्ता भाजपच्या हातून काँग्रेसने खेचून आणली होती व त्यासाठी सर्वाधिक प्रयत्न पक्षाचे नेते सुनील केदार यांचे होते. ग्रामीण भागात केदार यांचा असलेला दबदबा म्हणूनच भाजपला खटकतो. त्यामुळेच केदार यांना राजकीयदृष्या संपवण्याचे प्रयत्न भाजपचे प्रयत्न राहिले. जिल्हा परिषद निवडणुका जवळ आल्याने त्याला अधिक गती आली आहे. विधानसभा निवडणुकीत सावनेरमध्ये केदार यांच्या पत्नी पराभूत झाल्या. तेथे त्यांचे पारंपारिक कट्टर राजकीय विरोधक आशीष देशमुख विजयी झाले. त्यांनी सर्व प्रथम जिल्हा बँकेवर प्रशासकाची नियुक्ती केली. एखाद्या प्रशासकाने पदभार स्वीकारावा ही प्रशासकीय बाब. पण जिल्ह्या बँकेच्या प्रशासकाने सुत्रे स्वीकारली त्यावेळी खुद्द राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित होते. कारण या बँकेवर केदारांचे वर्चस्व होते. त्यानंतर आता पावसाळी अधिवेशनात केदार यांचेच वर्चस्व असलेल्या कळमणा बाजार समितीचा मुद्या भाजपच्या तीन आमदारांनी विधानसभेत मांडला. गैरव्यवहाराचे आरोप करण्यात आले. ही समिती राष्ट्रीय घोषित करण्याची मागणी करण्यात आली. या मागणी मागचा उद्देश केदारांची शक्ती कमी करणे हाच असल्याचे आमदारांच्या भाषणातून ध्वनित होत होते.दोनच दिवसांपूर्वी भाजप नेते व पालकमंत्री चंद्रसेखर बावनकुळे यांनी सावनेर तालुक्यातील एका पदाधिकाऱ्याच्या (पूर्वाश्रमीचा कट्टर केदार समर्थक) वाढदिवस समारंभाला भेट दिली. या कार्यक्रमातही बावकुळे यांनी विरोधकांना दम दिला. “ राज्यात आपलेच सरकार आहे, गृहखातेही आपल्याकडेच आहे, कोणीही धमकावले तर तक्रार करा ,धमकावणाऱ्यांना त्याची जागा दाखवली जाईल’ असे बावनकुळे म्हणाले, त्यांचा रोख हा केदार यांच्याचकडे होता. यावरून पुढच्या काळात भाजप केदारांना अधिकाधिक लक्ष्य करण्याचा प्रयत्न करणार हे स्पष्ट होते.

राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर जिल्ह्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपसाठी प्रतिष्ठेच्या ठरणाऱ्या आहेत. जिल्ह्यात सहापैकी एकाच ठिकाणी काँग्रेसचा आमदार आहे, चार ठिकाणी भाजप व एका ठिकाणी शिवसेनेचा आमदार आहे. राज्याच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र पडणवीस यांच्यासह तीन मंत्री आहेत. जोडीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आहेत. ऐवढी सर्व भक्कम बाजू असतानाही भाजप सावध भूमिकेत आहे. जनता दरबार, सरकारी योजनांच्या माध्यमातून थेट लोकांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन भाजपने यापूर्वीच केले असून त्याची अंमलबजावणी केली जात आहे. ही पार्श्वभूमी लक्षात घेता भाजपला अनुकूल स्थिती असताना या पक्षाचे नेते विरोधी पक्षातील नेत्यांची धास्ती बाळगून आहेत. हेच केदार यांच्या विरोधात सुरू असलेल्या एकूणच हालचालींवरून स्पष्ट होते.