एजाजहुसेन मुजावर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यात शिवसेनेत बंडाळी होऊन उद्धव ठाकरे यांचे महाविकास आघाडी सरकार कोसळल्यांनतर मुख्यमंत्री झालेले सेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष संघटना स्वतःच्या वर्चस्वाखाली आणण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. यातूनच मुख्यमंत्री शिंदे यांच्या पंढरीतील विठ्ठलाच्या महापूजेच्या दौऱ्यावेळीच शिवसेनेच्या बंडखोर गटाकडून एका मोठ्या मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यास सोलापूरसह परिसरातील अन्य जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, शिवसैनिकांची मोठी गर्दी जमवण्याचे नियोजन आहे.शिवसेनेतील बंडखोरीत एकनाथ शिंदे यांच्यासोबत सोलापूर जिल्ह्यातील एकमेव सांगोल्याचे आमदार ॲड. शहाजीबापू पाटील गेले आहेत. याशिवाय जिल्ह्याचे संपर्क प्रमुख राहिलेले शेजारच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम-परांड्याचे आमदार तानाजी सावंत हे शिंदे यांच्यासोबत आहेत. त्यांचा अपवाद वगळता जिल्ह्यातील शिवसेना भक्कम असल्याचा दावा सेनेच्या स्थानिक प्रमुख पदाधिकारी करीत असतानाच करमाळ्याचे सेनेचे माजी आमदार नारायण पाटील हे त्यांचे राजकीय गुरू माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील व आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या माध्यमातून भाजपच्या वाटेवर आहेत. तर सेनेचे माजी जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, आमदार तानाजी सावंत यांचे बंधू असलेले सेनेचे माजी जिल्हा समन्वयक प्रा. शिवाजी सावंत, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे, माढ्याचे संजय कोकाटे, माजी उपजिल्हाप्रमुख करमाळ्याचे महेश चिवटे आदी मंडळी एकनाथ शिंदे यांच्या गटात गेली आहेत.

मंत्रिपदासाठी आता पायी दिंडी आणि महाआरत्याही, मराठवाड्यात शक्तीप्रदर्शनानंतर नवा कल

जिल्ह्यातील उर्वरित शिवसेना पक्ष संघटना उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी कायम राहिल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्याकडे लक्ष देण्यास सुरुवात केल्याचे सांगितले जाते. त्याच अनुषंगाने पंढरपुरात आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठलाची शासकीय महापूजेसाठी येणाऱ्या मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा जंगी मेळाव्याचा घाट घालण्यात आला आहे. या मेळाव्यास सोलापूरसह परिसरातील अन्य जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, शिवसैनिकांची मोठी गर्दी जमवण्याचे नियोजन आहे.

या मेळाव्याच्या माध्यमातून एकनाथ शिंदेप्रणीत शिवसेनेचे जोरदार शक्तिप्रदर्शन घडविण्यासाठी जय्यत तयारी केली जात आहे. त्यासाठी सांगोल्याचे आमदार ॲड. शहाजीबापू पाटील यांचा पुढाकार महत्त्वाचा मानला जात आहे. पंढरपुरात आषाढी वारीसाठी लाखो वारकरी दाखल होत असताना तेथे सर्व छोट्या- मोठ्या रस्त्यांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागताचे फलक झळकावण्यात आले आहेत. या फलकांवर आमदार ॲड. शहाजीबापू पाटील यांची छबीसुध्दा लक्ष वेधून घेत आहे. पंढरपुरात होणाऱ्या या मेळाव्याच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना पक्ष संघटना उद्धव ठाकरे यांच्यापासून तोडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जोडण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्याचे सांगण्यात येते. त्याचा विचार करता पंढरपुरात होणाऱ्या मेळाव्यासह त्या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणाकडेही सर्वांचे लक्ष राहणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: On the occasion of ashadhi ekadashi eknath shinde will address political gathering at pandharpur print politics news pkd