India prime minister retirement age पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) काल (बुधवार) अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केले. २०२४ पासून पंतप्रधान ७५ वर्षे पूर्ण केल्यानंतर निवृत्त होतील, अशी चर्चा सुरू होती. विरोधकही वारंवार या निवृत्तीसंदर्भात बोलले आहेत. यादरम्यान भाजपामधील एका अघोषित नियमाची चर्चा नेहमी होते. ७५ वर्ष पूर्ण करणाऱ्या नेत्यांना बाजूला सारून नव्या नेतृत्वाला संधी, असा भाजपात नियम असल्याचे मानले जाते. पंतप्रधांनांच्या निवृत्तीच्या वयाबाबत भारतात अनेक मतमतांतर पहायला मिळाले आहेत. परंतु, भारतात पंतप्रधानांच्या निवृत्तीचे वय नाही. त्यामागील कारण काय? त्यांच्या वयाचा कामकाजावर परिणाम होऊ शकतो का? याविषयी सविस्तर जाणून घेऊयात…
भारतात पंतप्रधानांच्या निवृत्तीचे वय
भारतात पंतप्रधानांसाठी निवृत्तीचे वय नाही. याचे कारण त्यांचे पद वयाच्या मर्यादेवर नाही, तर निवडणुकांवर अवलंबून असते. ६० व्या वर्षी निवृत्त होणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे किंवा ६५ व्या वर्षी निवृत्त होणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांप्रमाणे पंतप्रधानांना नियम लागू होत नाही. पंतप्रधान आपल्या पदावर तोपर्यंत कार्यरत राहू शकतात, जोपर्यंत त्यांच्यावर संसदेचा विश्वास असतो. काही लोकांचे असे म्हणणे आहे की, नवीन नेतृत्वाला संधी देण्यासाठी निवृत्तीचे वय असावे, तर काहींच्या मते हे पद भूषवण्यासाठी अनुभव जास्त महत्त्वाचा आहे.
पंतप्रधानांचे पद हे प्रशासकीय किंवा न्यायिक नसून राजकीय पद आहे. भारतीय संविधानानुसार, पंतप्रधानांचा कार्यकाळ निवडणुकीतील जनतेच्या मतांवर आणि संसदेच्या विश्वासावर ठरतो, कोणत्याही निश्चित वयाच्या मर्यादेवर नाही. याचा अर्थ, जोपर्यंत एखादी व्यक्ती निवडून येत राहते, तोपर्यंत ती व्यक्ती पंतप्रधान म्हणून कार्यरत असू शकते. मूलभूत पात्रता पूर्ण करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला पद धारण करण्यापासून वयाची मर्यादा रोखत नाही.
पंतप्रधान होण्यासाठी पात्रता अन् निकष काय?
पंतप्रधानांसाठी निवृत्तीचे वय नसले तरी काही विशिष्ट पात्रता अन् निकष आहेत. भारतीय संविधानाच्या कलम ८४ नुसार, व्यक्तीला खासदार (MP) होण्यासाठी काही अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, कलम ७५ मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्र्यांसाठी पात्रता नमूद केलेली आहे. पंतप्रधान हे ‘Primus inter pares’ मानले जातात, त्यामुळे त्यांनी खालील निकष पूर्ण करणे आवश्यक आहे:
- ते भारताचे नागरिक असावेत.
- ते लोकसभा किंवा राज्यसभा यापैकी कोणत्याही एका सभागृहाचे सदस्य असावेत.
- नियुक्तीच्या वेळी सदस्य नसतील, तर त्यांना सहा महिन्यांच्या आत कोणत्याही एका सभागृहात निवडून यावे लागते.
- ते लोकसभेचे सदस्य असल्यास त्यांचे वय किमान २५ वर्षे असावे. ते राज्यसभेचे सदस्य असल्यास त्यांचे वय किमान ३० वर्षे असावे.
- त्यांनी भारत सरकार, राज्य सरकार किंवा सरकारच्या नियंत्रणाखालील कोणत्याही स्थानिक प्राधिकरणाच्या अंतर्गत कोणतेही पद (Office of profit) धारण केलेले नसावे.
- जर एखादी व्यक्ती खासगी किंवा सरकारी कंपनीत काम करत असेल आणि त्यांची पंतप्रधानपदी नियुक्ती झाली असेल, तर त्यांना पदभार स्वीकारण्यापूर्वी आपल्या पूर्वपदाचा राजीनामा द्यावा लागतो.
- यामुळे हे सुनिश्चित होते की, पंतप्रधान देशाचे नेतृत्व करण्यासाठी आवश्यक कायदेशीर आणि नैतिक निकष पूर्ण करतात.
वयाचा पंतप्रधानांच्या कारभारावर परिणाम होऊ शकतो?
जरी वयाची मर्यादा नसली तरी काही समीक्षकांचे म्हणणे आहे की, जास्त वयामुळे नेत्यांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते किंवा ते बदलत्या राजकीय परिस्थितीशी जुळवून घेऊ शकत नाहीत. मात्र, इतिहासाने हे दाखवून दिले आहे की जगातील काही सर्वात यशस्वी नेत्यांनी त्यांच्या ७० आणि ८० च्या दशकातही उत्तम कामगिरी केली आहे. यातून हे सिद्ध होते की, अनेकदा अनुभव वयापेक्षा जास्त महत्त्वाचा असतो.
उदाहरणार्थ:
- मोरारजी देसाई ८१ व्या वर्षी भारताचे पंतप्रधान झाले.
- नरेंद्र मोदी वयाच्या ६८ व्या वर्षी दुसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून निवडून आले आणि ७३ व्या वर्षी ते पुन्हा एकदा भारताचे पंतप्रधान म्हणून निवडून आले.
भारतात पंतप्रधानांसाठी निवृत्तीचे वय असावे का?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म १७ सप्टेंबर १९५० रोजी झाला असून ते सध्या ७५ वर्षांचे आहेत. त्यांच्या निवृत्तीचा विषय अजूनही वादाचा मुद्दा आहे. काहींचे म्हणणे आहे की, प्रभावी कामकाज सुनिश्चित करण्यासाठी आणि तरुण नेत्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ७५ किंवा ८० वर्षांची वयोमर्यादा निश्चित करावी; तर इतरांचे म्हणणे आहे की, जोपर्यंत एखादा नेता मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम आहे, तोपर्यंत त्यांचे वय अडथळा ठरू नये.
भारतात, पंतप्रधानांसाठी कोणतेही निश्चित निवृत्तीचे वय नाही आणि त्यांचा कार्यकाळ पूर्णपणे राजकीय पाठिंबा आणि निवडणुकीच्या निकालांवर आधारित असतो. वयाची मर्यादा घालण्याऐवजी, त्यांची क्षमता, दूरदृष्टी आणि नेतृत्व कौशल्ये यावर लक्ष केंद्रित करणे अधिक महत्त्वाचे आहे, असे अनेकांचे सांगणे आहे. भारताने पंतप्रधानांसाठी निवृत्तीचे वय निश्चित करावे की नाही, हा राजकारणातील एक वादाचा मुद्दा आहे.
पंतप्रधानांची निवृत्ती आणि वाद
स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी काही दिवसांपूर्वी नागपूरमधील एका कार्यक्रमात ७५ वर्ष आणि निवृत्तीवरून एक विधान केले होते. यावरून देशभर चर्चा झाली. यानंतर डॉ. भागवत यांनी मोदींना निवृत्त होण्याचे संकेत दिले अशीही चर्चा रंगली होती. पंचाहत्तरीची शाल अंगावर पडली की ती वेळ थांबायची असते, असे विधान त्यांनी केले होते. मात्र, काही दिवसांपूर्वी मोहन भागवत यांनी म्हटले की, मी कधीही असे म्हटले नव्हते की, मी निवृत्त होईन किंवा दुसऱ्या कुणी ७५ वर्षांचे झाल्यानंतर निवृत्त व्हावे. संघ जे सांगेल ते आम्ही करू. कोणतेही काम नाकारण्यासाठी आम्ही वयाचे कारण देऊ शकत नाही.