Prashant Kishor Electoral Strategy : राजकीय रणनीतीकार अशी ओळख असलेल्या प्रशांत किशोर यांनी काही महिन्यांपूर्वी जनसुराज्य पक्षाची स्थापना केली. आगामी बिहार विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षाचे उमेदवार उभे करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. रोजगार आणि स्थलांतर यांसारखे मुद्दे उचलून धरल्याने अत्यंत कमी कालावधीतच त्यांना बिहारमध्ये मोठी लोकप्रियता मिळत आहे. मात्र, त्यांच्या पक्षामुळे मुस्लिम मतांचे विभाजन होईल, असा दावा महाआघाडीकडून केला जात आहे. यादरम्यान प्रशांत किशोर यांनी बुधवारी एक मोठी घोषणा केली आहे. मुस्लीम उमेदवाराच्या विरोधात आमचा पक्ष मुस्लीम उमेदवार देणार नाही, असे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे.
बिहारमध्ये गेल्या चार दशकांपासून कधी राष्ट्रीय जनता दल तर कधी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सत्तेत आहे. यावर्षी मात्र राजकीय समीकरणात आमचा पक्ष मोठा प्रभाव टाकणार असल्याचा दावा प्रशांत किशोर यांच्याकडून केला जात आहे. बुधवारी प्रशांत किशोर यांनी गया जिल्ह्यातील बाराचट्टी विधानसभा मतदारसंघाचा दौरा केला. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय जनता दल पक्षासमोर एक अट ठेवली.
नेमके काय म्हणाले प्रशांत किशोर?
मुस्लीम मतांच्या विभाजनावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जनसुराज्य पक्षाचे प्रमुख म्हणाले, “राष्ट्रीय जनता दलाकडून ज्या जागांवर मुस्लीम उमेदवार दिले जातील तिथे आमचा पक्ष अल्पसंख्याकांना उमेदवारी देणार नाही. स्वत:ला मुस्लिमांचे नेते म्हणणाऱ्या तेजस्वी यादव यांना जर मतविभाजनाची इतकीच काळजी असेल, तर त्यांनीही आमच्या मुस्लीम उमेदवाराच्या विरोधात आपल्या पक्षाचा उमेदवार देऊ नये. भाजपाला जर खरोखरच हरवायचे असेल, तर आरजेडीनेही तशी तयारी दाखवायला हवी.”
आणखी वाचा : तिरुपती बालाजी मंदिराच्या दानपेटीतून कोट्यवधींची चोरी? तेलुगू देसम पार्टीचा आरोप; चौकशीसाठी SIT स्थापन
बिहारमध्ये किती मुस्लीम मतदार?
बिहारच्या लोकसंख्येत मुस्लिमांचे प्रमाण सुमारे १७% आहे. विशेषतः किशनगंज, अररिया, कटिहार व पूर्णिया येथे त्यांची मोठी संख्या आहे; तर दरभंगा, मधुबनी, रोहतास, नालंदा, पाटणा, मुंगेर व भागलपूरमध्येही या समुदायाची लक्षणीय संख्या आहे. दुसरीकडे राज्यात इतर मागासवर्गीय समुदायाची लोकसंख्या ३६ टक्के असून, त्यामध्ये १०.५ टक्के मुस्लिमांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वी प्रशांत किशोर यांनी आगामी निवडणुकीत मुस्लीम आणि इतर मागासवर्गीय (EBC) उमेदवारांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात उमेदवारी दिली जाईल, असे जाहीर केले होते. जवळपास ४० मुस्लीम उमेदवारांना आम्ही निवडणुकीच्या रिंगणात उभे करू, असेही ते म्हणाले होते.
प्रशांत किशोर यांनी कोणते मुद्दे मांडले?
प्रशांत किशोर यांनी बिहारमधील रोजगार आणि स्थलांतरितांचा मुद्दा जोरकसपणे लावून धरला आहे. नागरिकांचे स्थलांतर रोखणे महत्त्वाचे असल्याची घोषणा करीत त्यांनी बिहारच्या राजकारणाला कलाटणी दिली आहे. राज्यात राष्ट्रीय जनता दलाच्या नेतृत्त्वातील ‘इंडिया’ आघाडी, तसेच भाजपाच्या पुढाकारातून वाटचाल करणारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी यांच्यात सामना होईल, असे चित्र असताना प्रशांत किशोर यांना दिवसेंदिवस प्रतिसाद लाभत आहे. जनसुराज्य पक्षाला अल्पसंख्याक समुदायाचा मिळणारा प्रतिसाद पाहता, तेजस्वी यादव यांच्या आरजेडीला आगामी निवडणुकीत मोठे नुकसान सहन करावे लागू शकते, असा अंदाज राजकीय विश्लेषक बांधत आहेत.
प्रशांत किशोर यांच्या विधानावर आरजेडीची प्रतिक्रिया
प्रशांत किशोर यांनी दिलेल्या आव्हानाला राष्ट्रीय जनता दलाकडून प्रत्युत्तर देण्यात आले. “आमचे शीर्ष नेतृत्व कोणत्या ना कोणत्या बहाण्याने लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणाऱ्या पक्षाला फारसे महत्त्व देत नाही,” असा टोला आरजेडीच्या एका प्रवक्त्याने लगावला. आठवडाभरापूर्वी तेजस्वी यादव यांनीही प्रशांत किशोर यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली होती. ज्या पक्षाकडे एकही खासदार किंवा आमदार नाही, त्याची चर्चा विनाकारण केली जात आहे. अल्पसंख्याकांचे मतविभाजन करून, भाजपाला निवडणुकीत मदत करणाऱ्या पक्षाला जनता त्यांची जागा दाखवेल, असेही ते म्हणाले होते.
निवडणुकीवेळी नेते पैसे देत असतील, तर घ्या : प्रशांत किशोर
दरम्यान, महाआघाडीने नुकत्याच काढलेल्या व्होटर अधिकार यात्रेमुळे प्रशांत किशोर यांनी प्रचारात काहीशी गती गमावल्याचे दिसत होते. मात्र, आता त्यांनी निवडणुकीपूर्वी मतदारांचे लक्ष वेधण्यासाठी पुन्हा प्रयत्न सुरू केले आहेत. शनिवारी (२० सप्टेंबर) एका प्रचारसभेत बोलताना प्रशांत किशोर यांनी बिहारमधील मतदारांना धर्म व जातीच्या आधारावर मतदान न करण्याचे आवाहन केले. निवडणुकीच्या वेळी नेते पैसे देत असतील, तर ते घ्या, असे विधानही त्यांनी यावेळी केले.
“निवडणुकीदरम्यान प्रचारासाठी वेगवेगळ्या पक्षाचे लोक तुमच्याकडे येतील आणि तुम्हाला पैसे देऊ करतील. तुम्ही ते पैसे घ्या… कारण- गेल्या पाच वर्षांमध्ये रेशन कार्ड तयार करण्यासाठी या लोकांनी तुमचे पैसे खाल्ले, जातीचे दाखले काढण्यासाठी पैसे घेतले, गावागावात या लोकांनी दारू विकली, दारूसाठी दुप्पट-तिप्पट पैसे घेतले. १०० रुपयांची दारू ३०० रुपयांमध्ये विकली. विजेचं बिल दुप्पट केलं. त्यामुळे निवडणुकीत या लोकांनी पैसे दिले, तर ते घ्या,” असे प्रशांत किशोर म्हणाले होते. त्यांच्या या विधानाची बिहारच्या राजकारणात बरीच चर्चा रंगली आहे. या निवडणुकीत जनसुराज्य पक्षाला किती यश मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.