रत्नागिरी – रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांचे आरक्षण जाहीर झाल्यावर अनेक इच्छुकांची यादी वाढू लागली आहे. जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्यास सुरुवात केल्याने जिल्ह्यातील रत्नागिरी, राजापूर, चिपळूण व खेड सारख्या नगरपालिका व पंचायत समितीवर जिल्ह्याचे जास्त लक्ष लागले आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्यासाठी या निवडणुका अस्तित्वाची लढाई असल्याने शिवसेना ठाकरे गटाविरोधात तगडी फौज उभी करण्यावर जास्त भर देण्याची शक्यता वर्तविली जावू लागली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी नगरपरिषद ही पालकमंत्री उदय सामंत यांच्यासाठी महत्वाची मानली जाते. या नगर पालिकेची बहुतांशी रस्त्यांची कामे आर.डी. सामंत या कंट्रक्शन कंपनीच्या माध्यमातून होत असतात. त्यामुळे या नगर पालिकेकडे सामंत बंधूंचे जास्त लक्ष असणार आहे. यासाठी महायुतीचे तगडे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविले जाण्याची शक्यता आहे.
रत्नागिरी नगर पालिकेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून अनेक जण इच्छुक आहेत. त्यामध्ये नीलेश भोसले, नीलेश आखाडे, नौसिन काझी, भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे यांची नावे सद्या चर्चेत आहेत. तसेच शिवसेना शिंदे गटाकडून देखील इच्छुकांची देखील गर्दी वाढू लागली आहे. शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून देखील नवीन इच्छुक उमेदवारांना संधी मिळण्याची शक्यता वर्तविली जावू लागली आहे. मात्र यामध्ये उमेदवारी कोणाला मिळणार याचे कोडे लवकरच उलगडणार आहे.
रत्नागिरी नगर परिषदेच्या ३२ जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. या निवडणुकीमध्ये एकूण महिला सदस्य संख्या १६ एवढी असून अनुसूचित जातीसाठी राखीव सदस्य संख्या एक आहे. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव सदस्य संख्या ९, तर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी राखीव सदस्य संख्या ५, सर्वसाधारण महिलांसाठी राखीव सदस्य संख्या ११, आणि अनारक्षित सदस्य संख्या ११ अशी निवडणुकीची आरक्षण सोडत जाहीर झाली. भाजपा पक्षाच्या इच्छुकांमध्ये जास्त संख्या दिसून येत आहे.यात काही माजी नगरसेवक देखील पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आल्याची शक्यता आहे. भाजपकडून प्रभाग क्रमांक १५ सर्वसाधारण जागेसाठी सध्याचे शहराध्यक्ष दादा ढेकणे संभाव्य उमेदवार असणार आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्या पत्नी जिल्हा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे या देखील संभाव्य उमेदवाराच्या यादीत आहेत. प्रभाग क्रमांक १४ नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहर अध्यक्ष नीलेश भोसले हे निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. प्रभाग क्रमांक २ मधून सर्वसाधारण जागेमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाकडून संकेत कदम निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. प्रभाग क्रमांक ७ नागरिकांचा मागास प्रवर्ग या जागेसाठी भारतीय जनता पक्षाचे शहर सरचिटणीस नीलेश आखाडे हे निवडणुकीच्या रिंगणात उभे राहण्यासाठी तयार आहेत. प्रभाग क्रमांक १४ मधून सर्वसाधारण जागेवरून भाजपचे माजी नगरसेवक सुशांत चवंडे व प्रभाग क्रमांक ११ नागरिकांचा मागास प्रवर्ग या जागेवरून भाजपचे माजी नगरसेवक समीर तिवरेकर हे पुन्हा निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. प्रभाग क्रमांक १५ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या जागेसाठी शिवसेना ठाकरे पक्षाकडून सौ. राजश्री बिपीन शिवलकर या निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. प्रभाग क्रमांक ११ नागरिकांचा मागास प्रवर्ग या जागेसाठी शिवसेना शिंदे पक्षाकडून बावा चव्हाण, प्रभाग क्रमांक ४ सर्वसाधारण जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातून युवा नेते नौसिन काझी हे इच्छुक आहेत. तसेच राजिवडा परिसरातून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार झकी खान हे देखील इच्छुक आहेत. त्याचप्रमाणे राजन सुर्वे हे देखील रत्नागिरी नगर परिषद नामप्र किंवा सर्वसाधारण जागेसाठी निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत.
रत्नागिरी नगर परिषदेची या निवडणुकीसाठी अनेक जण गुडघ्याला बासिंग बांधून तयार आहेत. मात्र निवडणूक अजून जाहीर झालेली नसल्याने इच्छुक उमेदवारांनी मतदार संघ चाचपणी सुरु केली आहे. तसेच सर्वच पक्ष आता जागरूक होऊन पुन्हा एकदा प्रचाराच्या कामाला लागले आहेत. मात्र निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर कोणाला उमेदवारी मिळणार? या प्रश्नाचे उत्तर लवकरच मिळणार आहे. त्यामुळे प्रतिष्ठेच्या समजल्या जाणा-या सर्वच नगर पालिकाच्या निवडणुकांकडे संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
निवडणुका जाहीर झाल्यावरच जागा वाटपाचे निश्चीत केले जाणार आहे. उमेदवारी देताना त्या त्या प्रभागात इच्छुक उमेदवारांची ताकद काय आहे, याची चाचपणी करण्यात येवूनच उमेदवार निश्चीत होतील. – राजेश सावंत, जिल्हाध्यक्ष भाजप