गुरुवारी २६ एप्रिल रोजी मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी समाजवादी पक्षाने मेरठ लोकसभा जागेसाठी आपला उमेदवार पुन्हा बदलला आहे. बुधवारी सपाचे विद्यमान आमदार अतुल प्रधान यांनी मेरठमधून पक्षाचे उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर गुरुवारी समाजवादी पार्टीने मेरठच्या माजी महापौर सुनीता वर्मा यांना तिकीट देत असल्याचे जाहीर केले. सुनीता वर्मा यांनी गुरुवारी सकाळी उमेदवारी अर्ज दाखल केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अतुल प्रधान हे समाजवादी पार्टीचे फायर ब्रँड नेतेदेखील आहेत. ते सध्या मेरठच्या सरधना मतदारसंघातून आमदार आहेत. यापूर्वी संगीत सोम हे या जागेवरून आमदार होते. अतुल प्रधान यांची समाजवादी पक्षातील दिग्गज नेत्यांमध्ये गणना केली जाते. विद्यार्थीदशेपासूनच त्यांनी राजकारणाला सुरुवात केली. ते मेरठ येथील चौधरी चरणसिंग विद्यापीठात विद्यार्थी नेते होते आणि अध्यक्ष म्हणून निवडूनही आले होते. तिथून त्यांनी राजकीय कारकीर्द सुरू केली आणि पुढे जात राहिले. अतुल प्रधान हे समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांचे निकटवर्तीय मानले जातात. याशिवाय पश्चिम उत्तर प्रदेशातील दिग्गज गुर्जर नेत्यांमध्ये त्यांची गणना होते. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपाचे फायरब्रँड नेते संगीत सोम यांचा १८ हजारांपेक्षा जास्त मतांनी पराभव केला. वर्मा भाजपाच्या उमेदवाराला मजबूत टक्कर देतील, असाही गुरुवारी सपा नेत्यांनी दावा केला. मेरठ शहरात त्यांनी महापौर म्हणून चांगले काम केले होते.

हेही वाचाः काँग्रेसमध्ये जीव घुसमटणाऱ्या प्रवक्त्यांची भाजपमध्ये पोपटपंची !

सुनीता वर्मा आणि त्यांचे पती योगेश वर्मा हे दोघेही पूर्वी बसपाबरोबर होते. २०१९ मध्ये पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आणि ते सपामध्ये सामील झाले. पक्षाने अतुल प्रधान यांना वगळण्याबद्दल विचारले असता प्रधान यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने काहीतरी विचार करून निर्णय घेतला असेल आणि दुसऱ्याला तिकीट दिले असेल. राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आज सकाळी मला फोन केला. प्रदीर्घ चर्चेनंतर मी निवडणूक लढवणार नाही, असा निर्णय झाला आहे. या जागेवरील समीकरणे सांभाळण्यासाठी कोणीतरी चांगला नेता असला पाहिजे, असे पक्षाला वाटते. त्यांचा निर्णय मला मान्य असल्याचंही त्यांनी सांगितले.

हेही वाचाः मुंबई, ठाणे, नागपूर, पुणे शहरांतील मतदानाचा टक्का वाढणार कसा ? मतदारांचा निरुत्साह दूर करण्यावर निवडणूक आयोगाचा भर

वर्मा यांच्यासाठी प्रचार करणार का? असे विचारले असता प्रधान म्हणाले की, त्यांच्यासाठी प्रचार करणे कठीण आहे, पण आमचा विरोध नाही, असंही त्यांनी सांगितले. पक्षाचा निर्णय मला मान्य असून, आमदार म्हणून माझे काम करत राहणार असल्याचंही प्रधान यांनी सांगितले. पक्ष मला जिथे सांगेल तिथे मी प्रचार करेन. ऐन वेळी बदल करून प्रधान यांना उमेदवार म्हणून वगळण्यात आले असल्याने मुरादाबाद आणि रामपूरच्या जागांवर जे घडले त्यापेक्षा वेगळे इकडे काही वेगळे घडणार नसल्याचंही समाजवादी पार्टीतील अंतर्गत सूत्रांचे म्हणणे आहे. २००९ पासून भाजपा मेरठ लोकसभा निवडणूक जिंकत आली आहे. २०१९ मध्ये जेव्हा सपाने आपला तत्कालीन मित्र बसपासाठी जागा सोडली होती, तेव्हा नंतर हाजी याकूब कुरेशी यांनी भाजपाच्या राजेंद्र अग्रवाल यांच्याशी निकराची झुंज दिली होती, ज्यांनी कमी फरकाने म्हणजेच ५ हजार मतांनी विजय मिळवला होता. यावेळी भाजपाने रामायण फेम अभिनेता अरुण गोविल यांना उमेदवारी दिली आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sp changed its candidate against arun govil who played the role of rama what is the real reason vrd